- News
- सिटी क्राईम
- कल्पनाची ‘तोतयेगिरी’; ७ लाख ८५ हजार देणारा रियल इस्टेट एजंट दत्तात्रय शेटेला अटक!
कल्पनाची ‘तोतयेगिरी’; ७ लाख ८५ हजार देणारा रियल इस्टेट एजंट दत्तात्रय शेटेला अटक!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : तोतया आयएएस अधिकारी कल्पना त्र्यंबकराव भागवत (वय ४५, रा. चिनारगार्डन, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) हिच्या बनवेगिरीत सहभागी असलेला चौथा संशयितही शनिवारी (६ डिसेंबर) पहाटे सिडको पोलिसांनी श्रीगोंद्यातून उचलला. दत्तात्रय पांडुरंग शेटे (वय ३८, रा. मांडवगण, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर )असे त्याचे नाव असून, रियल इस्टेट एजंट आहे. त्याने कल्पनाला ७ लाख ८५ हजार रुपये पाठवले होते. सध्या तरी या प्रकरणात देशविरोधी कृत्याचा एकही पुरावा पोलिसांना मिळालेला नसून, हे प्रकरण केवळ आर्थिक फसवणुकीच्याच दिशेने जात असल्याचे दिसून येत आहे.
कल्पना १३ दिवस पोलीस कोठडीत होती. शनिवारी तिला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. आर्थिक व्यवहार तांत्रिक तपासाद्वारे शक्य आहे. त्यासाठी कोठडीची आवश्यकता नाही. कल्पनाच्या गुन्ह्यात आतापर्यंत देशविरोधी कृत्याचा एकही पुरावा पोलिसांना मिळालेला नाही, असे तिच्या वकिलांनी न्यायालयात मांडले. त्यामुळे न्यायालयाने पोलिसांची पोलीस कोठडीची विनंती फेटाळली.
कल्पना भागवत ६ महिन्यांपासून जालना रोडवरील ॲम्बेसेडर या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्कामी थांबली होती. सिडको पोलिसांनी तिला हॉटेलमधून २२ नोव्हेंबरला अटक केली होती. कल्पनाने हॉटेलमध्ये थांबण्यासाठी जे आधारकार्ड दिले होते, त्यावर खाडाखोड केल्याचे दिसून आले होते. तिच्याकडे केंद्रीय लोकसेवा आयोगातील २०१७ ची यादीही तिच्याकडे मिळाली होती. ही यादी दत्तात्रय शेटेनेच तिला पुरवली, असा संशय आहे. शेटेची कल्पनासोबत २०२१ मध्ये ओळख झाली होती. त्याने तिला काही महिन्यांपूर्वी ७ लाख ८५ हजार रुपये पाठवले होते. त्यापैकी दीड लाख रुपये कल्पनाने त्याला परत केले होते. हा व्यवहार का झाला, याचा तपास आता होत आहे. कल्पना विद्यापीठात नोकरी करत असताना शेटेने तिला मोठे प्रलोभन दिले. बदल्यांसह मी मोठ्या लोकांची कामे करतो. एका कामात १० लाख रुपये मिळतील, असे आमिष त्याने दाखवले. त्यामुळे कल्पनाने त्याच्यावर विश्वास ठेवूनच विद्यापीठातील नोकरी सोडल्याचे समोर येत आहे.
या प्रकरणात पोलिसांनी कल्पनाचा अफगाणी प्रियकर मोहम्मद अशरफ गिल (वय २४, ह. मु. जंगपुरा, नवी दिल्ली) व केंद्रीय गृहमंत्र्यांच्या ओएसडींच्या नावाचा वापर करणारा तोतया अधिकारी डिम्पी देवेंद्रकुमार हरजाई (वय ३०, रा. पालम, दिल्ली) यांनाही अटक केलेली आहे. हे दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांचा आणि शेटेचा संबंधही तपासला जात आहे. शेटेला न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अतुल येरमे हे करत आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
By City News Desk
Latest News
18 Jan 2026 12:47:22
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार पुन्हा गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या जाहीर...

