किशनचंद तनवाणी, मधुकर देशमुख, सतीश चव्हाण यांची डोकेदुखी वाढली, विरोधाचे झेंडे फडकले, प्रतिस्पर्धी उमेदवाराशी लढण्याआधी स्वकीयांशी लढा

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभेच्‍या छत्रपती संभाजीनगर मध्य, पूर्व आणि गंगापूर मतदारसंघात महाविकास आघाडीच्‍या उमेदवारांना स्वकीयांचाच ताप झाला आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराशी लढण्याआधी त्‍यांना स्वकीयांशीच लढावे लागत आहे. त्‍यांची नाराजी दूर होण्याची चिन्‍हे दिसत नसल्याने ही डोकेदुखी निवडणुकीत कायम राहून नुकसानीला हातभार लावण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्‍यामुळे आता पक्षाच्‍या वरिष्ठांनीच मध्यस्थी […]

छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभेच्‍या छत्रपती संभाजीनगर मध्य, पूर्व आणि गंगापूर मतदारसंघात महाविकास आघाडीच्‍या उमेदवारांना स्वकीयांचाच ताप झाला आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराशी लढण्याआधी त्‍यांना स्वकीयांशीच लढावे लागत आहे. त्‍यांची नाराजी दूर होण्याची चिन्‍हे दिसत नसल्याने ही डोकेदुखी निवडणुकीत कायम राहून नुकसानीला हातभार लावण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्‍यामुळे आता पक्षाच्‍या वरिष्ठांनीच मध्यस्थी करून नाराजांची समजूत घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे गटाचे किशनचंद तनवाणी यांची उमेदवारी घोषित झाली. त्‍यांची उमेदवारी निश्चित झाली तेव्हापासून कठोर विरोध होत आहे. बाळासाहेब थोरात यांनी भाजपातून ठाकरे गटात आलेल्या तनवाणींना जोरदार विरोध केला. दीडशे पदाधिकारी-कार्यकर्ते घेऊन त्‍यांनी मुंबईत मातोश्रीवर धडक दिली होती. अंबादास दानवे यांची भेट घेऊन संताप व्यक्‍त करत राजीनामे देण्याचा इशारा दिला होता.

अजूनही ही नाराजी कायम असताना आता काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही तनवाणींच्या एकलकोंड्या भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्‍त केला आहे. तनवाणींनी अद्यापही काँग्रेस आणि शरद पवार गटाच्‍या पदाधिकाऱ्यांशी साधी चर्चा करण्याचेही सौजन्य दाखवले नाही. फोनही केला नाही, अशी नाराजी या पदाधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख युसूफ म्‍हणाले, की तनवाणींना काँग्रेसची गरजच नाही असे दिसते. ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. पण स्थानिक पातळीवर समन्वय अजिबात नाही. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन म्‍हणाले, की मुस्लिमांनी निव्वळ मत द्यायचे का?

मधुकर देशमुख यांना तीव्र विरोध
छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून माध्यमिक शिक्षणाधिकारी पदावरून निवृत्त झालेल्या मधुकर कृष्णराव देशमुख (एम. के. देशमुख) यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांत नाराजीची भावना उसळली आहे. त्‍यांना पक्षातूनच तीव्र विरोध सुरू झाला आहे. शरद पवार गटाने तर बंडखोरीची तयारी केली आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवार बदलून देण्याच्या मागणीसाठी गांधी भवनसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. शहराध्यक्ष शेख युसूफ यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तुमच्या भावना पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालण्यात येतील, असे शेख युसूफ यांनी दिले.

आंदोलनात शहर जिल्हा प्रवक्ता डॉ. नीलेश अंबेवाडीकर, अमेर अब्दुल सलीम, योगेश मसलगे, इंजि. मोहसीन, सागर साळुंके, प्रतीक पाटील, मोईन कुरेशी, अभिषेक शिंदे, विजय कांबळे, फैज खान, सूरज बचके, असमत खान, युनूस खान, संतोष दीडवाले, दुर्गेश भंडारी, सृजन गावंडे आदींनी भाग घेतला. दुसरीकडे काँग्रेसकडून पूर्व मतदारसंघात भाजपला मदत होत आहे का, असा सवाल शरद पवार गटाने केला आहे. सोमवारी पूर्वमधून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय शरद पवार गटाने घेतला. बैठकीला जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, सुधाकर सोनवणे, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, राजेश पवार, वीणा खरे, मोतीलाल जगताप, अभिषेक देशमुख आदी उपस्थित होते.

कोण आहेत मधुकर देशमुख
राजकारण आणि समाजकारणात फारसे सक्रीय नसलेले मधुकर देशमुख हे सामान्यांना फारसे परिचित नाहीत. ते २०२१ ते २०२४ या काळात छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षणाधिकारी होते. २०१८ ते २०२१ या काळात त्‍यांनी शिक्षण उपसंचालक म्‍हणूनही काम पाहिले आहे. जून २०२४ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. पूर्व मतदारसंघात ४५ ते ५० हजार मराठा मतदार आहेत. ओबीसी उमेदवार अतुल सावे यांच्याविरुद्ध मराठा उमेदवार दिल्यास मराठा आणि मुस्लिमांची मते मिळून विजयाचे गणित सुकर होईल असे सूत्र देशमुख यांनी पक्षश्रेष्ठींकडे मांडल्याचे सांगण्यात येते.

गंगापूरमध्ये चव्हाणांना टोकाचा विरोध सुरू
गंगापूर मतदारसंघातून शरद पवार गटाने आ. सतीश चव्हाण यांना शनिवारी उमेदवारी जाहीर केल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी टोकाचा विरोध सुरू केला आहे. पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर निळ यांनी निष्ठेने पक्षाचे काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर हा अन्याय असल्याचे म्‍हटले आहे. अजित पवार गटातून निलंबित केलेल्या सतीश चव्हाण यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्यापूर्वीच थेट उमेदवारी देण्यात आली. महाविकास आघाडीतील अन्य दोन पक्षांतही नाराजी व्यक्‍त होत आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही प्रचारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. उद्धव सेना या तिन्ही पक्षात चलबिचल झाली सुरू झाली आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत पक्षाचे काम करणार नाही, असा इशाराच डॉ. ज्ञानेश्वर निळ यांनी दिला आहे.

ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर म्हणाले, मविआतील कोणालाही उमेदवारी द्या. पण बाहेरच्याला उमेदवारी नको, ही आमची सुरुवातीपासून भूमिका होती; मात्र दुर्दैवाने बाहेरचा उमेदवार लादण्यात आला आहे. त्यामुळे याविषयी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर म्हणाले, की विरोध असतानाही बाहेरचा उमेदवार दिला आहे. त्यामुळे मीदेखील उमेदवारी दाखल करणार आहे. त्यानंतर दोन्ही तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहे. सतीश चव्हाण यांच्या विरोधात स्वकीयांनाच रान पेटवल्याने त्‍यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.

रिपाइं आठवले गट महायुतीवर नाराज, प्रचारावर घातला बहिष्कार…
१२ जागांची मागणी करूनही रिपाइंच्या आठवले गटाला महायुतीने एकही जागा सोडली नाही. त्‍यामुळे शनिवारी (२६ ऑक्‍टोबर) रिपाइंच्या संतप्त कार्यकर्त्यांनी महायुतीचा निषेध करत प्रचारावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. यासाठी रिपाइंच्या शहर संपर्क कार्यालयात जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीला प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम, मराठवाडा अध्यक्ष मिलिंद शेळके, राज्य उपाध्यक्ष दौलत खरात, राज्य कार्यकारिणी सदस्य किशोर थोरात, जिल्हाध्यक्ष विजय मगरे, शहराध्यक्ष नागराज गायकवाड आदींसह तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पार्किंगच्या क्षुल्लक वादातून बायजीपुऱ्यात २१ वर्षीय तरुणावर चाकूचे सपासप वार

Latest News

पार्किंगच्या क्षुल्लक वादातून बायजीपुऱ्यात २१ वर्षीय तरुणावर चाकूचे सपासप वार पार्किंगच्या क्षुल्लक वादातून बायजीपुऱ्यात २१ वर्षीय तरुणावर चाकूचे सपासप वार
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पार्किंगच्या क्षुल्लक वादातून २१ वर्षीय तरुणावर समीर नावाच्या तरुणाने चाकूने सपासप वार करून गंभीर...
३ अपघातांत एक ठार, ३ गंभीर जखमी, पैठण, सिल्लोड, गंगापूर तालुक्यातील दुर्घटना
तरुण पिढीला हे झालंय काय?; १७ वर्षीय मुलीने स्वतःला पेटवून घेतले, एका मुलाने विष पिले, दोघांनी घेतला गळफास!; वाळूज MIDC परिसरातील घटनांनी समाजमन हेलावले...
छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM ला आला सक्षम पर्याय!;  इस्लाम पक्षाची दणक्यात एंटी!!; कटकटगेट भागातील इफ्तार पार्टीला आले पक्षप्रमुख शेख आसीफ... भाजप, MIM वर सोडले टीकास्त्र 
वैजापूर बाजार समिती भाजपच्या ताब्यात, सभापतीपदी कल्याण दांगोडे बिनविरोध
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software