- News
- सिटी क्राईम
- वाळूज MIDC तील गुंडाराजने डोके वर काढले, तलवार, दांडे घेऊन रस्त्यावर ३ गावगुंडांचा धुमाकूळ!; बाजार...
वाळूज MIDC तील गुंडाराजने डोके वर काढले, तलवार, दांडे घेऊन रस्त्यावर ३ गावगुंडांचा धुमाकूळ!; बाजारपेठेसह रस्त्यांवर नागरिकांची पळापळ...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील बजाजनगरमध्ये गुंडाराजने पुन्हा डोके वर काढले आहे. गुरुवारी (८ जानेवारी) दुपारी चारच्या सुमारास तीन गावगुंडांनी तलवारी, दांडा घेऊन दिसेल त्याच्यावर, वाहनांवर हल्ले केले. रस्त्यावर धुडगूस घालत दहशत निर्माण केली. त्यामुळे बाजारपेठेत, रस्त्यांवर पळापळ झाली. नागरिक जीव मुठीत घेऊन धावताना दिसले. गावगुंडांच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहे.
तिघे दुचाकीवरून बजाजनगरातील विविध भागांत फिरले. महाराणा प्रताप चौकात त्यांनी चार ते पाच दुचाकींवर तलवारीचे वार करून नुकसान केले. याच ठिकाणी एका नागरिकाच्या पाठीवर तलवारीचा वार झाल्याने तो रक्तबंबाळ होऊन कोसळला. आणखीही एका व्यक्तीवर हल्ला करण्यात आला आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या एका नागरिकावरही गावगुंडांनी तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तो नागरिक थोडक्यात बचावला, अन्यथा थेट मुंडकेच उडाले होते. हा थरारही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ते पाहून अंगावर काटा येतो. दरम्यान, माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गावगुंडांचा शोध घेत वडगाव कोल्हाटी गाठले. मात्र गावगुंडांनी दुचाकी आणि तलवार रस्त्यातच टाकून अंधाराचा फायदा घेत पलायन केले. पोलिसांनी दोन तलवारी, एक लाकडी दांडा आणि दुचाकी जप्त केली आहे.

अवैध धंदे, गुन्हेगारी प्रकार खुलेआम...
वाळूज एमआयडीसी परिसरात अवैध धंदे व गुन्हेगारी प्रकार खुलेआम सुरू असून पोलिसांच्या दुर्लक्षामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. रांजणगावातील कपील पिंगळे हत्या प्रकरणात चर्चेत असलेला एक कर्मचारी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाल्यापासून अवैध धंद्यांचे जाळे अधिकच पसरले असल्याची चर्चा आहे. या प्रकरणाबाबत अधिक माहिती घेण्यासाठी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकप्रमुख पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही. महाराणा प्रताप चौक व मीनाताई ठाकरे मार्केट परिसरात यापूर्वीही चाकूहल्ले, मारहाण, छेडछाडीच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी याच भागात स्कॉर्पिओतून आलेल्या आरोपींनी सिनेस्टाईल हल्ला चढवत चाकूने वार व गोळीबाराचा प्रयत्न केला होता.


