- News
- जिल्हा न्यूज
- मंगेश साबळे यांचे आंदोलन पेटले!; सिल्लोड कडकडीत बंद, फुलंब्रीत जळगाव रोड रोखून धरला...
मंगेश साबळे यांचे आंदोलन पेटले!; सिल्लोड कडकडीत बंद, फुलंब्रीत जळगाव रोड रोखून धरला...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
सिल्लोड / फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सातबारा कोरा करा, ओला दुष्काळ जाहीर करा, एकरी ५० हजार रुपये मदत द्या यासह अन्य मागण्यांसाठी सिल्लोड तहसीलसमोर २९ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाला बसलेल्या मंगेश साबळे (सरपंच, गेवराई पायगा, ता. फुलंब्री) यांच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील शेतकरी एकवटू लागले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर मोहीम चालवली जात आहे. आंदोलनाची दखल सरकार घेत नसल्याने आक्रोश व्यक्त केला जात आहे. रविवारी (५ ऑक्टोबर) सिल्लोड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. फुलंब्री येथे जळगाव महामार्गावर पाथ्री फाट्याजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे, शेतकरी आंदोलनाला व्यापाऱ्यांनी साथ देत १०० टक्के बंद पाळला.
आय लव्ह किसान संघर्ष समितीने रविवारी सिल्लोड बंदची हाक दिली. या हाकेला व्यापारी, दुकानदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बाजारपेठ दिवसभर १०० टक्के बंद होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. राहुलकुमार ताठे, माजी नगराध्यक्ष बनेखा पठाण, भाकपचे सय्यद अनिस सय्यद, जगदीश शेळके, सागर गवते, इरफान पठाण यांच्यासह संघर्ष समितीच्या वतीने सकाळी सर्व व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले. प्रशासन मागण्या पूर्ण करणार नसेल पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचा प्रा. ताठे यांनी दिला.
मंगेश साबळे यांच्या समर्थनार्थ रविवारी सकाळी ११ वाजता संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती संभाजीनगर -जळगाव महामार्गावर फुलंब्री तालुक्यातील पाथ्री फाट्याजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या. शेतकऱ्यांनी खराब झालेली पिके हातात घेऊन घोषणाबाजी केली. नायब तहसीलदार संजीव राऊत, सहायक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. आंदोलनानंतर वडोदबाजार पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश पाथ्रीकर, तालुकाध्यक्ष अमोल देवरे, निवृत्ती डकले, वसंत पाथ्रीकर, ज्ञानेश्वर बोडके, अनिल बोडके, दगडू बनसोड, बालू बनसोड, उमेश चव्हाण, राजू साठे, शाकीर शहा, गणेश बनसोड, राधाकिसन बनसोड, नईम शेख, आजिनाथ डकले, सोमीनाथ गवारे, सागर ढेपले, प्रभाकर जाधव, बनसोड, सुनील बनसोड यांच्यासह शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.
मंगेश साबळे यांच्या उपोषणाचा आज, ८ वा दिवस उजाडला आहे. मात्र सरकार, प्रशासनाकडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. साबळे यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर मोहीम राबवली जात असून, सरकारविरुद्ध आक्रोश व्यक्त केला जात आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
08 Dec 2025 21:25:50
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हर्सूल भागातील सुरेवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात ३ जण गंभीर जखमी तर...

