- Marathi News
- सिटी क्राईम
- हनुमाननगरमधील घरफोडीचा ५ दिवसांत पर्दाफाश!; ६ चोरट्यांना अटक, शहरातील चालू वर्षातील सर्वांत मोठी घरफ...
हनुमाननगरमधील घरफोडीचा ५ दिवसांत पर्दाफाश!; ६ चोरट्यांना अटक, शहरातील चालू वर्षातील सर्वांत मोठी घरफोडी
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चालू वर्षातील शहरातील सर्वांत मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश अवघ्या ५ दिवसांत पोलिसांनी केला आहे. हनुमानगरमध्ये मंडप व्यावसायिक अमित शिंदे यांचे घर फोडून ६७ लाख रुपयांचा एेवज चोरट्यांनी १ जुलैच्या मध्यरात्रीनंतर पाउणेदोनच्या सुमारा चोरून नेला होता. या गुन्ह्याचा झटपट तपास करत शहर गुन्हे शाखेने सहाजणांना अटक केली असून, सात महिन्यांपासून शिंदेंकडे काम […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चालू वर्षातील शहरातील सर्वांत मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश अवघ्या ५ दिवसांत पोलिसांनी केला आहे. हनुमानगरमध्ये मंडप व्यावसायिक अमित शिंदे यांचे घर फोडून ६७ लाख रुपयांचा एेवज चोरट्यांनी १ जुलैच्या मध्यरात्रीनंतर पाउणेदोनच्या सुमारा चोरून नेला होता. या गुन्ह्याचा झटपट तपास करत शहर गुन्हे शाखेने सहाजणांना अटक केली असून, सात महिन्यांपासून शिंदेंकडे काम करणाऱ्या विनोद उत्तम पातारे (वय ३०, रा. बालाजीनगर) यानेच एकूण ऐवजाच्या ३० टक्के कमिशनवर कुख्यात गुन्हेगारांना मालकाचे घर फोडण्यासाठी सुपारी दिल्याचे समोर आले आहे.

घरफोडी केल्यानंतर दुचाकीवरून चोरटे जात होते, त्यातील दीपकला एका गुन्हेगाराने ओळखले. दीपक विष्णुनगरात त्याच्या खोलीवर असल्याचे कळताच गुन्हे शाखेच्या पथकाने जाऊन त्याच्या मुसक्या आवळल्या. दीपकनंतर संकेत, मनोहर यांनाही तातडीने अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर विनोद, विजय हाती लागले. त्यांच्याकडून सोने विकत घेणारा सराफा व्यावसायिक शहाणेच्याही मुसक्या आवळल्या.
विनोद पातारे हे ७ महिन्यांपासून शिंदे यांच्याकडे कामाला होता. तो साऊंड सिस्टिमचे काम सांभाळत होता. १० हजार रुपये पगार त्याला होता. मालकाचा विश्वास संपादन केल्याने त्याचे अनेकदा शिंदे यांच्या घरी येणे जाणे असायचे. पगारासह इतर खर्चासाठी मालक नेहमीच घरातूनच पैसे आणत होते. २२ जूनला मालक तीर्थयात्रेला निघाले तेव्हा त्यांच्या बॅगा गाडीत ठेवायलाही विनोद होता. यावेळी त्याच्यादेखतच घरातील वैभवाची चर्चा शिंदे कुटुंबीयांना भोवली. विनोद सर्व ऐकत होता. यातून त्याला मोह अन् घरफोडीचा कट रचला गेला…
असा रचला कट…
दारूच्या पार्टीत पातारे व बिरारेने घरफोडीचा कट रचला. मिळालेल्या ऐवजापैकी ३० टक्के कमिशन एकट्या पातारेने मागितले. उर्वरित ७० टक्क्यांची वाटणी चौघांत करण्याचे ठरले. बिरारेने यासाठी दीपकच्या टोळीची निवड केली. सोमवारी सर्वांनी सोबत दारू पिऊन दीपक, संकेत, मनोहरने घर फोडले. ते मोजण्यासाठी शहाणेकडून यंत्रदेखील आणले. मंगळवारी वृत्तपत्रांत त्यांनी आपल्या कारनाम्याच्या बातम्या वाचल्या. त्यानंतर लोणावळ्याला जाण्यासाठी त्यांनी ७ आसनी कारही बुक केली होती. मात्र, त्याआधीच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. नशेत असलेल्या दीपक, संकेत यांनी चोरी करताना २१ तोळ्यांची बॅग घरातच ठेवली. शिंदे कुटुंबाला ती नंतर मिळून आली. गुन्हे शाखेने एकूण २३ तोळे सोने, १३ हजार रुपये जप्त केले. बिरारे कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध २०१३ पासून २३ गुन्हे आहेत. मनोहर ससेवर ४, तर दीपक शिंदेवर ५ गुन्हे दाखल आहेत. शहाणे गोल्ड कंपनीत खोटे दागिने ठेवून कर्ज हडप करण्याच्या २०२० च्या घोटाळाचा मास्टरमाईंड आहे. त्याच्याविरुद्ध ९ गुन्हे दाखल आहेत, हे विशेष.
आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी…
सहाही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. ही धडाकेबाज कारवाई सहायक फौजदार सतीश जाधव, संदीप तायडे, प्रकाश गायकवाड, नवनाथ खांडेकर, बाळू लहरे, अमोल शिंदे, संदीप राशिनकर, धर्मराज गायकवाड, काकासाहेब आधाने, तात्याराव शिनगारे, संतोष चौरे यांनी कारवाई केली.
