- News
- जिल्हा न्यूज
- वाळू तस्कराच्या टिप्परने तरुणाचा बळी घेतला, विरगाव पोलिसांवर गंभीर आरोप करत नातेवाइकांनी अंत्यविधी
वाळू तस्कराच्या टिप्परने तरुणाचा बळी घेतला, विरगाव पोलिसांवर गंभीर आरोप करत नातेवाइकांनी अंत्यविधी रोखले!; API वाघमोडे म्हणाले, टिप्पर जमा केले, चालकही पकडला... तरीही...
वैजापूर /छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर तालुक्यातील डागपिंपळगाव येथे गुरुवारी (२० नोव्हेंबर) दुपारी वाळू तस्कराच्या टिप्परने दुचाकीस्वार तरुणाचा बळी घेतला. त्यानंतर विरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला, मृतकाच्या भावाला आरोपीसारखी वागणूक दिली, गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला पकडून आणल्यानंतर त्याची बडदास्त ठेवली, असे गंभीर आरोप मृतकाच्या नातेवाइकांनी केले. तेवढ्यावरच न थांबता सुरुवातीला त्यांनी पोलीस ठाण्यात मृतदेह आणला. पोलिसांच्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर मृतदेह घरी नेला. मात्र न्याय मिळत नाही तोपर्यंत अंत्यविधी न करण्याचा निर्णय घेतला असून, शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) रात्री साडेदहापर्यंत मृतदेहावर अंत्यविधी न करता पोलिसांच्या भूमिकेवर संताप व्यक्त करत होते. दरम्यान, या घटनेबाबत विरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले, की पोलिसांनी गुन्हा दाखल केला, आरोपी अटक केला आहे. कायद्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे, करत आहेत. तरीही मृतकाचे नातेवाइक काहीतरी वेगळाच हट्ट धरून बसले आहेत. एकप्रकारे त्यांनी पोलिसांनाच ब्लॅकमेल सुरू केले आहे.
दरम्यान, गणेशचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाइक आक्रमक झाले. त्यांनी ज्या वाळूच्या टिप्परने अपघात घडवला त्याच्याविरुद्ध कडक कारवाईसाठी आक्रमक भूमिका घेतली. त्यासाठी मृतदेह पोलीस ठाण्यात नेला. पोलीस वाळू तस्कराला पाठिशी घालत असल्याचा आरोप केला. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल करून पोलिसांनी टिप्पर पोलीस ठाण्यात जमा केले असून, चालकाला ताब्यात घेतले आहे. मात्र कठोर कारवाई होत नसल्याचे पाहून नातेवाइक आक्रमक झाले. त्यांनी मृतदेह पोलीस ठाण्यात आणला होता. पोलिसांनी त्यांना मृतदेह घरी न्यायला लावला. आता घरीसुद्धा रात्री साडेदहापर्यंत मृतदेह तसाच ठेवून नातेवाइक कठोर कारवाई होईपर्यंत अंत्यविधी न करण्याची भूमिका घेऊन होते.

