- News
- एक्सक्लुझिव्ह
- Political Exclusive : चौकडी, हुकूमी एक्का अन् दुखावलेला सैनिक! : राजेंद्र जंजाळ यांना का अन् कसे द...
Political Exclusive : चौकडी, हुकूमी एक्का अन् दुखावलेला सैनिक! : राजेंद्र जंजाळ यांना का अन् कसे दूर सारले, कसे शिरसाटांचे राजकीय शत्रू केले... एकनाथ शिंदे सैनिकाला तारणार की अव्हेरणार?
मनोज सांगळे, संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट
छत्रपती संभाजीनगर : बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जिल्ह्यातील कन्नडवगळता शिवसेनेचे सर्व आमदार गेले. मात्र पदाधिकाऱ्यांनी वेट ॲन्ड वॉचची भूमिका घेतली होती. अशावेळी सर्वात आधी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहिले ते राजेंद्र जंजाळ. नंतरच्या काळात शिंदे गटाला सत्तेत चांगले दिवस आले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, नंतरच्या विधानसभा निवडणुकीनंतर आता उपमुख्यमंत्री आहेत. अशावेळी गुळाला मुंगळे चिकटतात, तसे अनेक नेते ठाकरे गटातून शिंदे गटात आले आहेत. माजी महापौरांपासून तर माजी नगरसेवकांपर्यंत भरणा सुरू झाला आहे. राज्यात सत्ता नसल्याने आणि सतत पराभवाच्या छायेत राहिल्याने ठाकरे गटात भविष्य दिसत नसल्याने त्यांनी शिंदे गटात येणे साहाजिकच आहे.
पण अशावेळी राजेंद्र जंजाळ यांना विश्वासातच घेतले जात नसेल तर कुठेतरी स्वाभिमान हा दुखावला जाणार होताच. अलीकडच्या काळात जंजाळ यांना महापालिका निवडणुकीसंदर्भातील बैठकांना डावलले गेल्याचा आरोप आहे.
गेल्या काही महिन्यांत मंत्री शिरसाट यांच्यापुढे राजकीय संकट निर्माण करण्यात आले होते, आरोप करण्यात आले होते. त्यावेळी शिरसाटांची प्रभावी बाजू मांडण्यात जंजाळांनी कोणतीही कसर सोडली नाही. शिवसेना फुटल्यापासून शिरसाटांसोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या जंजाळांना दूर करण्यात ठाकरे गटातून आलेली चौकडी आता यशस्वी ठरली आहे, असे म्हणावे लागेल. जंजाळ यांनी थेट शिरसाटांना लक्ष्य केल्याने शिरसाटही दुखावले गेले आहेत. दोघांतील दुरी आता भरली जाईल की नाही, एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जंजाळाच्या प्रवेशाच्या चर्चेने भाजपमध्ये अस्वस्थता...
एक व्यक्त झाला, तर दुसऱ्याने समजूत काढायची असते, पण जंजाळ आणि शिरसाट दोघेही कट्टर शिवसैनिक असल्याने जंजाळ बोलले तसे शिरसाटांनीही फटकारले. तुम्हाला जिकडे जायचे तिकडे जा, थांबविले कुणी? जंजाळ बाहेर पडले तरी काहीही फरक पडणार नाही, असे बोलून शिरसाट मोकळे झाले. यामुळे याचसाठी का केला होता अट्टहास, अशी उद्वेगाची भावना जंजाळ यांच्यात निर्माण झाली नसेल का? जंजाळ यांच्याकडे भाजपमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग आहे. महापालिकेत सत्ता आणण्याच्या दृष्टीने जंजाळ हे भाजपला हवेच आहेत. जंजाळ येतील, सोबत समर्थक आणतील, ते येतील तेव्हा काहीतरी शब्द घेऊनच घेतील, त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना उमेदवारीचं बोलतील, तेव्हा सध्याच्या इच्छुकांचं काय, याचं गणितही भाजपला जुळवावं लागणार आहे.
सध्याच्या भाजप इच्छुकांना प्लॅन बी तयार करून ठेवावा लागणार आहे. जंजाळ यांना भाजपात प्रवेश द्यावा, या बाजूने काही जण बोलत आहेत, तर काही जणांत मात्र नाराजीचा सूर उमटला आहे. शहरातील तिन्ही मतदारसंघांत जंजाळ यांचे समर्थक असल्याचे बोलले जाते. सध्या भाजपकडे असा आक्रमक चेहरा नाही. जंजाळ यांच्या रुपाने तो मिळू शकतो. अशावेळी भाजप त्यांना पक्षात घेण्याची संधी सोडणार नाही. भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी तसे सूतोवाचही केले आहे. जंजाळ यांच्याशी भेटीगाठी होत आहेत. भाजपला असलेले भविष्य, आमचे वर्क कल्चर पाहून यामुळे अनेकांना पक्षात यायचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र नगरपरिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हे जंजाळ आणि शिरसाट यांच्यातील वाद कसा शमवतात, जंजाळ यांचे समाधान कसे करतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसैनिकांची किंमत माहीत आहे, ते छत्रपती संभाजीनगरमधील सुरुवातीपासून आतापर्यंतच्या राजकीय परिस्थितीला लक्षात घेऊनच निर्णय घेतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

