- News
- जिल्हा न्यूज
- टवाळखोरांनी हद्दच केली... शाळेबाहेरच दहावीतील विद्यार्थिनीची छेड, भावाने जाब विचारल्याने फायटरने केल...
टवाळखोरांनी हद्दच केली... शाळेबाहेरच दहावीतील विद्यार्थिनीची छेड, भावाने जाब विचारल्याने फायटरने केले रक्तबंबाळ!; वैजापूर तालुक्यातील खंडाळ्याची संतापजनक घटना
वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर तालुक्यातील खंडाळा जिल्हा परिषद शाळेच्या आवारात दहावीतील विद्यार्थिनीची टवाळखोरांनी छेड काढली. याचा जाब तिच्या भावाने विचारला असता त्याला टवाळखोरांनी शाळेच्या आवारातच फायटरने बेदम मारून गंभीर जखमी केले. बुधवारी (११ मार्च) सकाळी १० च्या सुमारास घडलेल्या या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून, संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या टवाळखोरांविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
खंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेत दहावी परीक्षेचे केंद्र आहे. या केंद्रावर परीक्षा देण्यासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या एका विद्यार्थिनीची टवाळखोर ३ दिवसांपासून छेड काढत होते. याबाबत कुटुंबीयांना माहिती दिल्याने बुधवारी तिचा भाऊ तिला परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी आला होता. या वेळी टवाळखोरांनी तिची पुन्हा छेड काढली. ती वर्गात गेल्यानंतर भावाने याचा जाब टवाळखोरांना विचारला. त्यावर टवाळखोरांनी फायटरने त्याच्यावर हल्ला चढवत बेदम मारहाण केली. नागरिकांनी वेळीच धाव घेऊन टवाळखोरांच्या तावडीतून तरुणाची सुटका केली. टवाळखोरांच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या केंद्रावर पोलीस अंमलदार तैनात आहेत. मात्र ही घटना घडली तेव्हा पोलीस तिथे नव्हते. नागरिकांनी त्यांना कळवल्यावर अर्ध्या तासाने ते आले. या परीक्षा केंद्रावर टवाळखोर सातत्याने विद्यार्थिनींना त्रास देत असून, दोन दिवसांपूर्वी त्यांनी चक्क परीक्षा केंद्रावरच दगडफेक केली होती. या घटनेची गंभीर दखल वैजापूर पोलिसांनी घेतली असून, पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले म्हणाले, की सीसीटीव्ही तपासून व प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेऊन तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. पीडित विद्यार्थिनी व तिच्या भावाचा जबाब नोंदवून या प्रकरणात गुन्हा दाखल केला जाईल.

