धुलिवंदनच्या हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, ७ तस्करांच्या मुसक्या आवळल्या!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : धूलिवंदनानिमित्त हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगर शहरात एमडी ड्रग्जचा मोठा साठा मागविण्यात आला होता. पडेगावमध्ये शहर गुन्हे शाखेने छापा मारून मुख्य सूत्रधार, स्मगलर आणि ५ तस्करांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून ९० लाख ५९ हजार रुपयांचे ५०५.३३ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले. मुख्य सूत्रधार हर्ष ओमप्रकाश शर्मा हा बड्या उद्योजकाचा कुपूत्र असून, बीएचएमएसचा विद्यार्थी आहे.

शहरात एमडी ड्रग्जचा मोठा साठा आणला जात असल्याची गोपनीय माहिती शहर गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या सूचनेवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सहकाऱ्यांसह मिळून रविवारी (१ मार्च) दुपारी सापळा रचला. पावणेदोनच्या सुमारास पडेगाव येथील आर्च आंगण अपार्टमेंटसमोर लाल कार, दुचाकीसह ड्रग्ज तस्कर आल्याचे दिसताच पोलिसांनी घेरले. त्यांच्या ताब्यातून ५०३ ग्रॅम एमडी ड्रग्जसह कार, ७ मोबाइल, २१ हजार रुपये रोख, २ चाकू आणि वजनकाटा जप्त केला. ७ जणांच्या जागीच मुसक्या आवळण्यात आल्या.

यात मुख्य सूत्रधार हर्ष ओमप्रकाश शर्मा (वय २४), स्मगलर अरबाज झहीर खान (वय ३३), आनंद देवीलाल प्रजापत (वय २४, तिघे रा. देवास, मध्यप्रदेश), शहरातील त्यांचा मुख्य हस्तक शेख अरबाज शेख इद्रिस (वय २४, रा. सिल्कमिल्क कॉलनी), नदिम शेख अलीम शेख (वय २२, रा. मिटमिटा), अझहर अबुबखर शेख (वय २८, रा. देवगाव रंगारी, ता. कन्नड), फैजान मुक्तार शेख (वय २१, रा. अन्सार कॉलनी, पडेगाव) यांना डिलिंग सुरू असतानाच अटक केली. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मुख्य सूत्रधार हर्ष शर्माने स्मगलर अरबाज खानला हाताशी पकडून, त्याला पैसे पुरवून ड्रग्जचे जाळे पसरवले होते.

पोलिसांनी पकडल्यावर तो मी केवळ शिर्डीला दर्शनास जाण्यासाठी लिफ्ट घेतली होती, अशी बनवाबनवी करू लागला. मोबाइल चॅट्‌स आणि आर्थिक व्यवहारांची त्याचे बिंग फोडले. धुलिवंदनानिमित्त आयोजित उच्चभ्रू पार्ट्यांना पुरविण्यासाठी ड्रग्जचा हा मोठा साठा शहरात आणण्यात आला होता. पण पोलिसांनी त्यांचा डाव उधळला. अरबाज इद्रिस हा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ड्रग्ज पुरवतो. त्यात व्हॉट्स ॲप, टेलिग्राम चॅटिंगमध्ये सागर, आयान, सोहेल अशी नावे समोर आली आहेत. ते विक्रेते असल्याचा संशय असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. स्मगलर अरबाज खानची बायजीपुऱ्यात सासरवाडी असल्याने शहरात त्याने अरबाज इद्रिसच्या मदतीने ड्रग्ज तस्करीचे जाळे विणले. अरबाज इद्रिस, नदिम शेख हे अट्टल गुन्हेगार असून, त्यांच्याविरुद्ध हत्येच्या प्रयत्नासह विविध गुन्हे आहेत.
राजस्थान-मध्यप्रदेश सीमेवर असलेले देवास हे गाव अशा अवैध व्यवसायांसाठी कुख्यात आहे. ड्रग्ज तस्कर शहरात १५ ते १६ हजार प्रती ग्रॅम दराने एमडी ड्रग्ज विक्री करत होते. स्मगलर्सना होलसेल दरात ३ ते ६ हजार प्रती ग्रॅमने ड्रग्ज मिळते, मधल्या पेडलर्सला ६ ते ९ हजार प्रती ग्रॅम तर ग्राहकांना १५ हजार रुपये प्रती ग्रॅमने विकले जाते.

तस्करांच्या संपर्कातील ग्राहकही सुटणार नाहीत. तरुणाईला नशेच्या गर्तेत झोकणाऱ्या टोळ्यांवर मोक्का लावला जात आहे. यापुढेही ड्रग्ज पुरवणाऱ्यांपासून ते सेवन करणाऱ्यांपर्यंत कुणाचीही गय केली जाणार नाही.
-प्रवीण पवार, पोलीस आयुक्त

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध

Latest News

वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
वैजापूर (गणेश निंबाळकर : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी भाजप जिल्हा उपाध्यक्ष कल्याण दांगोडे यांची...
धुलिवंदन : प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉ. तुषार गोंधणे यांनी केले शहरवासियांना अलर्ट, म्हणाले, रासायनिक रंगांपासून सावध राहा!
खुलताबादच्या लॉजवर २२ वर्षीय तरुणीवर २९ वर्षीय तरुणाचा बलात्कार!; ब्रेकअपनंतर व्हिडीओ, फोटो डिलीट करण्यासाठी एकदा शरीरसंबंधाची घातली होती अट...
धुलिवंदनच्या हायप्रोफाइल पार्ट्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, ७ तस्करांच्या मुसक्या आवळल्या!
दानवेंनी लावला खैरेंना रंग... जैस्वाल, राजूरकर, जंजाळ, घोडेले रंगात रंगुनी गेले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software