छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : वाळूज एमआयडीसी पोलिसांची अकार्यक्षमता पुन्हा एकदा समोर आली आहे. एव्हाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अनैतिक कामांना वाळूज एमआयडीसी पोलिसांचा छुपा पाठिंबा तर नाही ना, असा संशय यावा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण सलग तिसऱ्यांदा शहरातून पोलिसांनी येऊन कारवाई करून सेक्स रॅकेट उघडकीस आणले. वाळूज एमआयडीसी पोलिसांना थांगपत्ता लागत नाही, की अर्थपूर्ण व्यवहार करून छुपी परवानगी दिली जाते, अशी चर्चा सुरू झाली आहे. वाळूज एमआयडीसीतील हॉटेल डिंगडाँगजवळील एका दुमजली घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलीस उपायुक्तांच्या आदेशाने वेदांतनगर पोलिसांनी छापा मारून २ तरुणींची सुटका केली. एका ग्राहकाला पकडले तर कुंटणखाना चालविणाऱ्या दोघांसह त्यांना घर भाड्याने देणाऱ्या घरमालकाविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (७ नोव्हेंबर) रात्री आठच्या सुमारास करण्यात आली.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रविणा यादव यांच्यावर या कारवाईची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर प्रविणा यादव यांनी आपल्या सहकाऱ्यांना बोलावून कारवाईचा प्लॅन आखला. त्यांनी सहकाऱ्यांना सांगितले, की वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल डिंगडाँगजवळ एका दुमजली घरात काही महिलांना डांबून ठेवले असून, त्यांच्याकडून जबरदस्ती वेश्याव्यवसाय करवून घेतला जात आहे. एका तासासाठी प्रतिग्राहक १५०० रुपये घेतात व संभोगासाठी महिला उपलब्ध करून देतात. कारवाईचा प्लॅन ठरल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रविणा यादव, पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे आणि अन्य सहकारी आपापल्या खासगी वाहनाने सायंकाळी साडेसातला हॉटेल डिंगडाँगजवळील कुंटणखाना असलेल्या दुमजली घराजवळ आले.
आधी ४० वर्षीय बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्याचे ठरले. त्याच्याकडे ५०० रुपयांच्या ३ नोटा देण्यात आल्या व खात्री झाल्यानंतर इशारा करायला सांगितला. बनावट ग्राहक दुमजली घरात गेल्यानंतर पोलीस पथक आडोशाला थांबले. बनावट ग्राहकाने खिडकीत येऊन हाताची बाही वर करताच पथकाला इशारा कळला आणि लगेचच कुंटणखान्यावर हल्लाबोल करण्यात आला. पोलीस पहिल्या मजल्यावर गेले असता २ रूम आढळल्या. त्यापैकी पहिल्या रूमचा दरवाजा आतून बंद होता. त्यातून बनावट ग्राहक बाहेर आला. त्या खोलीत एक २६ वर्षांची तरुणी होती. तिला अहिल्यानगरहून या ठिकाणी आणण्यात आले होते. दुसरी रूम पोलिसांनी उघडायला सांगितली. त्यातून २९ वर्षीय तरुणी बाहेर आली. ती अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील एका गावातील असल्याचे समोर आले. तिच्यासोबत वैजापूर तालुक्यातील खिर्डी (पोस्ट मनूर) येथील २० वर्षीय तरुण आढळला. दोन्ही युवतींनी पोलिसांना सांगितले, की आम्हाला केटरिंगच्या कामासाठी बोलावून आमच्याकडून या ठिकाणी वेश्या व्यवसाय करवून घेतला जात आहे. ग्राहकाकडून जास्त पैसे घेऊन आम्हाला कमी पैसे देतात. पोलिसांनी दोन्ही खोल्यांतून मोबाइल, कंडाम असा एकूण २७ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तिसऱ्या रूममध्ये २३ वर्षीय तरुण मिळून आला. तो साईनगर, सिडको एन ४ छत्रपती संभाजीनगर येथील असल्याचे समोर आले. या ठिकाणी महिला संभोगासाठी मिळत असल्याचे कळल्यावरून तो आला होता. महिला मिळविण्यासाठी त्याने सागर हॉटेलचा मालक विकी हायलिंगे याच्या मोबाइलवर १५०० रुपये पाठवल्याचे सांगितले. या ठिकाणी राहुल बनकर (रा. रांजणगाव शेणपुंजी, वाळूज एमआयडीसी परिसर) हाही महिलांना डांबून ठेवून वेश्या व्यवसाय करवून घेतो, असे त्याने सांगितले. दोन्ही तरुणींना पोलिसांनी विचारले, की तुम्हाला येथे कुणी डांबून ठेवले आहे का? त्यावर दोन्ही तरुणींनी सांगितले, की आम्हाला सागर हॉटेलच्या मालकाने या ठिकाणी आणून डांबून ठेवले आहे. याप्रकरणात पोलीस अंमलदार देविदास गढवे यांच्या तक्रारीवरून सागर हॉटेलचा मालक विकी हायलिंगे आणि राहुल बनकर (रा. रांजणगाव शेणपुंजी) यांच्यासह घरमालक अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.