- Marathi News
- पॉलिटिक्स
- Political Exclusive : विधानसभा निवडणुकीसाठी मराठवाड्याची ‘शहा’निशा; सायंकाळी पदाधिकाऱ्यांशी थेटभेटीत...
Political Exclusive : विधानसभा निवडणुकीसाठी मराठवाड्याची ‘शहा’निशा; सायंकाळी पदाधिकाऱ्यांशी थेटभेटीत खल; रात्री शिंदे, पवारांसोबत जागावाटपावर खलबते!!
छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीत भाजपची जी स्थिती झाली, ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विशेष लक्ष घातले असून, आज, २४ सप्टेंबरला सायंकाळी सहाला शहा हे छत्रपती संभाजीनगरात येत आहेत. ते मुक्कामी थांबून मराठवाड्यातील राजकीय परिस्थितीवर पदाधिकाऱ्यांची विचारविनिमय करणार आहेत. महायुतीच्या जागा वाटपावरही चर्चा […]
छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीत भाजपची जी स्थिती झाली, ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विशेष लक्ष घातले असून, आज, २४ सप्टेंबरला सायंकाळी सहाला शहा हे छत्रपती संभाजीनगरात येत आहेत. ते मुक्कामी थांबून मराठवाड्यातील राजकीय परिस्थितीवर पदाधिकाऱ्यांची विचारविनिमय करणार आहेत. महायुतीच्या जागा वाटपावरही चर्चा होऊ शकते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही रात्री आठला मुंबईहून विमानाने येणार असून, रात्री ९ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील शहरात येत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सायंकाळपासून शहांसोबत शहरातील बैठकीला असतील. त्यामुळे जागावाटपावर रात्री चारही नेत्यांत खल होईल, असे दिसून येते.
अमित शाह नागपूर येथील नियोजित कार्यक्रम पूर्ण करून बीएसएफच्या विशेष विमानाने शहरात दाखल होणार आहे. त्यानंतर १७ तास त्यांचा छत्रपती संभाजीनगरात मुक्काम असणार आहे. केंद्रीय गृहविभाग, पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असून, सकाळपासूनच दौऱ्यांच्या ठिकाणांवर बंदोबस्त तैनात केलेला आहे. सोमवारी सायंकाळपासूनच शहराला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त नितीन बगाटे, नवनीत कवित, शीलवंत नांदेडकर, प्रशांत स्वामी यांनी दिवसभर बंदोबस्ताचा आढावा घेतला. शाह देशातील तिसऱ्या क्रमांकाचे अतिमहत्त्वाचे व्यक्ती असल्याने त्यांना झेड प्लस ही विशेष दर्जाची सुरक्षा प्रदान केलेली आहे. सीआरपीएफवर त्यांच्या सुरक्षेची प्रामुख्याने जबाबदारी असते. ५५ अद्ययावत शस्त्रधारी जवान, १० पेक्षा अधिक एनएसजी कमांडो, ब्रीफकेस बॅलिस्टिक शिल्डधारी जवान तैनात असतात. ताफ्यात जॅमर व्हेईकल, बुलेटप्रूफ गाड्या असतात. छत्रपती संभाजीनगर शहरातील एक ते दीड हजार पोलीस अंमलदार, १५० अधिकारी तैनात असणार आहे. सोमवारी हॉटेल रामा इंटरनॅशनलची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
असा आहे दौरा…
अमित शाह हे आज, २४ सप्टेंबर व उद्या, २५ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम असा : आज सायंकाळी सव्वा सहाला छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन व एमजीएम कॅम्पसकडे प्रयाण, सायंकाळी साडेसहाला रुक्मिणी हॉल, सिडको एन ६, एमजीएम कॅम्पस येथे आगमन व बैठकीसाठी राखीव, ऱात्री ८ वाजून ३५ मिनिटांनी मोटारीने हॉटेल रामा इंटरनॅशनलकडे प्रयाण, रात्री ८ वाजून ४० मिनिटांनी हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे आगमन, रात्री सव्वा नऊ वा. बैठकीसाठी राखीव. नंतर मुक्काम. उद्या सकाळी ११ वा. हॉटेल रामा इंटरनॅशनल येथून मोटारीने छत्रपती संभाजीनगर विमानतळाकडे प्रयाण, सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन व सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी विमानाने नाशिककडे प्रयाण करतील.
