- News
- पॉलिटिक्स
- भाजपला का सोसावा लागतोय नाराज इच्छुकांचा इतका रोष?, क्रमांक १ चा पक्ष, उमेदवारीसाठी स्पर्धा अन् नेत...
भाजपला का सोसावा लागतोय नाराज इच्छुकांचा इतका रोष?, क्रमांक १ चा पक्ष, उमेदवारीसाठी स्पर्धा अन् नेतृत्त्वापुढे पेच... आता निष्ठावंत म्हणवणाऱ्यांची समजूत काढताना नाकीनऊ!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राज्यातील क्रमांक १ चा पक्ष बनल्याचे फायदे जसे भाजपला होत आहेत, तसेच अति मोठे झाल्याचे काही परिणामही भोगावे लागत आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक भाजपकडून लढण्यासाठी इच्छुकांची मोठी संख्या होती. शेकडो उमेदवारी अर्ज आले होते. त्यामुळे उमेदवारी कुणाला द्यायची, असा पेच भाजपला पडला होता. उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी होणार हे नक्की होतं. त्यामुळे ‘युती’चा खेळ शेवटपर्यंत रंगवून भाजप आणि शिंदे गटाने बंडखोरांना थोपविण्यात मोठे यश मिळवले. पण आता ते सर्व भाजपच्या अंगलट येताना दिसत आहे. कारण शेवटपर्यंत झुलवत ठेवल्यानंतर चक्क तिकीट न दिल्याने आता हे नाराज इच्छुक आकाडतांडव करत आहेत, जे कसे थांबवायचे असा प्रश्न नेत्यांसमोर आहे.
मंगळवारी रात्री भाजप प्रचार कार्यालयासमोर नाराज इच्छुकांचा संताप इतका वाढला, की त्यांनी माजी खासदार डॉ. भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे यांच्या वाहनांना घेराव घालून संताप व्यक्त केला. वाहनांना काळे फासले. महिला कार्यकर्तीने तर एकेरी बोलत शिवीगाळ केल्याचे व्हिडीओत दिसले. सावे, कराड यांचे फोटो त्यांच्याचसमोर फोडले. काहींनी अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. अखेर पोलीस संरक्षणात सावे आणि कराड यांना निघून जावे लागले.
निष्ठावंत म्हणवणाऱ्या या कार्यकर्त्यांचा आरोप आहे, की अतुल सावेंनी त्यांच्या पीएला उमेदवारी दिली. भागवत कराडांनी फक्त वंजाऱ्यांना तिकीट दिलं. प्रशांत भदाने नावाचे इच्छुक म्हणाले, की रात्रंदिवस पक्षासाठी झटलो. पण सावे यांनी त्यांच्या पीएला तिकीट देऊन माझा घात केला. मला अंधारात ठेवले गेले. मला काही झाले तर त्याला नेतृत्व जबाबदार असेल. उमेदवारी नाकारल्याने संतप्त असलेल्या सुवर्णा मराठे यांचे प्रचार कार्यालयातच बेमदत उपोषण सुरू आहे. आम्हाला आधी प्रचार करायला सांगता आणि मग डावलता. आता हकालपट्टी केली तरी चालेल, पण अन्याय सहन करणार नाही, असे सुवर्णा मराठे म्हणाल्या. पक्षाच्या वरिष्ठ महिला कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष किशोर शितोळे यांची घेराव घातला आणि केवळ शिस्तीच्या नावाखाली आमचा बळी दिला जातो, असा आरोप केला. शितोळे यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण उपयोग झाला नाही. बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरणाऱ्या १५ जणांशी शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी पक्ष कार्यालयात चर्चा केली. त्यांचे बंड शांत होईल, ते उमेदवारी अर्ज मागे घेतील, असा दावा शितोळे यांनी केला.
अनेक नाराजांची नाराजी एका दिवसांत दूर...
काल तिकीट न मिळाल्याने आकाडतांडव करणारे बरेच इच्छुक, काही महिला कार्यकर्त्यांचा संताप आज, ३१ डिसेंबरला निवळल्याचे दिसून आले. त्या चक्क पक्षाच्या अधिकृत उमेदवारासोबत प्रचाराला बाहेर पडल्या आणि पक्षाच्या घोषणा देतानाही दिसल्या. त्यामुळे काल शिव्या घालणाऱ्या याच का त्या, असे आश्चर्य वाटून अनेकांनी तोंडात बोट घातले.

