- News
- सिटी क्राईम
- मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला डॉक्टरवर, सिल्लोडमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर ‘वार...
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला डॉक्टरवर, सिल्लोडमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर ‘वारंवार’ लैंगिक अत्याचार!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून छत्रपती संभाजीनगर शहरातील २७ वर्षीय महिला डॉक्टरची तेलंगणातील ३८ वर्षीय युवकासोबत मैत्री झाली. मैत्री वाढत जाऊन भेटीगाठी सुरू झाल्या. दुसऱ्या भेटीत दोघे रेल्वेस्टेशनजवळील हॉटेलमध्ये थांबले. तिथे दोघांत शारीरिक संबंध झाले. त्याने या संबंधाचे व्हिडीओ, फोटो काढले. नंतर या व्हिडीओ, फोटोच्या आधारे तिला ब्लॅकमेल करत त्याने वारंवार लैंगिक संबंध ठेवायला सुरुवात केली. तिच्याकडून ३ लाख ९८ हजार ६७१ रुपयेसुद्धा उकळले. तो पाठलाग करत घरापर्यंत आला, तेव्हा तिने पतीला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर वेदांतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी सी. अमरनाथ (३८, रा. मिरियालगुडा, नालगोंडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तेलंगणातून त्याला अटक करून आणले. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
१८ सप्टेंबर २०२५ रोजी अमरनाथ पाठलाग करत घरापर्यंत आल्याने महिला हादरून गेली. तिने संपूर्ण प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर पतीसोबत वेदांतनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत अमरनाथचा शोध सुरू केला. त्यासाठी पथक चार दिवस तेलंगणात तळ ठोकून होते. त्याला अटक करूनच ते छत्रपती संभाजीनगरला आले. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संगीता गिरी करत आहेत.
(एडिटर कमेंट : वय २७ असलेली महिला डॉक्टर अशी वारंवार अत्याचाराला बळी पडते, हे आश्चर्यकारक आहे. ब्लॅकमेल करून पैसे उकळले म्हणत असताना दुसरीकडे त्याने काही पैसे परतही केल्याचे म्हटले आहे. यावरून ब्लॅकमेल होते, की उसनवारीचा व्यवहार यावरही प्रश्न निर्माण होतो. उच्चशिक्षित महिला पतीला फसवणूक अशाप्रकारे सोशल मीडियावर परपुरुषाशी मैत्री करते, त्याच्या येण्याजाण्याचा खर्च स्वतः करून वारंवार भेटते, यातून महिलेचा उद्देश काय होता, हेही समोर येते. सभ्य समाजासाठी ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.)
सिल्लोडमध्ये २६ वर्षीय तरुणीवर लग्नाच्या आमिषाने लैंगिक अत्याचार
लग्नाचे आमिष दाखवून २६ वर्षीय तरुणीवर सतत तीन वर्षे बलात्कार केल्याची घटना सिल्लोड शहरातील श्रीकृष्ण पार्कमध्ये समोर आल्याने खळबळ उडाली आहे. तरुणीचे अश्लील व्हिडीओ तयार करीत तरुण तिला ब्लॅकमेल करत होता, असे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. सिल्लोड शहर पोलिसांनी संशयित तरुणासह पाच जणांविरुद्ध बुधवारी (५ नोव्हेंबर) रात्री गुन्हा दाखल केला आहे. तरुणी सिल्लोडमध्ये श्रीकृष्ण पार्क भागात शिक्षणासाठी राहते. देवेंद्र संतोष करंडे याच्याशी तिची सोशल मीडियावर ओळख झाली. नंतर एकमेकांचे नंबर घेऊन ते व्हॉट्स ॲपवर बोलू लागले.
मैत्री वाढत गेल्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. देवेंद्रने तिला लग्नाचे आमिष दाखवून त्याच्या राहत्या घरी बोलावून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. संबंधाचे फोटो, व्हिडीओ तयार करून नंतर पुन्हा पुन्हा भेटण्यासाठी ब्लॅकमेल करू लागला. तू मला भेटायला आली नाहीस फोटो, व्हीडीओ व्हायरल करीन, अशी धमकी देऊ लागला. सन २०२२ ते २०२५ असे सलग ३ वर्षे तो ब्लॅकमेल करत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत होता. त्याला शोभा संतोष करंडे, संतोष कृष्णा करंडे, मयूर संतोष करंडे, प्रतीक्षा संतोष शेटे (सर्व रा. टिळकनगर, सिल्लोड) यांनी या गुन्ह्यात मदत केली. त्यांनीही तरुणीला शिव्या देत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावरून शहर पोलिसांनी देवेंद्रसह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बाबू मुंडे करत आहेत.

