- News
- सिटी क्राईम
- कहानी में व्टिस्ट : छत्रपती संभाजीनगरचे हनी ट्रॅपचे प्रकरण लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात बदलले!; तर...
कहानी में व्टिस्ट : छत्रपती संभाजीनगरचे हनी ट्रॅपचे प्रकरण लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात बदलले!; तरुणीच्या तक्रारीवरून बँक शाखा व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल, वेगवेगळ्या लॉजवर नेत कर्जाच्या आमिषाने जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : गतवर्षीचे एक प्रकरण पुन्हा ताजे झाले आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकवून २५ वर्षीय तरुणीने कथीत सामाजिक कार्यकर्त्यासह मिळून खंडणी मागितल्याची तक्रार बँक शाखा व्यवस्थापकाने जवाहरनगर पोलीस ठाण्यात केली होती. त्यावरून १५ ऑक्टोबर २०२४ रोजी २५ वर्षीय तरुणी व तिच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. आता या कहानीत व्टिस्ट आला आहे. ब्यूटी पार्लरसाठी कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखवून पंजाब नॅशनल बँकेच्या सिडको शाखा व्यवस्थापकाने आपल्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करत तरुणीने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशाने आता वर्षभराने या प्रकरणात दौलताबाद पोलिसांनी बँक शाखा व्यवस्थापक दीपक महादू येळणे (वय ३७, संस्कृत व्हिला अपार्टमेंट, जवाहरनगर कॉलनी, गारखेडा परिसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
१५ ऑक्टोबर २०२४ रोजी बँक शाखा व्यवस्थापकाने दिलेल्या तक्रारीनुसार, तरुणीने ब्युटी पार्लरसाठी कर्ज हवे असल्याचे सांगितले. शहनिशा केल्यानंतर व्यवस्थापकाने निकषात बसत नसल्याने कर्ज मंजूर होऊ शकणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर तरुणीने काही दिवसांनी व्यवस्थापकाला मेसेज पाठवणे सुरू केले. गोड गोड बोलून व्यवस्थापकाला छायाचित्र पाठवून जाळ्यात ओढले. व्यवस्थापकही तिच्या जाळ्यात अडकत गेला. तरुणीने प्रेमाचे नाटक सुरू केले. भेटीगाठी वाढून विविध लॉजवर शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तरुणीने आग्रह करून व्यवस्थापकाला एका फार्म हाऊसवर नेले. तेथे शारीरिक संबंध प्रस्थापित करताना त्याचे चोरून चित्रण केले. कथित सामाजिक कार्यकत्याने ते व्हिडीओ बँक व्यवस्थापकाला दाखवून प्रकरण मिटविण्यासाठी सर्व कर्जाचे अर्ज मंजूर करून ४० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी बँक व्यवस्थापकाने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी तरुणी आणि कथित सामाजिक कार्यकर्त्याला रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला. सिडको चौकात सामाजिक कार्यकर्त्याने बँक व्यवस्थापकाला गाठले. व्यवस्थापकाने त्यांना गुंतवून ठेवण्याची गरज असताना भांबावून गेला. त्याची अवस्था पाहून सामाजिक कार्यकर्त्याला संशय आला. दुरून पोलीस येत असल्याचे पाहून तरुणी व सामाजिक कार्यकर्त्याने पैशांची बॅग घेऊन पळ काढला. घटनेनंतर पोलिसांनी त्यांचे घर गाठले. मात्र ते मिळून आले नव्हते.

