Exclusive : मध्यरात्रीतून सर्रास वाळूची तस्करी! हायवा, त्यामागे अलिशान वाहने, फुलंब्रीच्या वाकोदहून थेट धडकतात छत्रपती संभाजीनगरात!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : फुलंब्री आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यात सध्या सर्रास रेती तस्करी घडताना दिसत आहे. महसूल अधिकाऱ्यांचे होणारे अर्थपूर्ण दुर्लक्ष याला कारणीभूत ठरत असून, मध्यरात्रीतून विनानंबरचे हायवा फुलंब्रीच्या वाकोदहून निघतात आणि मधल्या मार्गाने छत्रपती संभाजीनगर गाठतात. विशेष म्हणजे, हे हायवा धावतात तेव्हा त्यांच्या मागेपुढे अलिशान वाहनांचा ताफा असतो. आज, १० जानेवारीला पहाटे छत्रपती संभाजीनगर सिटी न्‍यूजने नायगाव (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे ही रेती तस्करी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत टिपली.  जिल्हाधिकारी या अवैध रेतीतस्करीकडे लक्ष देतात का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

अलीकडेच छत्रपती संभाजीनगरच्या तहसीलदारपदाची सूत्रे हाती घेतलेल्या डॉ. शिवानंद बिडवे यांनी रूजू झाल्यानंतर वाळूमाफिया, गौणखनिज माफियांवर कठोर कारवाईचा इशारा दिला होता. त्यांचा हा इशारा केवळ पत्रप्रपंचापर्यंतच मर्यादित राहिला. सध्या सर्रास अवैध गौणखनिज उत्खनन तर सुरूच आहे, पण रेती माफिया इतके शिरजोर झाले आहेत, की ते त्यांना ना कायद्याचा धाक उरला, ना कारवाईची भीती. महसूल आणि पोलीस प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षामागे राजकीय वरदहस्त, पैसे की आणखी काही?
छत्रपती संभाजीनगर आणि फुलंब्री तालुक्याच्या पट्ट्यात रेती तस्करी करणारे ७ ते ८ माफिया असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यात वडोदबाजारच्या एका पोलिसाचेही वाहन असल्याची चर्चा आहे. बिनदिक्कतपणे अवैध रेती उपसा करून ही वाहने वाकोद येथून छुप्या मार्गाने नायगावमधून छत्रपती संभाजीनगरच्या परिसरात दाखल होतात. शहराच्या आसपास सध्या मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. सध्या काळ्या बाजारात ३५ हजार रुपयांपर्यंत एक हायवा भरून रेती मिळते. त्यामुळे लाखो रुपयांची कमाई या माध्यमातून रेतीमाफियांची होत आहे. त्यांना आवर घालण्यात महसूल प्रशासन अपयशी ठरले आहे. मात्र ते आर्थिक सलोख्यामुळे की माफियांवर असलेल्या राजकीय वरदहस्तामुळे हे कळायला मार्ग नाही. अर्थात ही दोन्ही कारणे यामागे असू शकतात, अशीही चर्चा आहे. 

गावकरी परेशान...
वाकोदहून रेती माफियांचे सुसाट हायवा निघतात तेव्हा त्यामागे-पुढे अलिशान वाहनांचा थांबा असतो. ही वाहने खेड्यापाड्यांतून मध्यरात्री धावतात. त्यामुळे त्या त्या गावांतील गावकरी त्रासून गेले आहेत. रस्त्यांची तर वाट लागलीच आहे, पण वाहनांच्या त्रासामुळे संताप व्यक्त होत आहे. हायवाच्या मागे धावणारी सायरन वाजवत धावत असल्याचेही गावकऱ्यांचे म्हणणे आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दर मिनिटाला वाढताहेत फ्‍लॅटच्या किंमती

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software