- News
- जिल्हा न्यूज
- जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ‘या’ गोष्टींना प्रतिबंध, उमेदवारांन...
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ‘या’ गोष्टींना प्रतिबंध, उमेदवारांनो, नीट वाचून घ्या, नाहीतर गोत्यात याल!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. ५ फेब्रुवारी रोजी मतदान तर ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी दिलीप स्वामी यांनी मनाई आदेश जारी केले आहेत.
३ ते ५ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचारी व्यतिरिक्त पाच किंवा जास्त लोक एकत्र येणे, मतदान केंद्राच्या १०० मिटर परिसरात मोबाईल, कार्डलेस फोन, लाऊड स्पिकर, मेगा फोन, मायक्रोफोन, वायरलेस सेट आदी वापरण्यास मनाई केली आहे. तसेच मतदानाच्या गोपनीयतेचा भंग होईल असे वर्तन करणे, मतदान केंद्रातील मतदान प्रतिनिधी, अन्य प्रतिनिधी यांनी मोबाईल वापरणे, फोटो काढणे, चित्रीकरण करणे, परवानगी दिलेल्या वाहनांखेरीज वाहनांचा वापर करणे, मतदारांची ने आण करणे. १०० मीटर परिसरात निवडणूक विषयक प्रचार करणे, मतदारांना धमकावणे, मतदारांवर दबाव टाकणे, ज्वलनशील, स्फोटक पदार्थ वस्तूची ने आण करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या आदेशाचा भंग केल्यास संबंधित व्यक्ती कलम २२३ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.
जिल्ह्यातील सर्व मतमोजणी केंद्रांच्या १०० मीटर परिसरात कोणत्याही व्यक्तीस (निवडणूक आयोगाने परवानगी दिलेल्या व नियुक्त अधिकारी व्यक्तिरिक्त) प्रवेश करण्यास, मोबाईल नेण्यास, वाहन नेण्यास ७ फेब्रुवारीला सकाळी ७ वाजल्यापासून ते मतमोजणी संपेपर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे.
निवडणूक प्रक्रिया शांततेत व निर्भयपणे पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शस्त्र परवाना देणेशस्त्र परवानाधारकांना जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात शस्त्र सोबत घेऊन फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शासकीय इमारती, त्यांचे आवार, शासकीय विश्रामगृहे यांचा राजकीय कामांसाठी वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. निवडणूक विषयक घोषवाक्य लिहिणे, होर्डिंग बॅनर लावणे, प्रचाराचा मजकूर लावण्यास मनाई करण्यात आली आहे.
परवानगीशिवाय वाहनांवर राजकीय पक्षाचे झेंडे, बोधचिन्ह लावण्यास मनाई
निवडणूक कालावधीत सक्षम प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय ॲटोरिक्षा, टेम्पो, सायकल व अन्य वाहनांवर पक्षाचे झेंडे, बोधचिन्ह व अन्य घोषवाक्य लिहिण्यास मनाई करण्यात आली आहे.
पूर्वपरवानगी शिवाय प्रचार साहित्य लावण्यास मनाई
निवडणूक प्रचारासाठीचे प्रचार साहित्य हे कोणत्याही व्यक्तिगत जागा, इमारत, भिंत, आवार येथे संबंधित मालकाच्या परवानगीशिवाय्व संबंधित परवाना देणाऱ्या प्राधिकरणाच्या परवानगी शिवाय लावण्यास मनाई करण्यात आली आहे.
मुद्रणालय मालकांना निर्बंध
निवडणूक आचारसंहिता भंग होऊ नये यासाठी राजकीय पक्ष, उमेदवार, त्यांच्या प्रतिनिधींनी मुद्रणालय मालक, प्रकाशकांना उमेदवाराचे नाव व त्यांना नेमून दिलेले चिन्ह छापणे, नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे, आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारात नमुना मतपत्रिका छापणे असे निर्बंध घालण्यात आले आहेत.
ध्वनिक्षेपकाच्या वापरावर निर्बंध
राजकीय पक्ष, उमेदवार यांना ध्वनिक्षेपकाचा वापर परवानगी शिवाय करता येणार नाही. तसेच सकाळी ६ पूर्वी व रात्री १० नंतर कोणत्याही क्षेत्रात व फिरत्या वाहनांवर वापर करता येणार नाही. कोणत्याही ठिकाणी ध्वनिक्षेपक वापराआधी संबंधित प्राधिकाऱ्यांकडून पूर्वपरवानगी घ्यावी,असे निर्बंध घालण्यात आले आहेत.
रहदारीस अडथळा करण्यास निर्बंध
निवडणूक प्रचारादरम्यान राजकीय पक्ष, उमेदवार आदी यांना निवडणूक प्रचाराचे साहित्य रहदारी अडथळा होईल किंवा अपघाथोतील अशा पद्धतीने लावण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. हे सर्व आदेश निवडणुक कालावधी पुरता लागू राहतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

