- News
- सिटी क्राईम
- Follow up Story : अवैध इंटरनॅशनल कॉल सेंटरच्या तपासात FBI ची एंट्री!; फारूकीच सूत्रधार, पण ‘जॉन’ कोण...
Follow up Story : अवैध इंटरनॅशनल कॉल सेंटरच्या तपासात FBI ची एंट्री!; फारूकीच सूत्रधार, पण ‘जॉन’ कोण ?
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : चिकलठाणा एमआयडीसीतील आयटी पार्कमध्ये आयआरएस इंटर्नल रेव्हेन्यू सर्व्हिस इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट नावाने सायबर गुन्हेगारांनी अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर उघडले होते. त्याद्वारे अमेरिकेत शेकडो कॉल करून तिथल्या नागरिकांना करचुकवल्याबद्दल किंवा वेगवेगळ्या योजनांची आमिषे दाखवून, धमकावून कोट्यवधी रुपयांनी गंडविण्यात येत होते. फसवणूक झालेल्यांची प्राथमिक माहिती अमेरिकेने छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांना पाठवली असून, संपूर्ण यादी लवकरच समोर येणार असल्याचे तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांनी न्यायालयात सांगितले. त्यानंतर न्यायालयाने रॅकेटचा सूत्रधार अब्दुल फारूक मुकदम शाह उर्फ फारूकी याला ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
छत्रपती संभाजीनगरच्या आधी सात महिन्यांपूर्वी मध्यप्रदेशातील रायपूरमध्ये फारूकीचे हे कॉल सेंटर सुरू होते. स्थानिक पोलिसांनी गस्त घालताना एकेदिवशी कॉल सेंटर गाठले होते. त्यामुळे घाबरून फारूकीने तिथून बस्तान गुंडाळले. त्याला गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्लीवरून हवाल्याद्वारे रोख रक्कम पुरवली जात होती. त्यातून तो कर्मचाऱ्यांचा दैनंदिन खर्च भागवायचा. तो कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुण- तरुणींवर लक्ष ठेवून असायचा. ते काय आणि कुणाशी बोलतात, यावर त्याचे बारकाईने लक्ष असायचे. त्यांना लागणाऱ्या सर्व वस्तू, मेडिकलही पोहोचवले जायचे. मात्र बाहेर पडू दिले जात नव्हते. त्यांच्या राहण्यासाठी मोंढा नाका, एन-२, गजानन मंदिर परिसर, बालाजीनगर या भागात स्वतंत्र फ्लॅट भाड्याने घेण्यात आले होते. ऑफिस व राहण्याचे केवळ महिन्याचे भाडे ९ लाख रुपये फारूकी देत होता.
करचुकवेगिरीबद्दल अमेरिकन नागरिकांना बनावट कायदेशीर नोटीस पाठवली जायची. भीती घालून अमेरिकन नागरिकांना गिफ्ट कार्ड घेण्यास भाग पाडले जायचे. त्यांच्या कार्डचा १६ अंकी कोड मिळवताच जॉन तो कोड रिडिम करून डॉलरची रक्कम बिटकॉइनमध्ये आणि नंतर रुपयांमध्ये रुपांतरीत केली जायची. यातून शासनाचीही फसवणूक होत होती. दरम्यान, पोलिसांना जॉन नावाच्या व्यक्तीचा केवळ आयडी मिळाला असून, तो खरंच व्यक्ती आहे की, आभासी आहे, हे तपासात समोर येईलच. आता अटकेतील मुख्य सहा संशयित भावेश प्रकाश चौधरी, भाविक शिवदेव पटेल, सतीश शंकर लाडे, वलय पराग व्यास, अजय ललित ठाकूर, मनोवर्धन राठोड (सर्व रा. अहमदाबाद, गुजरात) आणि फारुकीची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे. एकमेकांच्या संपर्कापासून तर प्रशिक्षणापर्यंतची माहिती समोर येईल, अशी शक्यता आहे.
कारवाईची पार्श्वभूमी...
सिडको एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी (२८ ऑक्टोबर) या अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरवर छापा मारून ११६ तरुण-तरुणींना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून ११९ लॅपटॉप व मोबाइलसह अन्य तांत्रिक, डिजिटल साधने असा कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. भावेश प्रकाश चौधरी, भाविक शिवदेव पटेल, सतीश शंकर लाडे, वलय पराग व्यास, अब्दुल फारूक मुकदम शाह ऊर्फ फारुकी, अजय ललित ठाकूर, मनोवर्धन राठोड आणि जॉन (सर्व रा. अहमदाबाद, गुजरात) अशी मुख्य संशयितांची नावे समोर आली होती. कॉल सेंटरमधील तरुण-तरुणी कॉल, मेसेज करून अमेरिकेतील नागरिकांना कर चुकवेगिरीवर कारवाईसह विविध योजना, कर्ज, डिजिटल अरेस्टची भीती दाखवून ऑनलाइन गंडा घालायचे. कामांची विभागीय अमेरिकेतील राज्यनिहाय केलेली होती. लुटीचा ४५ टक्के वाटा जॉन नावाच्या संशयिताला मिळायचा. उर्वरित ५५ टक्क्यांत भावेश, सतीश, वलय, अब्दुल यांचा वाटा असायचा. कॉल करणाऱ्या तरुण-तरुणींना २५ ते ३५ हजार रुपये पगार देण्यात येत होता. फसवणूक केल्यानंतर प्रत्येक डॉलरवर ३ रुपये एवढा इन्सेन्टिव्ह दिला जात होता.
प्रत्येक नागरिकाची किमान २ ते ३ हजार डॉलर इतकी फसवणूक केली जायची. यातून प्रत्येक कर्मचाऱ्याला किमान ६ ते ९ हजार रुपये एवढी रक्कम मिळायची. त्यामुळे प्रत्येक कर्मचारीही आपल्या हातून फसवणूक करण्यासाठी धडपड करायचा. इन्सेन्टिव्हसाठी कर्मचारीही इतके झपाटले होते, की ओव्हरटाइमही करत. कॉल सेंटर चालवणारे भामटे गुजरातचे आहेत. त्यांनी सुरुवातीला गुजरातमधून हे रॅकेट चालवले. तिथे भंडाफोड झाल्यानंतर मध्यप्रदेशच्या रायपूरमध्ये सेटअप हलवला. तिथे पोलिसांना कुणकुण लागताच छत्रपती संभाजीनगरची निवड केली. भावेश, भाविक, सतीश, वलय, अजय, मनोवर्धन यांना ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. उर्वरित १०९ जणांची १९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत (हर्सूल जेल) रवानगी करण्यात आली आहे. कॉल करणारे तरुण-तरुणी नागालँड, आसाम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, सिक्कीमसह उत्तरप्रदेश, तेलगंण, गुजरात आणि महाराष्ट्रातील आहेत. बहुतांश जण अभियांत्रिकी शिक्षण घेतलेले आहेत. या कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला काही दिवसांपूर्वी कामावरून काढून टाकण्यात आले होते. त्यानेच रागातून पोलिसांना टीप दिली आणि मोठे रॅकेट उघडकीस आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

