- News
- जिल्हा न्यूज
- संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ.
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठणच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता गहाण ठेवून उचललेल्या ३० कोटींच्या कर्जापैकी तब्बल १६ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी कारखान्याचे सर्वेसर्वा तथा ठाकरे सेनेचे उपनेते सचिन विक्रमराव घायाळ व मे. सचिन घायाळ शुगर प्रा. लि. च्या इतर भागधारकाविरुद्ध २६ फेब्रुवारीला पैठण एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करणार येणार असून, चौकशी आणि योग्य ती कारवाई सुरू असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधिमंडळात दिली आहे.
प्रादेशिक सहसंचालक (साखर) छत्रपती संभाजीनगर यांनी सुरेश काकडे यांची श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखाना मर्यादित एकनाथनगर ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर या कारखान्याच्या लेखा परीक्षणासाठी नियुक्ती केली होती. त्यानुसार त्यांनी कारखाना व्यवस्थापनास पत्र लिहून चाचणी लेखापरिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रांची मागणी केली. मात्र, कारखाना व्यवस्थापनाने त्यास प्रतिसादच दिला नाही. त्यामुळे लेखा परीक्षकांनी अखेर कारवाईचा प्रस्ताव प्रादेशिक सहसंचालकांकडे (साखर) सादर केला. त्यानुसार प्रादेशिक सहसंचालकांनी काकडे यांना कारवाई करण्यासाठी प्राधिकृत केले. त्यानुसार काकडे यांनी कारखान्याचे बँक खाते असलेल्या बँका, पतसंस्था, सचिन घायाळ शुगर प्रा.लि. कारखान्याचे तत्कालीन चेअरमन तुषार काशिनाथ शिसोदे यांना पत्रे देऊन माहिती उपलब्ध करून देण्याबाबत कळवले. उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी चाचणी लेखापरिक्षण पूर्ण करून त्याचा अहवाल प्रादेशिक सहसंचालकांना सादर केला आहे. या माहितीनुसार, सचिन घायाळ शुगर प्रा.लि.तर्फे सचिन विक्रमराव घायाळ (रा. पन्नालालनगर, पैठण) यांनी ‘बुलडाणा अर्बन'कडून ३० कोटींचे कर्ज घेतले होते. विठ्ठल बाबासाहेब आगळे (रा. गिरजादेवी हौसिंग सोसायटी, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर), अभिरुची सचिन घायाळ (रा. पन्नालालनगर, पैठण), तुषार काशिनाथ शिसोदे (रा. मातोश्री तारक हौसिंग सोसायटी, बीडबाय पास मार्ग, छत्रपती संभाजीनगर) व रोहित शाम लोंढे (रा. साळुंके विहार रोड, कोंडवा खुर्द, पुणे) हे या कर्जासाठी या कर्जाला सहकर्जदार- जामिनदार होते. कर्ज मागणी अर्जानुसार व करारपत्रानुसार हे कर्ज व्यायवसायिक असून, ते महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादीत यांचेकडील एकरकमी कर्ज परतफेड योजना २०२१ नुसार परतफेड करण्यासाठी व कारखान्याच्या अधिनुकीकरण व विस्तारीकरणासाठी घेतल्याचे म्हटले होते. यासाठी मुधलवाडी येथील छत्रपती संभाजीनगर - पैठण रस्त्यावरील गट नं. 166 ते 178 (45.71 हेक्टर जमिन) व त्यावरील कारखाना इमारत, गोदाम, ऑफिस, पेट्रोलपंप, कर्मचारी कॉलनी आदी तसेच कारखान्यातील प्लॉट व मशिनरी आदी मालमत्ता गहाणखत करून तारण ठेवण्यात आली आहे. कर्जदाराच्या वतीने सचिन घायाळ, संत एकनाथ कारखान्याच्या वतीने तत्कालीन चेअरमन तुषार शिसोदे व बुलडाणा अर्बनचे प्रभारी कार्यकारी संचालक रोहित शाम लोंढे यांच्यात व बुलडाणा अर्बनच्या प्रभातरोड, पुणे शाखा यांच्यात रीतसर गहाणखत करारनामा करण्यात आला.
पतसंस्थेची मेहरबानी
गहाणखत होताच त्याच दिवशी बुलडाणा अर्बनने तातडीने ३० कोटींची रक्कम सचिन घायाळ शुगर प्रा.लि. यांना बुलडाणा अर्बन संस्थेच्या प्रभात रोड शाखा येथून वितरीत करण्यात आले. यात आरटीजीएसद्वारे १३ कोटी १७ लाख ३० हजार रुपये महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादित बँकेच्या खात्यावर वर्ग करण्यात आले, तर ८२ लाख ८ हजार रुपये भाग, प्रोसेसींग व जीएसटी पोटी कपात करून कर्जाची उर्वरित रक्कम सचिन घायाळ शुगर प्रा.लि. यांच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यावर वर्ग करण्यात आले. यामध्ये ३० ऑगस्ट २०२१ रोजी ६ कोटी, १ सप्टेंबरला ५ कोटी, २ सप्टेंबरला ६ लाख १३ हजार ८९० रुपये तर ६ सप्टेंबरला ४ कोटी ९४ लाख रुपये अशा चार टप्प्यांत सचिन घायाळ शुगर्सच्या एचडीएफसी बँक खात्यात वर्ग करण्यात आले. यापैकी २ सप्टेंबरला दिलेली ६ लाख १३ हजार ८९० रुपयांची रक्कम इतर खाती वर्ग केल्याचे बुलडाणा अर्बन को-ऑप केडिट सोसायटीच्या खाते उताऱ्यावर नमूद करण्यात आले आहे. यापैकी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे कर्ज संबंधितांनी परतफेड केले असून, कारखान्याच्या आधुनिकीकरण व विस्तारीकरणाचा तपशील उपलब्ध झालेला नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे कारखान्याची मालमत्ता तारण ठेवली असली तरी कर्जाची रक्कम मात्र सचिन घायाळ शुगर्सच्या खात्यात जमा करण्याचा कारनामा संबंधितांनी केला आहे. उक्त खात्याच्या तपशिलानुसार, नंतर या रकमा आयसीआयसीआय बँक, आर बी एल बँक, अशोक शुगर, बंधन बँक लि., सीबीडीटी टॅक्स, एचएलआयसीयूएल, शाहू बँक, एसबीआय, देवेंद्र पावर सोल्युशन, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादीत, औरंगाबाद पेपर मिल्स या व इतर खात्यावर नावे टाकल्या गेल्या. परंतु, तसे करण्यासाठी कोणत्या कारणासाठी या रकमा वळवल्या गेल्या हे मात्र कुठेही नमूद करण्यात आलेले नाही. तसेच नंतरही कारखाना व्यवस्थापन व सचिन घायाळ शुगर्सने त्याचा तपशिल दिलेला नाही, असेही फिर्यादीत म्हटलेले आहे.
बँकही गोत्यात
कर्ज उचल करताना कारखान्याचे आधुनिकीकरण व विस्तारीकरण करताना अपेक्षित खर्च किती लागेल याबाबत अंदाजपत्रक न काढता, आधुनिकीकरण व विस्तारीकरणाचे स्वरुप निश्चित न करता कर्ज उचल केल्याचे दिसून येते. याबाबत प्रत्यक्षात झालेल्या खर्चाचा तपशिल, व्हाउचर्स, विस्तारीकरण व अधुनिकीकरण यासाठी माल, मशिनरी, सुटे भाग याच्या खरेदीबाबत निविदा/जाहिरात, प्राप्त दरपत्रक आर्किटेक्चरची नियुक्ती व त्यांच्याकडील अहवाल, रक्कम देयकासंबंधित तपशिल, गेट पास आवक नोंदवही आदी तपशिल देखील कारखान्याने उपलब्ध करून दिलेला नाही. राज्य शासनाच्या निर्णयानुसार साखर कारखान्यांना विस्तारीकरण, जुन्या यंत्र सामुग्रीच्या जागी आधुनिक यंत्र सामुग्री बसविणे, उप-पदार्थाचे प्रकल्पासाठी लागणारी यंत्र सामुग्री खरेदी करणे, बांधकामासंबंधीच्या निविदा मंजुर करणे यासाठी स्थापित समित्यांची परवानगी घ्यावी लागते. मात्र, अशी कोणतीही परवानगी संत एकनाथ कारखान्याने किंवा सचिन घायाळ शुगर्सने घेतलेल्या नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या कर्जाचा विनियोग कारखान्याच्या आधुनिकीकरण व विस्तारीकरणासाठी करण्यात आलेला नाही, हे सिध्द होत असून, कर्जाच्या रकमेचा अन्यत्र वापर करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. एकंदरीत कारखान्याची मालमत्ता तारण ठेवून संबंधितांनी कर्ज कारखान्यासाठी न वापरता १६ कोटी ६२ हजार रुपयांचा अपहार व गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट होत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

