- Marathi News
- पॉलिटिक्स
- सगळी तयारी केली अन् गट झाले राखीव; खुलताबादच्या इच्छुकांवर डोक्याला हात मारण्याची वेळ!
सगळी तयारी केली अन् गट झाले राखीव; खुलताबादच्या इच्छुकांवर डोक्याला हात मारण्याची वेळ!

खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : गण झाला, गौळण झाली, प्रत्यक्ष वग सुरू करायचे तर वीजपुरवठा खंडित झाला, असे अनुभव अनेकदा वगनाट्य सादर करणाऱ्यांना येतात. इकडे खुलताबाद तालुक्यातील मातब्बर पुढाऱ्यांवर तशीच वेळ आली आहे. या साऱ्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्याची तयारी करून ठेवली होती. पण आता तालुक्यातील तीनही गट राखीव झाल्याने या नेत्यांच्या पदरी निराशा आली आहे.
गेल्यावेळी सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असलेला वेरूळ जिल्हा परिषद गट यंदा आरक्षण सोडतीत ओबीसीसाठी राखीव झाला आहे. यामुळे येथून लढण्याची तयारी करणारे राष्ट्रवादीचे जगन्नाथ खोसरे, भाजपचे भीमराव खंडागळे, युवराज ठेंगडे, कॉँग्रेसचे किशोर काळे यांच्या पदरी निराशा पडली आहे, तर शिंदे सेनेचे तालुका प्रमुख विशाल खोसरे निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाल्याने खुश झाले आहेत. सोबतच विजय राठोड, उद्धव सेनेकडून शैलेश क्षीरसागर, राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून ज्ञानेश्वर दुधारे यांनीही रिंगणात उतरण्याची तयारी करून ठेवली आहे.
बाजारसावंगी गट यंदा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाला आहे. यामुळे येथून तयारीत असलेले भाजपचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड, विकास कापसे, संदीप निकम, उद्धव सेनेचे शंकर आधाने यांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे. आता या सगळ्यांनाच पत्नी किंवा नातेवाईक महिलेला निवडणुकीला उभे करावे लागण्याची शक्यता आहे. भाजपकडून प्रतीक्षा विकास कापसे, शिंदे गटाकडून आशा अंबादास नलावडे, उद्धव सेनेकडून वेदिका अविराज निकम या नावांची आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे.
गदाणा
जिल्हा परिषदेचा गदाणा गटही यंदा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. यामुळे राजू वरकड (उद्धवसेना), भाजपचे प्रकाश चव्हाण, राष्ट्रवादीचे विलास चव्हाण (शरद पवार गट) यांचा हिरमोड झाला आहे. यामुळे आता लिना राजू वरकड, वैशाली महेश उबाळे, रेखा प्रकाश चव्हाण या निवडणुकीच्या रिंगणात दिसण्याची शक्यता वाढली आहे. शिवाय गेल्या दोन वर्षांपासून पूर्ण तयारी केलेल्या सुजाता प्रवीण इंगळे याही निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत.
पं. स. चा एकच गण ओपनसाठी...
खुलताबाद तालुक्यातील सहापैकी टाकळी राजेराय हा एकच गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटला असून, त्यामुळे मातब्बर नेत्यांच्या नजरा तिकडे वळल्या आहेत. याशिवाय गल्लेबोरगाव, गदाना आणि ताजनापूर हे तीन गण सर्वसाधारण महिलांसाठी, वेरूळ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी तर बाजार सावंगी गणही इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. यामुळे या गणातून लढण्याची तयारी करून ठेवलेल्यांचा हिरमोड झाला आहे. वेरूळ गणातून विजय भालेराव, भाजपचे दिनेश अंभोरे, कारभारी ढिवरे, सतीश लोखंडे, नितीन जाधव, अनिल ढिवरे यांची नावे इच्छुकांच्या यादीत आहेत. गल्लेबोरगावमधून शोभा खोसरे (राष्ट्रवादी अजित पवार गट), मंगला चंद्रटिके, मंदा सुनील भोसले (उद्धवसेना), लता विजय खोसरे (शिंदे गट) तसेच मंदा संजय जगताप या महिला इच्छुक आहेत.