- News
- जिल्हा न्यूज
- आ. संजनाताई जाधव यांनी अवघे प्रशासन आणले शेतकऱ्यांच्या बांधावर!; पालकमंत्र्यांना कन्नडला बोलावून मां...
आ. संजनाताई जाधव यांनी अवघे प्रशासन आणले शेतकऱ्यांच्या बांधावर!; पालकमंत्र्यांना कन्नडला बोलावून मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा!!; पालकमंत्री म्हणाले...
कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. अशाप्रसंगी शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभे राहणे गरजेचे असून सरसकट सर्वच ठिकाणी नुकसानीचे पंचनामे करा. त्यासाठी ड्रोन, मोबाईल फोटो यांचे पुरावे ग्राह्य धरा, असे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज, २५ सप्टेंबरला कन्नड येथे दिले.
पालकमंत्री शिरसाट यांनी निर्देश दिले की, जिल्हाधिकारी यांनी आपल्यास्तरावरून मंडळ अधिकारी आणि तलाठी यांचा दररोज सायंकाळी ६ वाजता आढावा घ्यावा. शासनाने निर्देश दिल्यानुसार ड्रोन सर्व्हे करा, मोबाईल फोटो व्हिडीओचे पुरावे ग्राह्य धरून पंचनामे करा. वन विभागाने वन्य प्राण्यांचाशेतीतील शिरकाव थांबविण्यासाठी उपाययोजना राबवाव्या. शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याबाबतची प्रक्रिया राबवा. नुकसानीचा अंदाज पाहता सरसकट सगळ्याच शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्या. शेतकऱ्यांच्या पाठीशी या संकटसमयी शासन उभे आहे, असेही त्यांनी या वेळी उपस्थितांना सांगितले. या वेळी पुरात मयत झालेल्या संजय दळे या व्यक्तीच्या वारसांना सानुग्रह अनुदानाचा चार लक्ष रुपयांचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला.
पालकमंत्र्यांनी केली तालुक्यातील नुकसानीची पाहणी
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी कन्नड तालुक्यातील करंजखेड, नेवपूर, घाटशेंद्रा, टाकळी अंतूर आदी ठिकाणी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला. त्यांच्या समवेत आ. संजना जाधव, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार विद्याचरण कडवकर, गटविकास अधिकारी ओमप्रकाश रामावत, तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाट तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

