- News
- सिटी क्राईम
- छत्रपती संभाजीनगरच्या कल्पनावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा संशय बळावला!; मोबाइलमध्ये पाकिस्तानचे
छत्रपती संभाजीनगरच्या कल्पनावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा संशय बळावला!; मोबाइलमध्ये पाकिस्तानचे ११ नंबर आढळले, चॅटिंगमध्ये पाकिस्तानमध्ये डिलर असल्याचा उल्लेख
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बनावट कागदपत्रांच्या आधारे जालना रोडवरील हॉटेल ॲम्बेसेडरमध्ये ६ महिने मुक्काम ठोकणारी तोतया आयएएस अधिकारी कल्पना त्र्यंबकराव भागवत (वय ४५, रा. चिनारगार्डन, पडेगाव) ही पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा संशय निर्माण झाला आहे. तिच्याकडे पाकिस्तानी लष्कराचे नंबर आढळले आहेत. ती १० महिन्यांपासून पाकिस्तानच्या अफगाण ॲम्बॅसी, पेशावर कॅटोन्मेंट बोर्ड, झरदारी सर वाईफ, अफगाणिस्तान ॲम्बॅसी, मुजीब भाई, झरदारी सर, मोहम्मद रजा व नक्ती या नावाने तिच्या मोबाइलमध्ये सेव्ह असलेल्या ११ नंबर्सच्या संपर्कात होती. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी या ११ क्रमांकांचा तपास सुरू केला आहे.
पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानचे नंबर असणे गुन्हा नाही. संशयास्पद प्रमाणपत्र बनवल्याचा पुरावा नाही, अशी बाजू मांडली. अर्धा तास दोन्ही पक्षांचा युक्तीवाद चालला. तो ऐकून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. डी. जवळगेकर यांनी कल्पना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. कल्पनाला न्यायाधीशांनी बाहेर थांबण्यास सांगितले तेव्हा तिने बाहेर पोलिसांशी परत हुज्जत घातली. तिच्या वकिलाला म्हणाली, की तुम्हाला पाचपट फी देते, मला पत्रकार परिषद घ्यायची आहे.
दरम्यान, कल्पनाच्या मोबाइलमध्ये मॅट्रिक टेक्नॉलॉजी नावाने केंद्रीय ऊर्जा मंत्रालयांना लिहिलेले लेटरहेड आढळले असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे ओएसडी म्हणून अभिषेक चौधरी नावाने एक नंबर सेव्ह आहे. तो नंबर बंद येत आहे. तिचा प्रियकर मोहम्मद अशरफ दिल्ली सोडून फरारी झाला आहे. गुप्तचर यंत्रणा त्याच्या शोधात आहेत. कल्पनाच्या घराची झडती पोलिसांनी घेतली तेव्हा चेतन सुंदरजी भानुशाली याच्या नावे १९ कोटी तर निखिल भाकरे याच्या नावे ६ लाखाचा धनादेश आढळल्याने हे दोघे कोण, याचा तपास पोलीस करत आहेत.
पडेगाव येथील चिनार गार्डनमधील सी विंगमध्ये १३ नंबरच्या वन बीएचके फ्लॅटमध्ये कल्पना राहत होती. ती एमए उत्तीर्ण झालेली असून, अविवाहित आहे. अशरफशी तिची पहिली भेट एसएफएस मैदानावरील एका प्रदर्शनादरम्यान झाली होती. त्यावेळी तिने आपण आयएएस अधिकारी असल्याचे त्याला सांगितले होते. त्यानंतर दोघांत मैत्री झाली, मैत्रीतून प्रेमसंबंध जुळले. कल्पनाने त्याचा नंबर माय लव्हली हजबंड नावाने सेव्ह केला आहे. त्यानेच तिला पेशावर कॅटोन्मेंट बोर्ड, तिथले अधिकारी, अफगाणिस्तानचे नंबर दिले का, याचा तपास केला जात आहे. मोहम्मद अशरफचा भाऊ गालिबशी कल्पना व्हॉटस् ॲपद्वारे संपर्कात होती. त्याच वेळी पेशावर कॅटोन्मेंट बोर्ड व त्यातील अधिकाऱ्यांच्या नावे नंबर सेव्ह आढळले. त्यामुळे गांभीर्य वाढले आहे. कल्पनाने देशात पाच विमान प्रवास केले असून, ते कुणाला भेटण्यासाठी केले, याचा तपास केला जात आहे.
काय आहे प्रकरण...
कल्पना भागवत ६ महिन्यांपासून जालना रोडवरील ॲम्बेसेडर या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्कामी थांबल्याची गोपनीय माहिती सिडको पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी हर्सूलच्या पोलीस निरीक्षक स्वाती केदार, सहायक पोलीस निरीक्षक अरुणा घुले, वर्षा काळे यांच्यासह हॉटेलमध्ये जाऊन शनिवारी (२२ नोव्हेंबर) कल्पनाला अटक केली. तिच्याविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यातील अंमलदार सतीश बोर्डे यांनी तक्रार दिली आहे. कल्पनाने हॉटेलमध्ये थांबण्यासाठी जे आधारकार्ड दिले होते, त्यावर खाडाखोड केल्याचे दिसून आले होते . शिवाय तिच्याकडे केंद्रीय लोकसेवा आयोगातील २०१७ ची यादीही तिच्याकडे मिळाली. ही यादीही बनावट असल्याचे स्पष्ट झाले होते.

