- News
- जिल्हा न्यूज
- आ. सत्तारांविरुद्ध ठाकरे गटही उभा ठाकला!; स्थानिक भाजपही विरोधात, सत्तारपुत्राचे काय होणार?
आ. सत्तारांविरुद्ध ठाकरे गटही उभा ठाकला!; स्थानिक भाजपही विरोधात, सत्तारपुत्राचे काय होणार?
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोड नगराध्यक्षपदासाठी आ. अब्दुल सत्तार यांनी आपल्या पुत्राला पुन्हा नगराध्यक्ष बनविण्याचा चंग बांधला असला तरी, त्यांच्या वाटेत मात्र अनेक काटे असल्याचे समोर येत आहे. ज्यांच्याशी पक्षीय युती आहे, त्या भाजपचे स्थानिक पदाधिकारी सत्तारांविरुद्ध आहेत. पुन्हा पुत्रालाच नगराध्यक्ष करायचे ठरवल्याने घराणेशाहीमुळे पक्षातील पदाधिकारीही काहीसे नाराज आहेत. आता ठाकरे गटही सत्तारांविरुद्ध अधिकची मेहनत घेणार असल्याचे समोर येत आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सिल्लोडमध्ये बैठक घेऊन सत्तारांविरुद्ध रणशिंग फुंकले. त्यामुळे सत्तारांना चोहोबाजूंनी घेरण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.
स्थानिक भाजप पूर्णपणे सत्तारांविरोधात आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप पदाधिकाऱ्यांची रणनिती काहीशी हुकली. त्यामुळे अवघ्या काही मतांच्या फरकाने अब्दुल सत्तार निवडून आले. नगराध्यक्षपदासाठी आ. सत्तारांनी आता पुत्रालाच उभे केल्याने काहीही करून सत्तारांच्या ताब्यात सिल्लोड नगरपालिका जाऊ द्यायची नाही, असा चंग भाजप पदाधिकाऱ्यांनी बांधला आहे. भाजप पदाधिकारी सत्तारांविरुद्ध इतके टोकाला जाण्याचे कारणही तसेच आहे. जालना लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा बिस्मिल्ला केल्यामुळे आधीच सत्तारांविरुद्ध राहिलेले भाजप पदाधिकारी अधिकच आक्रमकपणे सत्तारांविरुद्ध विधानसभा निवडणुकीत राहिले, आता त्याचा पुढचा अंक नगरपालिका निवडणुकीत दिसून येत आहे.
ऐन निवडणुकीत कोर्टाच्या आदेशाने वाढवली अडचण
आ. अब्दुल सत्तार यांनी आमदार निधीमधून प्रत्येकी १६ लाख रुपयांच्या एक अशा दोन रुग्णवाहिका खरेदी करून स्वतःच्या प्रगती शिक्षण संस्थेला दिल्या, असा आरोप आहे. तशा फौजदारी अर्जाच्या अनुषंगाने सिल्ल्लोड येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी के. टी. अधायके यांनी सिल्लोड शहर पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत हाही मुद्दा चर्चेत राहणार आहे.

