- News
- सिटी क्राईम
- छ. संभाजीनगरातही आता ‘यूपी पॅटर्न’ : अवैध कत्तलखान्यांवर चालणार बुलडोझर!; मनपाकडून प्लॅन आखणी, गोरक...
छ. संभाजीनगरातही आता ‘यूपी पॅटर्न’ : अवैध कत्तलखान्यांवर चालणार बुलडोझर!; मनपाकडून प्लॅन आखणी, गोरक्षकावरील प्राणघातक हल्ल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, क्रांती चौकात आंदोलनानंतर चिकलठाण्यात हल्ला झालेल्या ठिकाणी घुसण्याचा प्रयत्न
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : गोवंश मांसाची तस्करी करणाऱ्यांनी जमाव जमवून गोरक्षक गणेश आप्पासाहेब शेळके (वय २४, रा. पळशी, ता. छत्रपती संभाजीनगर) यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. चिकलठाण्यातील मंगळवारच्या (७ ऑक्टोबर) या घटनेनंतर शहरात संतापाची लाट उसळली. हिंदुत्ववादी संघटना कमालीच्या आक्रमक झाल्या असून, बुधवारी (८ ऑक्टोबर) त्यांनी क्रांतीचौकात तीव्र निदर्शने केली. त्यानंतर थेट चिकलठाणा गाठून हल्ला झालेल्या परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच जालना रोडवर रोखले. त्यामुळे मोठा अनुचित प्रकार टळला. मात्र त्यानंतर संतप्त आंदोलकांनी जनावरांसह रस्त्यावर ठिय्या दिला. त्यामुळे तासभर वाहतूक खोळंबली. दरम्यान, गोवंश हत्येच्या वाढत्या घटना आणि त्यामुळे निर्माण तणाव लक्षात घेता, आता महापालिका ॲक्शन मोडवर आली असून, अवैध कत्तलखान्यांवर थेट बुलडोझर चालवण्याचा प्लॅन आखला जात आहे. त्यासाठी अशा कत्तलखान्यांची माहिती गोळा केली जात आहे. कोणत्याही क्षणी मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन असे कत्तलखाने उद्ध्वस्त करण्यात येतील. गो मांस तस्करांवर मोक्का व कठोर कारवाई करू, मांसविक्री विरोधी स्वतंत्र पथक स्थापन करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन मागे घेतले.
गोरक्षकावरील हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी सकाळी क्रांती चौकात जोरदार निदर्शने केली. भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, विश्व हिंदू परिषदेचे संजय गायकवाड, माजी उपमहापौर विजय औताडे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते, नागरिक जमले होते. तणावाची परिस्थिती उद्भवण्याची स्थिती असल्याने दंगा काबू पथक तैनात करण्यात आले होते. यावेळी आंदोलकांनी चिकलठाण्यातील हल्ला झालेल्या ठिकाणी जाण्याची घोषणा केली. त्यांना पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी समजावून सांगितले. मात्र दुपारी १२ पर्यंत आंदोलनकर्त्यांनी चिकलठाणा गाठले.
आंदोलनकर्त्यांनी हल्ला झालेल्या ठिकाणी जाण्याची तयारी केली असताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना मिनी घाटीसमोरच रोखले. त्यामुळे जवळच्या गो शाळेतून गाईंना रस्त्यावर आणत आंदोलनकर्त्यांनी जालना रोड रोखला. दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली. आंदोलनकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे तणाव निर्माण झाला. आंदोलनाच्या चारही बाजूंनी दंगा काबू पथक, शीघ्र कृती दल तैनात करण्यात आले होते. अखेर कठोर कारवाईच्या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन तासभराने थांबवले.
हल्लेखोरांना पोलीस कोठडी...
चिकलठाण्याच्या पुष्पक गार्डन परिसरात राहणारे गोवंश मांस तस्कर फेरोज हारुन कुरेशी (वय ३३), इसा गफूर कुरेशी (वय ४५), उझेफ जाफर कुरेशी (वय २०) आणि रुक्सार ईसा कुरेशी (वय ३८) यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता, रुक्सार वगळता तिघांना न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. रुक्सारची वैद्यकीय कारणामुळे पोलीस कोठडी टळली. १७ वर्षीय मुलाची बाल निरीक्षणगृहात रवानगी केली आहे, असे सहायक पोलीस निरीक्षक कैलास लहाने यांनी सांगितले. हल्लेखोरांना न्यायालयात हजर करताना मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, या हल्ल्यात आणखीही गोवंश मांस तस्कर आहेत. एकूण २० ते २५ जणांचा समावेश आहे. बहुतांश जणांनी घराला कुलूप लावून पलायन केले आहे.
महापालिका प्रशासकांना निवेदन...
आंदोलनानंतर सकल हिंदू संघटनांनी महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांची भेट घेऊन निवेदन दिले. यात अवैध कत्तलखाने जमीनदोस्त करून उघड्यावरील मांसविक्री थांबवण्याची मागणी करण्यात आली. कारवाई न झाल्यास महापालिकेविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. त्यामुळे महापालिकाही ॲक्शन मोडवर आली असून, अवैध कत्तलखान्यांची माहिती गोळा करायला सुरुवात केली आहे. या कत्तलखान्यांवर लवकरच यूपी स्टाइल बुलडोझर चालविण्यात येणार आहेत.

