- News
- पॉलिटिक्स
- भाजप-शिंदे गटाच्या स्वतंत्र जोरबैठका!; स्थानिक स्वराज्य संस्था निडणुका : ठाकरेंनी आरशात बघितले तर मो...
भाजप-शिंदे गटाच्या स्वतंत्र जोरबैठका!; स्थानिक स्वराज्य संस्था निडणुका : ठाकरेंनी आरशात बघितले तर मोर्चा काढणार नाहीत : फडणवीस; ठाकरे आणखी किती काळ हंबरडा फोडणार? : शिंदे
-भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना स्वबळ आजमाविण्याची इच्छा -शिंदे गट चालेल, पण अजित पवार गट नकोच, स्पष्ट भूमिका -अब्दुल सत्तार शिंदे गटाच्या मेळाव्याला न आल्याने चर्चेला उधाण
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका तोंडावर आल्याने शुक्रवारी (१० ऑक्टोबर) भाजप आणि शिंदे गटाने छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वतंत्र जोरबैठका काढल्या. भाजपच्या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटाच्या मेळाव्याला एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन करत पक्षासाठीची अनुकूलता जाणून घेतली. मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्यात भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा पुन्हा बुलंद केला. मुख्यमंत्री महायुतीच्या बाजूनेच सकारात्मक असल्याचे पाहून शिंदे गट चालेल, पण अजित पवार गट अजिबात नको, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली. दुसरीकडे शिंदे गटाच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी रणशिंग फुंकले. मात्र अब्दुल सत्तार यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. मंत्री संजय शिरसाट यांच्याशी वाद असल्याने त्यांना बोलावले नसल्याची चर्चा रंगली. दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. ठाकरेंनी आरशात बघितले तर मोर्चा काढणार नाहीत, असे फडणवीस म्हणाले, तर ठाकरे आणखी किती काळ हंबरडा फोडणार?, असा सवाल शिंदे यांनी केला.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. आता त्यांनी अतिवृष्टीग्रस्तांना मदत देण्यावरून सरकारविरुद्ध वातावरण पेटवले आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, की हर्षवर्धन सपकाळ कोण आहेत? त्यांना त्यांच्या जिल्ह्यात कुणी ओळखत नाही, त्यांच्या आरोपांवर मी काय उत्तर द्यायचे? ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज, १० ऑक्टोबरला अतिवृष्टीग्रस्तांना मदतीच्या प्रश्नावरून विभागीय आयुक्तालयावर हंबरडा मोर्चा काढणार आहेत, त्यावरही फडणवीस यांनी टीकास्त्र डागले.
एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल...
संत एकनाथ रंगमंदिरात शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा झाला. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. मुख्यमंत्रिपदाची खुर्ची गेली तेव्हा हंबरडा फोडला, खासदार पडले तेव्हा हंबरडा फोडला आणि विधानसभा निवडणुकीत आमदार पडले तेव्हा हंबरडा फोडला, आता आणखी किती वेळा हंबरडा फोडणार आहात, असा सवाल त्यांनी ठाकरेंना केला. व्यासपीठावर मंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार रमेश बोरनारे, आमदार विलास भुमरे, आमदार संजना जाधव, माजी आमदार अण्णासाहेब माने, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांची उपस्थिती होती. लाडका भाऊ जोपर्यंत आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली.
.jpg)
आ. बोरणारे यावेळी म्हणाले, की माझ्याविरोधात निवडणूक लढविणारा आज भाजपमध्ये जाऊन महायुतीकडून वैजापूरचा नगराध्यक्ष होण्याचे स्वप्न पाहत आहे. यामुळे ज्या पक्षाचा आमदार त्याच पक्षाचा नगराध्यक्ष व्हावा, ही कार्यकर्त्याची भावना आहे. राजेंद्र जंजाळ यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी केले. मेळाव्याकडे माजी मंत्री सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पाठ फिरवली. होर्डिंग्सवरही त्यांचे छायाचित्र नव्हते. मंत्री संजय शिरसाट यांच्याशी वाद असल्याने त्यांना मेळाव्याला बोलाविले नसल्याची चर्चा रंगली आहे. विधानसभा निवडणुकीत बाहेरगावी राहत असलेले २० हजार मतदार मतदानासाठी आणल्याचा खुलासा पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी केल्याने सभागृहात हशा पिकला. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना कसे आणले, असा सवाल करताच आ. भुमरे यांनी त्या मतदारांना मतदानाच्या दिवशी आणल्याची कबुली दिली.
.jpg)
भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अजित पवार गट नको
आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपसोबत अजित पवार गट नको, अशी स्पष्ट भूमिका स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर घेतली. शिंदे गटाशी थोडेफार जुळेल. मात्र अजित पवार गटासोबत युती नको, असे मराठवाड्यातील मंत्री, नेते, पदाधिकाऱ्यांनी फडणवीस यांना सांगितले. जालना रोडवरील औरंगाबाद जिमखान्यात फडणवीस यांनी मराठवाडा विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक नियोजन बैठक घेतली. सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी बैठकीला ते आले. मध्यरात्री रात्री १२ वाजून १० मिनिटांनी त्यांनी हॉटेल सोडले. तब्बल पाच तास बैठक चालली. स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहून युतीचा निर्णय घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी सुचविले, असे सूत्रांकडून समजते.
.jpg)
शेतकऱ्यांना राज्य शासनाने ३१ हजार कोटी रुपयांचे जाहीर केलेले पॅकेज, २ सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने काढलेला जीआर याबद्दल मुख्यमंत्र्यांनी चाचपणी केली असता सरकारच्या बाजूने सकारात्मक वातावरण असल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी होकार भरला. स्वबळावर लढण्याची भूमिकाही पदाधिकाऱ्यांनी मांडली. विधानसभा निवडणुकीत महायुतीत शिंदे गट, अजित पवार गटाने दिलेल्या त्रासाची उजळणीही करण्यात आली. बैठकीला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, खासदार अशोक चव्हाण, खा. डॉ. भागवत कराड, आ. संजय केणेकर, माजी खासदार रावसाहेब दानवे, शहराध्यक्ष किशोर शितोळे आदींची उपस्थिती होती. प्रत्येक जिल्ह्यातील ६० पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते, असे सूत्रांनी सांगितले.

