- News
- पॉलिटिक्स
- शिंदे गटात नवे नाराजीनाट्य, आता ‘पुत्रा’साठी आ. जैस्वाल-तनवाणींमध्ये तणाव!, जंजाळ ‘फ्रंटफूट’वर आल्या...
शिंदे गटात नवे नाराजीनाट्य, आता ‘पुत्रा’साठी आ. जैस्वाल-तनवाणींमध्ये तणाव!, जंजाळ ‘फ्रंटफूट’वर आल्याने ‘तुपे’ बॅकफूटवर...
मनोज सांगळे, संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट
छत्रपती संभाजीनगर : भाजपकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची जशी रांग लागली होती, याखालोखाल शिंदे गटाकडूनही निवडणूक लढण्यास इच्छुकांची गर्दी झाल्याचे शुक्रवारी (१२ डिसेंबर) दिसले. दिवसभरात ५३६ जणांनी अर्ज नेले. आज, १३ डिसेंबरला सुद्धा सकाळी ११ ते ३ या वेळेत अर्ज वाटप होणार असून, सोमवार व मंगळवारी (१५ व १६ डिसेंबर) इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. दरम्यान, अर्ज वाटपाच्या पहिल्याच दिवशी शिंदे गटात नाराजीनाट्य उफाळून आले. गुलमंडीतून आ. प्रदीप जैस्वाल व माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्या पुत्रांना लढायचे आहे. कुणीच मागे हटत नसल्याने दोन्ही नेत्यांत तणाव निर्माण झाला आहे. मंत्री संजय शिरसाट-जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यातील तणावानंतर आता हा नवा तणाव शिंदे गटात सुरू झाल्याचे पहायला मिळाले. दुसरीकडे राजेंद्र जंजाळ यांना पक्षात पुन्हा मान मिळाल्याने माजी महापौर त्र्यंबक तुपे गायब झाल्याची चर्चा पसरली होती.
गुलमंडी वॉर्डातून आपल्या पुत्राला संधी मिळावी, अशी अपेक्षा किशनचंद तनवाणी यांची आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचा उमेदवार निवडून यावा म्हणून माघार घेतली होती. नंतर ते काहीच दिवसांत शिंदे गटात दाखलही झाले होते. त्याची परतफेड म्हणून त्यांना आता पुत्राला गुलमंडीतून उमेदवारी हवी आहे. मात्र गुलमंडीतून आ. जैस्वाल यांच्या पुत्राला उमेदवारी हवी आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांत नाराजीनाट्य उद्भवले आहे. हा वाद स्थानिक समन्वय समिती सोडविण्यात यशस्वी होते, की एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात जातो, हे पाहणे रोमांचक असणार आहे.
१८ प्रश्न विचारले...
शिंदे गटाच्या उमेदवार अर्जात इच्छुकांना जवळपास १८ प्रश्ने विचारले असून, त्याची उत्तरे भरून द्यावी लागत आहेत. यात पक्षात कधी प्रवेश घेतला, पक्षाचा प्राथमिक सदस्य झाल्याची तारीख, पक्षाची कुठली जबाबदारी सांभाळली आहे का, व्यवसाय-नोकरी, निवडणुकीत काय जबाबदारी होती, लोकसभा-विधानसभा निवडणुकांत आपल्या प्रभागात किती मतदान झाले, प्रभागात विरोधी पक्षाचे तुल्यबळ उमेदवार कोण, प्रभागातील सामाजिक वर्गीकरण कसे आहे असे प्रश्न विचारण्यात आले आहेत.

