- News
- पॉलिटिक्स
- १२ जागांवरून युतीचा पेच कायम!; शिंदे गटाकडून इच्छुकांना अर्ज भरण्याच्या सूचना, सावे म्हणाले, काही ठ...
१२ जागांवरून युतीचा पेच कायम!; शिंदे गटाकडून इच्छुकांना अर्ज भरण्याच्या सूचना, सावे म्हणाले, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती शक्य!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : १२ जागांवरून भाजप-शिंदे गटातील युतीचा पेच कायम असून, शिंदे गटाला ३३ जागा देण्याची तयारी भाजपने केली आहे. मात्र शिंदे गट ४१ जागा मागत आहे. त्यानंतर युतीचा नवा प्रस्ताव देतो, असे म्हणत भाजपचे पदाधिकारी गेले, त्यानंतर नवीन प्रस्ताव आला नाही, रविवारी (२८ डिसेंबर) वरिष्ठ स्तरावरून जागा वाटपाचा निर्णययुद्धा झाला नाही. अखेर मध्यरात्री शिंदे गटाने आपल्या इच्छुकांना अर्ज भरण्याच्या सूचना केल्या आहेत. पेच असलेल्या १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते, अशी शक्यता मंत्री अतुल सावे आणि मंत्री संजय शिरसाट या दोघांनीही व्यक्त केली. अर्ज भरण्याला अवघे २ दिवस उरले असताना युतीतील जागा वाटप ठरत नसल्याने आता या दोन्ही पक्षांतील इच्छुकांची मात्र घालमेल वाढली आहे. ही जाणूनबुजून खेळली जाणारी खेळी असल्याचेही काहींचे मत बनले आहे.
भाजपकडून रविवारी दिवसभर कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने रात्री उशिरा मंत्री शिरसाट यांनी शिंदे गटाच्या कोअर कमिटीची बैठक आपल्या निवासस्थानी बोलावली. या बैठकीत इच्छुकांना अर्ज भरण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यामुळे आज, २९ डिसेंबरला ते उमेदवारी अर्ज भरणे सुरू करतील. दुसरीकडे भाजपने मात्र इच्छुकांना अद्याप तशा सूचना केलेल्या नाहीत.
कशामुळे पेच?
दोन्ही पक्षांत ठाकरे गटाच्या नेत्यांचे मोठ्या प्रमाणावर प्रवेश झाले आहेत. त्यांना उमेदवारीचा शब्द देण्यात आला आहे. त्यामुळे १२ जागांवरून पेच निर्माण झाला आहे. यात प्रभाग १, १७, २२ आणि २७ मधील जागांवरून वाद सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आज, २९ डिसेंबर आणि उद्या, ३० डिसेंबरला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी उसळणार आहे. रविवारपर्यंत केवळ १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आजवर ४७२० उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. १९ प्रभागांतून अ, ब, क, ड या आरक्षणानुसार ११५ वॉर्डांसाठी उमेदवारी अर्ज दाखल होतील. चार वॉर्डांचा एक प्रभाग आहे.
मविआचे काय?
दरम्यान, या निवडणुकीत ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये युती होण्याची शक्यता आता नाहीच्या बरोबर आहे. त्यांच्यातील वाटाघाटीही थांबल्या आहेत. खा. डॉ. कल्याण काळे, आ. अंबादास दानवे व चंद्रकांत खैरे यांची बैठक रविवारी दुपारी होणार होती. मात्र ती झाली नाही. वंचित बहुजन आघाडीने पहिली ४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, तर अजित पवार गटानेही १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शरद पवार गटाचे काय सुरू आहे, हे कळायला मार्ग नाही. या पक्षाकडून निवडणुकीच्या काहीच हालचाली दिसून येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

