- Marathi News
- एक्सक्लुझिव्ह
- हायवाकडून महिन्याला २ लाख, ट्रॅक्टरसाठी १ लाख ८० हजार हप्ता; एवढा हप्ता जाऊनही कारवाईमुळे वाळूमाफिय...
हायवाकडून महिन्याला २ लाख, ट्रॅक्टरसाठी १ लाख ८० हजार हप्ता; एवढा हप्ता जाऊनही कारवाईमुळे वाळूमाफियाही छ. संभाजीनगरात आक्रमक
सिल्लोड/छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या वाळूमाफिया आणि महसूल प्रशासनात जणू संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षातून वाळूमाफियांविरुद्ध महसूल प्रशासनाने सुरू केलेल्या कारवायांमुळे वाळूमाफियासुद्धा आक्रमक झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरचे तहसीलदार रमेश मुंडलोड यांना पवार नावाचा सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी, जो आता वाळूमाफिया झाला आहे, त्याने अरेरावी केली, धमकावले. त्यानंतर जिन्सी पोलीस ठाण्यातही त्याच्याच […]
सिल्लोड/छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या वाळूमाफिया आणि महसूल प्रशासनात जणू संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षातून वाळूमाफियांविरुद्ध महसूल प्रशासनाने सुरू केलेल्या कारवायांमुळे वाळूमाफियासुद्धा आक्रमक झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरचे तहसीलदार रमेश मुंडलोड यांना पवार नावाचा सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी, जो आता वाळूमाफिया झाला आहे, त्याने अरेरावी केली, धमकावले. त्यानंतर जिन्सी पोलीस ठाण्यातही त्याच्याच बाजूने पोलीस वागले, त्यामुळे मुंडलोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केलेला पत्रप्रपंच, या गोष्टी या संघर्षाला कारणीभूत आहेत. सिल्लोड तालुक्यातील उपळी शिवारात महसूलच्या पथकावर वाळू माफियांनी बुधवारी(१२ फेब्रुवारी) रात्री हल्ला केला, वाहनाची तोडफोड केली, जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हा संघर्ष आता टोकाला गेल्याचे चित्र आहे. वाळूमाफियांच्या आक्रमकतेलाही आर्थिक किनार आहे. एका हायवासाठी महिन्याला दोन लाख आणि ट्रॅक्टरकडून १ लाख ८० हजार रुपयांचा हप्ता देऊनही कारवाई होत असल्याने वाळूमाफिया आता कारवाई करणाऱ्यांना बदडण्याची भाषा करत आहेत.
-सिल्लोड तालुक्यातील उपळी ते दीडगाव रस्त्याने अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर बुधवारी रात्री ९ ला पकडल्यानंतर वाळूमाफियांनी महसूलच्या पथकावर दगडफेक करत शासकीय वाहनाची तोडफोड केली, डिझेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. वेळीच महसूलचे कर्मचारी पळाले म्हणून वाचले. या हल्लाप्रकरणी भराडीचे मंडळ अधिकारी शंकर जैस्वाल यांच्या तक्रारीवरून सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी ट्रॅक्टरमालक दादाराव मिठ्ठू दुधे (वय ४०), विलास सखाराम पांढरे, राजू उर्फ बंडू पुंडलिक फोलाने, विजय संजय शेजूळ, (सर्व रा. उपळी) या माफियांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चौघांनाही उपळी व पळशी गावातून गुरुवारी अटक केली. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
यंत्रणेचा असा धाक कामी येईल?
हप्ता देण्यास नकार दिला, वरून एसीबीच्या हाती पकडून दिले, त्यामुळे संतापात महसूलच्या पथकाकडून कारवाई जर होत असेल आणि वाळूमाफियांकडून जशास तसे उत्तर दिले जात असेल तर नक्की कुणाला दोषी धरायचे, असा प्रश्न सामान्यांना पडल्यावाचून राहत नाही. सिल्लोड तालुक्यात वाळूमाफियांचे नेटवर्क खूप मजबूत आहे. ज्या नदीपात्रातून वाळू उपसा करायचा आहे, त्या भागातील अधिकार्यांचे लोकेशन आधीच वाळूमाफियांकडे असते. ज्या ज्या भागातून अवैध वाळू वाहतूक होणार आहे, त्या रस्त्यांवर वाळूमाफियांचे एजंट आधीच सक्रीय झालेले असतात. पूर्णा, अंजना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करण्यासाठी १२० ट्रॅक्टर आणि २५ हायवा असल्याचे सूत्रांकडून समजते.
नेटवर्क कसे तोडणार?
सिल्लोडचे तहसीलदार संजय भोसले यांनी वाळूमाफिया कुणालाही जुमानत नसल्याची खंत व्यक्त करून त्यांच्या नांग्या ठेचण्याचा इशारा दिला आहे. पण जोपर्यंत महसूल प्रशासनातील हप्तेखोरांना लगाम लागत नाही तोपर्यंत वाळूमाफियांचे नेटवर्क तुटणे शक्य नाही. पैठण असो की सिल्लोड, किंवा वैजापूर हप्तेखोरीची साखळी तुटल्याशिवाय त्यांच्यावर वचक बसणे शक्य नाही. छत्रपती संभाजीनगरचे तहसीलदार रमेश मुंडलोड यांच्या प्रकरणामुळे महसूल आणि वाळूमाफियांत छेडलेला हा संघर्ष आता कोणत्या वळणावर जातो, याकडे सामान्यांचे लक्ष लागलेले आहे.
तहसीलदार मुंडलोड १५ दिवसांवर रजेवर
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरचे तहसीलदार रमेश मुंडलोड हे १५ दिवसांच्या रजेवर गेल्याने महसूल विभागात चर्चेला उधाण आले आहे. वाळूमाफियांसोबत सलगी ठेवून कारवायांत कुचराई करणाऱ्या तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा इशारा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बुधवारी बैठकीत दिला होता. तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना कारवाईचे अहवाल सादर करण्याचेही आदेश दिले होते.
