- News
- सिटी क्राईम
- छत्रपती संभाजीनगर शहरात धुमाकूळ घालणारी दुचाकीचोरांची टोळी पकडली!; जवाहरनगर पोलिसांची कामगिरी, सव्वा...
छत्रपती संभाजीनगर शहरात धुमाकूळ घालणारी दुचाकीचोरांची टोळी पकडली!; जवाहरनगर पोलिसांची कामगिरी, सव्वा आठ लाखांची १४ वाहने जप्त
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहरातून गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर दुचाकी चोरीच्या घटना समोर येत होत्या. या घटनांचा छडा अखेर जवाहरनगर पोलिसांनी लावला असून, तिघांची टोळी जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून सव्वा आठ लाख रुपयांची १४ दुचाकी वाहने जप्त केली आहेत. समर्थ विनोद काळे (वय २२, रा. हैदर कुरेशी यांच्या घरात किरायाने सिल्लेखाना), पवन परमेश्वर चौधरी (वय १८, रा. न्यू पहाडसिंगपुरा, पवननगर बेगमपुरा) आणि सोहेल शैकद बेग (वय २७, रा. भाजीबाजार छावणी) अशी या संशयित चोरट्यांची नावे आहेत.
सोहेल बेगला पोलिसांनी एपीआय कॉर्नरच्या मारुती सुझुकी शोरूम समोरून ताब्यात घेतले. तिघांना रविवारी (२३ नोव्हेंबर) न्यायालयात हजर केले असता २ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. पोलीस कोठडीदरम्यान समर्थ काळे याने पवन चौधरीसोबत मिळून छत्रपती संभाजीनगर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चोरी केलेल्या मोटारसायकली या म्हाडा कॉलनी, मयुरबन कॉलनीजवळील मोकळ्या मैदानाच्या झाडाझुडूपात विक्री करण्याच्या उद्देशाने लपवून ठेवल्याचे सांगितले. सोहेल बेग याने चोरीच्या मोटारसायकली एपीआय कॉर्नर, गजानन वाईन शॉपसमोरील सर्व्हिस रोडच्या बाजूला चक्क विक्रीसाठी लावल्या होत्या.
चोरीसाठी स्कुटीला पसंती...
तिघांनी मिळून शहरातून एकूण १ बुलेट, २ मोटासायकली, ११ स्कुटी अशी एकूण १४ वाहने चोरल्याची कबुली दिली. ही सर्व ८ लाख २५ हजार रुपयांची दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. ही वाहने तिघांनी जवाहरनगर, क्रांतीचौक, सिटीचौक, सिडको, उस्मानपुरा, वेदांतनगर, जिन्सी, वाळूज एमआयडीसी, बेगमपुरा, छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरली होती. ही धडाकेबाज कामगिरी पोलीस आयुक्त विरेंद्र मिश्र, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलीस आयुक्त मनिष कल्याणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचे तपासिक अंमलदार इंदलसिंग महेर, पोलीस अंमलदार अनिल भाले, मारोती गोरे, संदीप बिलारी, प्रविण कापरे, चालक मंगेश घुगे, सतिश सानप, विजय सुरे यांनी केली.

