छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पराभवानंतर चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर आरोप केले. छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल याचीही शक्यता कमी उरल्याने आता खैरेंनी पक्षातील सहभाग अगदीच कमी केल्याचे दिसून येत आहे. युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात त्यांचा सहभाग नाममात्रही नव्हता. एरव्ही उद्धव ठाकरे असोत, की आदित्य ठाकरे यांच्यासाठी रस्त्यावर उतरणारे चंद्रकांत खैरे हे आदित्य ठाकरेंविरुद्ध भाजपने केलेल्या आंदोलनापासून इतके अनभिज्ञ कसे राहिले, असा सवाल ठाकरे गटाचे कार्यकर्ते करत आहेत. महिला अत्याचारावरून ठाकरे गटाने रान पेटवले असताना क्रांती चौकात झालेल्या मूक आंदोलनाला किंवा विमानतळावर झालेल्या निषेध आंदोलनापासूनही खैरे दूर होते. आंदोलनात अग्रस्थानी अंबादास दानवे होते म्हणून खैरे दूर राहिले अशी एकवेळी कार्यकर्त्यांची समजूत होईलही, पण थेट आदित्य ठाकरेंविरुद्ध आंदोलन होत असताना खैरे दूर राहिल्याने कार्यकर्ते अचंबित झाले आहेत.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे उमेदवार होते. उद्धव ठाकरे यांनी त्यांना निष्ठेचे फळ म्हणून संधी दिली. मात्र इतक्या वेळा खासदार राहूनही त्यांनी जिल्ह्यासाठी काय केले, असा प्रश्न विरोधकांनी प्रभावीपणे उपस्थित केला. भरीसभर त्यांनी मुस्लिम मतांसाठी जे प्रयत्न केले, बैठका घेतल्या. त्यामुळे हिंदुत्ववादी मतदान त्यांना झाले नाही. मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असल्याने एकगठ्ठा मते संदिपान भुमरे यांना गेली. त्यामुळे खैरे थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. पण पैसे वाटप, इव्हीएमचा घोळ, अंबादास दानवेंवर पुन्हा आरोप करत खैरेंनी पराभवाचे त्यांच्या परीने विश्लेषण केले. त्यानंतर खैरे यांनी छत्रपती संभाजीनगर पश्चिमवर दावा ठोकला. मात्र लगोलग राजू शिंदे यांनी भाजपातून ठाकरे गटात प्रवेश केला. अर्थात त्यांचा हा पक्षप्रवेश कशासाठी हे स्पष्ट आहे. त्यांना पुन्हा पश्चिममधून विधानसभा निवडणूक लढायची आहे. भाजपमधून तिकीट मिळणार नाही हे नक्कीच होतं. कारण महायुतीत ही जागा एकनाथ शिंदे गटाच्या वाट्याला आहे. तिथे संजय शिरसाट यांच्यासारखे एकनाथ शिंदेंच्या जवळचे उमेदवार असल्याने त्यांना डावलून राजू शिंदे यांना उमेदवारी मिळेल ही शक्यता नाहीच. त्यामुळे ते ठाकरे गटात आले आहेत. त्यांना ठाकरे गटात आणण्यामागे कुणाचा हात आहे, हे स्पष्ट आहे. त्यामुळे खैरे इतके दुखावले जातील, याची कल्पनाही कुणी केली नव्हती.
थोडाफार वाद झाला तरी खैरे अग्रस्थानी असायचे. शिवसेना म्हणजे खैरे आणि खैरे म्हणजे शिवसेना हे समिकरण आता बदलत्या काळात बदलले आहे. आता शिवसेनेचा ठाकरे गट म्हटला की अंबादास दानवे अशी चर्चा सुरू होते. कुठेही दानवेच पुढे असतात. आंदोलन असो, बैठका असो, नियुक्त्या असो… त्यामुळे खैरेंचे पक्षातील महत्त्व अगदीच कमी झाल्याचे चित्र आहे. आता तर दानवे यांची नियुक्ती विभागीय नेते म्हणून झाली आहे. याचा सर्व परिणाम आता खैरेंच्या वागण्यातून दिसून येत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांत सुरू झाली आहे. आदित्य ठाकरेंच्या विरोधात आंदोलन होते, तरी खैरे नसतात. ठाकरे गट राज्यभरात महिलांच्या अत्याचाराविरोधात रस्त्यावर उतरतो पण खैरे नसतात. खैरेंचे जवळचे मानले जाणारे आमदार उदयसिंह राजपूत पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी विमानतळात असतात आणि अंबादास दानवे बाहेर आंदोलन करत असतात इतके विरोधाभासी चित्र ठाकरे गटात यापूर्वी कधीच दिसून आले नव्हते. एकंदरीत खैरे आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या मनात चालले काय, हे समजायला मार्ग नाही. पण यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात मात्र वेगळीच खदखद निर्माण होत आहे, याची वेळीच कल्पना खैरे यांना आली तरच खरे आहे…