- News
- पॉलिटिक्स
- २८८ उमेदवार पाडायचे की उभे करायचे हे २० जुलैला ठरवू्; छत्रपती संभाजीनगरात मनोज जरांगे यांचा सरकारला...
२८८ उमेदवार पाडायचे की उभे करायचे हे २० जुलैला ठरवू्; छत्रपती संभाजीनगरात मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा, महाशांतता रॅलीचा लाखो मराठा बांधवांच्या उपस्थितीत समारोप
छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी/गणेश निंबाळकर : सीएससीएन वृत्तसेवा) : सरकारला दिलेली एक महिन्याची मुदत संपली आहे. आजच्या रात्रीत मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्या. मी पुन्हा २० जुलैपासून अंतरवाली सराटीत उपोषणाला बसणार असून, त्याच दिवशी हे २८८ उमेदवार पाडायचे की आपण उभे करायचे अथवा मुंबईला जायचे हे ठरवू, असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी शनिवारी […]
छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी/गणेश निंबाळकर : सीएससीएन वृत्तसेवा) : सरकारला दिलेली एक महिन्याची मुदत संपली आहे. आजच्या रात्रीत मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्या. मी पुन्हा २० जुलैपासून अंतरवाली सराटीत उपोषणाला बसणार असून, त्याच दिवशी हे २८८ उमेदवार पाडायचे की आपण उभे करायचे अथवा मुंबईला जायचे हे ठरवू, असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी शनिवारी (१३ जुलै) क्रांतीचौकात आयोजित महाशांतता रॅली व संवाद यात्रेच्या सांगता सभेत दिला.

तुम्ही एकत्र आला तर जातीयवाद नाही; पण, मराठे एकवटले की, जातीयवादाचा डाग लावला जातो. तुम्हाला सत्ता दिली म्हणजे मराठ्यांवर अन्याय करणार का?, असा सवाल जरांगे यांनी करत गिरीश महाजन यांच्या मागे लागण्याचा इशारा समाजबांधवांना केला. महाजन यांच्या मतदारसंघात १ लाख ३६ हजार कुणबी मराठा बांधव आहेत. त्यांनी आता महाजनांच्या मागे लागा, असे ते म्हणाले. मराठा समाजाने मराठ्यांच्या मदतीला धावून जावे. मराठा अधिकारी, व्यावसायिक आणि नेत्यांनीही समाजाला साथ द्यावी. नेत्यांनीही त्यांच्या पक्षाला अथवा नेत्याला बाप मानू नये, तर समाजालाच बाप मानायचा सल्लाही त्यांनी दिला. मराठा आमदारांच्या मतावर विजयी झालेला आहात, हे विसरू नका. तुम्ही मराठ्यांचा विरोध करू नका, असे आवाहन जरांगे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या ११ आमदारांना केले. २० मिनिटांमध्ये भाषण आवरते घेणार असे सुरुवातीला जरांगे म्हणाले. मात्र मिळणारा प्रतिसाद पाहता भाषणाचा वेळ वाढवला. रॅली साडेसात तास चालली. तर १० तास जालना रोड बंद होता.
क्षणचित्रे…
-रॅलीत चारचाकी वाहनाच्या सनरुफमध्ये उभे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे समाजबांधवांना अभिवादन करत पुढे रवाना होत होते. त्यांच्या पाठीमागे ट्रॅक्टरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा होता.
-रॅलीसाठी सकाळी १० पासूनच समाजबांधव जालना रोडवर उभे होते. कोणी गटागटाने, कोणी एकटेच, तर कोणी कुटुंबीयांसह रॅलीत सहभागी झाले.
-बहुतांशजण पांढरे, केशरी रंगाचे कपडे परिधान करून आले होते.
-ठिकठिकाणी समाजबांधवांना अल्पोपाहार, फळ वाटप करण्यात आले.
-डीजेच्या तालावर रॅली पुढे जात होती. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्यांना जरांगे अभिवादन करीत होते. ठिकठिकाणी विविध संस्था, संघटना, समाजांतर्फे जरांगे यांचे जेसीबी आणि क्रेनच्या मदतीने भव्य पुष्पहाराने व फुलांची उधळण करून स्वागत करण्यात आले.
-पावसाने हजेरी लावल्यानंतरही रॅलीतील सहभागींचा उत्साह कायम होता. अनेक जण जरांगे यांचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करीत होते. रॅलीची सांगता ९.१५ वाजता झाली.

