- Marathi News
- जिल्हा न्यूज
- कर्ज घेतले भरमसाठ अन् फेडण्याच्या नावाने बोंब; खुलताबादच्या कोहिनूर कॉलेजची बिल्डिंग सील!; अडीच हजार...
कर्ज घेतले भरमसाठ अन् फेडण्याच्या नावाने बोंब; खुलताबादच्या कोहिनूर कॉलेजची बिल्डिंग सील!; अडीच हजारांवर विद्यार्थ्यांचे काय होणार?

खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : संस्थेची मालमत्ता गहाण ठेवून इमारत नुतनीकरणासाठी कर्ज उचलून नंतर या कर्जाची परतफेड न करणे कोहिनूर शिक्षण संस्थेला महागात पडले आहे. वित्तीय संस्थेने जिल्हा न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशाने या शिक्षण संस्थेची खुलताबाद येथील तीन मजली इमारत रविवारी (१२ ऑक्टोबर) सील करण्यात आली. दोन कोटी ८२ लाख ८६ हजार २५४ रुपयांचे कर्ज थकल्याने ही कारवाई करण्यात आली.
‘कोहिनूर'च्या महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचे अकरावी ते पदव्युत्तर पदवी असे विविध वर्ग चालतात. यात सर्व मिळून २,३५२ विद्यार्थी शिक्षण घेतात, तर महाविद्यालयात प्राचार्य, ७२ प्राध्यापक आणि अन्य कर्मचारी कार्यरत आहेत. आता महाविद्यालयाची इमारत जप्त झाल्याने या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निर्माण झाल्याने पालक चिंताग्रस्त झाले आहेत. दरम्यान, याबाबत बोलताना महाविद्यालयाच्या प्राचार्या शेख कमरूनीसा बेग यांनी सांगितले की, झालेल्या कारवाईबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे प्रशासन, शिक्षण सहसंचालक, धर्मादाय आयुक्त यांना माहिती कळवली जाईल. यानंतर पुढे काय करायचे ते ठरवले जाईल.
मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही. वेळ पडल्यास महाविद्यालयाच्या प्रांगणात वर्ग भरवून अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल. दुसरीकडे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोहिनूर शिक्षण संस्थेवर झालेल्या कारवाईच्या अनुषंगाने आज (१३ ऑक्टोबर) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विशेष बैठक घेतली जाणार आहे.बैठकीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासह अन्य करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा होईल.