- Marathi News
- सिटी क्राईम
- एसटी बसमधून उतरताच हालचाली संशयास्पद, हटकताच पळू लागला… पोलिसांना खात्री पटली, कुछ तो गडबड है… पाठला...
एसटी बसमधून उतरताच हालचाली संशयास्पद, हटकताच पळू लागला… पोलिसांना खात्री पटली, कुछ तो गडबड है… पाठलाग करून पकडल्यावर बॅगमध्ये आढळले साडेसात लाख रुपये, सोन्याचे दागिने!!, सिडको बसस्थानकावर मोठी कारवाई, पश्चिममध्येही पकडले ४.८० लाख
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : एसटी बसमधून उतरलेल्या तरुणाच्या हालचालींवर संशय आल्याने सिडको बसस्थानकावर नियुक्त स्थिर सर्वेक्षण पथकाने त्याला थांबण्याचा इशारा केला. मात्र तो पळू लागला. त्यामुळे काहीतरी गडबड असल्याची खात्री पथकाला पटली. त्यांनी पाठलाग करून त्याला पकडले असता त्याच्या बॅगमध्ये तब्बल साडेसात लाख रुपये रोख आणि सोन्याचे दागिने मिळून आले. मुकुंदवाडी पोलिसांनी रोख रक्कम, […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : एसटी बसमधून उतरलेल्या तरुणाच्या हालचालींवर संशय आल्याने सिडको बसस्थानकावर नियुक्त स्थिर सर्वेक्षण पथकाने त्याला थांबण्याचा इशारा केला. मात्र तो पळू लागला. त्यामुळे काहीतरी गडबड असल्याची खात्री पथकाला पटली. त्यांनी पाठलाग करून त्याला पकडले असता त्याच्या बॅगमध्ये तब्बल साडेसात लाख रुपये रोख आणि सोन्याचे दागिने मिळून आले. मुकुंदवाडी पोलिसांनी रोख रक्कम, दागिने जप्त केले. बुधवारी (२३ ऑक्टोबर) रात्री ११ ला ही कारवाई करण्यात आली.
अजिजकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने तो सराफ्याकडे नोकरीला असल्याचे सांगितले व हा दागिन्यांचा पैसा असल्याचे म्हणाला. मात्र नोटांचे बंडल कोरे करकरीत असल्याने पोलिसांचा संशय बळावला. तो मूळचा पश्चिम बंगालचा असून मतदान कार्ड मात्र छत्रपती संभाजीनगर शहरातील कबाडीपुऱ्याचे आहे. त्याबाबतही तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्याला आता सात दिवसांत पैसे आणि दागिन्यांबाबत खुलासा करावा लागणार आहे.
छत्रपती संभाजीनगर पश्चिममध्ये जप्त केले ४.८० लाख रुपये
छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात बुधवारी सकाळी ए. एस. क्लब येथे स्थित सर्वेक्षण पथकाकडून वाहनांची कसून तपासणी सुरू असताना खासगी वाहनात ४ लाख ८० हजार रुपये मिळून आले. याबाबत संबंधिताकडे चौकशी केली असता त्याने घराचा व्यवहार करण्यासाठी पैसे असल्याचे सांगितले. मात्र त्याला पुरावा सादर करता आला नाही. त्यामुळे पथकाने त्याला पुरावा आणायला सांगत, पंचनामा करून रक्कम वरिष्ठ कोषागार कार्यालयात जमा केली.
