छत्रपती संभाजीनगरात २ भीषण अपघात : नियंत्रण सुटून दुचाकीस्वार तरुणाचा, ट्रकच्या धडकेने मोपेडस्वार युवतीचा मृत्यू

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडलेल्या २ भीषण अपघातांनी २ बळी घेतले आहेत. सुसाट ट्रकच्या धडकेने मोपेडस्वार युवतीचा मृत्‍यू झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील भगवान महावीर चौकातील उड्डाणपुलावर घडली, तर कन्नड तालुक्यातील कन्नड-पिशोर मार्गावर दुचाकीवरील नियंत्रण सुटून तरुणाचा मृत्‍यू झाला.

लोटाकारंजा परिसरातील रहिवाशी अजरा सय्यद अब्बास अली (वय ३२) या गुरुवारी (८ जानेवारी) मध्यरात्री १२ च्या सुमारास रेल्वेस्थानक परिसरातून मोपेडवरून मध्यवर्ती बस स्थानकाकडे येत होत्या. आरटीओ कार्यालयाकडून सुसाट वेगात पुलावर चढलेल्या ट्रकने त्यांना मागून धडक दिली. यात अजरा यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. नागरिकांनी त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक ट्रकसह पसार झाला. छावणी पोलिसांनी अपघाताची नोंद करून त्याचा शोध सुरू केला. अजरा या गृहिणी होत्या. कुटुंबासह राहत होत्या. त्यांना ३ वर्षांची एक मुलगी आहे.

दुसऱ्या घटनेत, मयूर अनिल बाविस्कर (वय २९, रा. भिलपलटण, कन्नड) आजोबाच्या अंत्यविधीसाठी पिशोरला गेला होता. कन्नड-पिशोर रस्त्याने घरी परतत असताना शुक्रवारी दुपारी ३ वाजता दुचाकीवरील नियंत्रण सुटून ती रस्त्याखाली जात लोखंडी खांबाला धडकली. यात मयूरच्या डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाला. गावकऱ्यांनी धाव घेऊन मयूरला कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मयूरच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दर मिनिटाला वाढताहेत फ्‍लॅटच्या किंमती

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software