- News
- जिल्हा न्यूज
- राज्यातील एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी करणार; छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडण...
राज्यातील एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी करणार; छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प, किनगावमध्ये ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना’चा राज्यस्तरीय शुभारंभ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : प्रत्येक गावात जिल्हा बँकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन त्यांना शासन आर्थिक पाठबळ देईल. त्यातून उद्योग व्यवसाय करून त्या स्वावलंबी होतील. राज्यातील एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी करण्याचा संकल्प असल्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, १७ सप्टेंबरला व्यक्त केला.
२८ हजार ग्रामपंचायती विकासाचे मॉडेल बनविणार
ग्रामविकासाच्या अनेक योजना, अभियाने आलीत पण त्यात ठरविक गावेच पुढे गेली. आता या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातून प्रत्येक गावातून समृद्ध महाराष्ट्र घडेल. अशा स्पर्धांमध्ये कोणतेही गाव मागे राहू नये यासाठी हे अभियान सुरू केलं आहे. या अभियानात केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजना गावात राबविण्यात येतील. त्या माध्यमातून राज्यातील २८ हजार ग्रामपंचायती आणि ४० हजार गावे मॉडेल म्हणून विकसित करू, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
२५० कोटींची पारितोषिके देणारी पहिलीच योजना
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या ग्रामपंचायतींना तब्बल २५० कोटी रुपयांचे पारितोषिके दिली जाणार आहेत. इतकी पारितोषिके देणारी ही देशातील पहिलीच योजना आहे. अभियानामुळे वंचित घटकांच्या जीवनात बदल घडवू. त्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. गावात एकजूटीने राहून आपण समृद्धी आणू. राज्यातील अनेक गावांत लोक वेगवेगळे प्रयत्न करून परिवर्तन घडवित आहेत. एआयचा कृषीत वापर केला जात आहे. आपल्या प्रत्येकामध्ये हे परिवर्तन घडविण्याची सुप्त शक्ती आहे. त्या सुप्त शक्तीची आठवण करून देण्यासाठीच हे अभियान आहे. प्रत्येक ग्रामस्थाने हे अभियान आपले आहे असे समजून सहभाग द्यावा आणि सक्षम महाराष्ट्र घडवावा, आजपासून ही स्पर्धा सुरू झाली अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले. त्यांनी या अभियानाची सविस्तर माहिती दिली. या अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना तालुकास्तरावर प्रथम १५ लाख,द्वितीय १२ लाख आणि तृतीय ८ लाख, जिल्हास्तरावर प्रथम ५० लाख,द्वितीय ३० लाख आणि तृतीय २० लाख तर राज्यस्तरावर प्रथम ५ कोटी,द्वितीय ३ कोटी आणि तृतीय २ कोटी रुपयांची बक्षिसे मिळणार आहेत, असे त्यांनी सांगितले. प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी आभार प्रदर्शन केले. तर नीता पानसरे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्ह्यातील सर्व ८८० ग्रामपंचायती या सोहळ्यात ऑनलाईन सहभागी झाल्या होत्या. तसेच यानिमित्त सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. आदल्या दिवशी म्हणजे १६ सप्टेंबरला राज्यभरात विशेष महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

