मोठी बातमी : नारळीबागेत आशीर्वाद गोल्‍ड फर्मवर पोलिसांचा छापा!; २२ कॅरेटचे सोने २४ कॅरेटचे सांगून विकायचे, जाहिरात करणारा रिलस्टारही गोत्‍यात!!, सराफा व्यावसायिकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नारळीबागेतील पावन गणेश मंदिरासमोर असलेल्या आशीर्वाद गोल्‍ड या फर्मवर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी (१० ऑगस्ट) दुपारी छापा मारून सोन्यात हेराफेरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. २२ कॅरेटचे सोने ही टोळी २४ कॅरेटचे सांगून विकायची. त्‍यासाठी ग्राहकाला ते नंतर विकल्यास प्रत्‍येक ग्रॅममागे ७०० रुपये मिळतील, असे आमिष दाखवले होते. सराफा व्यावसायिक, त्‍याचा १ मित्र आणि अशाप्रकारच्या धंद्याची कल्पना देणारा किराणा व्यावसायिक आणि या फसव्या धंद्याची जाहिरात करणारा रिलस्टार अशा चौघांविरुद्ध सिटी चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, या टोळीने अशाप्रकारे किती लोकांना सोने विकले, याचा तपास केला जात आहे.

advt3

आनंदकुमार नामदेवराव मगरे (वय ३७, रा. जे. पी. इंटरनॅशनल हॉटेलशेजारी, पावन गणेश मंदिरासमोर, राजूरकर निवास, नारळीबाग, छत्रपती संभाजीनगर), दीपक गौतम आढावे (वय ३१, रा. नामांतर कॉलनी, सिद्धार्थनगर, एन-१२ हडको), जयपाल कन्हैयालाल धर्माणी (वय ४९, रा. रणजितनगर, काल्डा कॉर्नर), सुशील प्रभू वाघमारे (वय २४, रा. श्रीकृष्णनगर, उल्कानगरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रविण वाघ यांनी त्‍यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. रविवारी (१० ऑगस्ट) श्री. वाघ, पोलीस अंमलदार सुनिल जाधव, नवनाथ खांडेकर, सोमकांत भालेराव, विजय निकम, कृष्णा गायके हे गस्त घालत खडकेश्वर येथे दुपारी एकला आले असता गुप्त बातमीदारामार्फत त्‍यांना खात्रीलायक माहिती मिळाली की, आनंदकुमार मगरे याने आशीर्वाद गोल्ड नावाने ऑफीस खोलले असून, तो त्याच्या साथीदारांसह मिळून २४ कॅरेट सोने खरेदी करून त्यात चांदी मिक्स करून २२ कॅरेट सोने बनवून ते ग्राहकांना २४ कॅरेट म्हणून विक्री करणार आहे. आनंदकुमार मगरे व त्याचे साथीदार हे एक ग्रॅम सोने ९ हजार ३०० रुपयांना ग्राहकांना विकणार, मात्र विकताना ते ग्राहकाला २४ कॅरेट असल्याचे सांगत होते.

त्‍यांची जाहिरात त्‍यांनी एका रिल्सस्टारसोबत रिल्स बनवून इन्स्टाग्रामवरही केली होती. शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मगरे याच्या कार्यालयावर छापा मारला. मगरेला पकडले. पोलिसांनी त्‍याच्या आशीर्वाद गोल्डबाबत माहिती विचारली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. कसून चौकशीत त्‍याने कबूल केले, की मी २०१२ ते २०२२ पर्यंत सम्राट अर्बन नावाची पतसंस्था चालवत होतो. त्या पतसंस्थेचा चेअरमन होतो. ही पतसंस्था २०२२ मध्ये बंद केली. पतसंस्था चालवत असताना त्‍याची ओळख जयपाल कन्हैयालाल धर्माणी (वय ४९, रा. रणजितनगर, काल्डा कॉर्नर, छत्रपती संभाजीनगर) याच्याशी २०१५ मध्ये झाली. त्यावेळी धर्माणी याचे निराला बाजार पैठणगेट या ठिकाणी कपड्याचे दुकान होते. मगरे याने सराफा व्यवसाय जुलै २०२१ पासून सुरू केला आहे.

तो सोने खरेदी करून ग्राहकांना हप्त्यावर ग्रॅममागे १ हजार रुपये जास्त घेऊन देत होता. तो व्यवसाय सध्यासुद्धा मगरे करत आहे. ७ ऑगस्टला जयपाल धर्माणी हा मगरेकडे आला. त्याने मगरेला सांगितले, की २४ कॅरेट सोन्यामध्ये चांदी मिक्स करून ते २२ कॅरेट बनवून ग्राहकांना २४ कॅरेट म्हणून विक्री करू. २२ कॅरेट सोने हे आपल्याला ९ हजार १०० ग्रॅमच्या भावाने भेटेल ते आपण ग्राहकांना ९ हजार ३०० रुपये ग्रॅमने विक्री करू. ग्राहकाने ते विकले की, त्याला १० हजार रुपये ग्रॅममागे भेटतील. म्हणजेच त्याचा फायदा ७०० रुपये एका ग्रॅममागे होईल. मात्र त्याला सोने हे २२ कॅरेट आहे असे सांगायचे नाही. यात व्यवसाय करण्यासाठी मगरे याने मित्र दीपक गौतम आढावे (वय ३१, रा. नामांतर कॉलनी, सिद्धार्थनगर, एन-१२ हडको) यालाही सोबत घेतले.

अशी बनवली रील...
तीन दिवसांपूर्वी मगरे याने रिल्सस्टार सुशील वाघमारे (रा. श्रीकृष्णनगर, उल्कानगरी, छत्रपती संभाजीनगर) याच्यासोबत एक रिल बनवली. त्‍यात सुशील सांगतोय, की जर मी तुम्हाला असं बोललो की, माझ्याकडून गोल्ड घेऊन जा आणि तुम्ही तिकडे विका. माझ्याकडून ९३ हजाराला घेऊन जा आणि तुम्ही तिकडे एक मिनिटात १ लाख रुपयाला विका तर कसं होईल, बरोबर ऐकताय, ७०० रुपये पर ग्रॅम मार्केटपेक्षा तुम्हाला कमी रेटने भेटणार आहे. तुम्ही माझ्याकडून घ्या आणि लगेच विका. तुम्हाला एका मिनिटाच्या आत ७०० रुपयांचा पर ग्रॅममध्ये फायदा होणार आहे. लाखात सेल करू शकता. बरोबर ऐकताय जसं की हे २० ग्रॅमचे बिस्किट आहे जे की, २४ कॅरेट असणार आहे. आशीर्वाद गोल्ड जे की, महाराष्ट्रातील सर्वात मोठे होलसेलर आहे. जे आज मला भेटलेले आहेत. तुमचा आज खूप मोठा फायदा होणार आहे. हो सगळं पॉसिबल आहे. सगळं लिगली आहे. सगळं हंन्ड्रेड परसेंट सिक्युरिटीसोबत तुम्हाला भेटणार आहे. तुम्हाला विथ बील भेटणार आहे... अशा स्वरुपाची जाहिरात तो करताना रिलमध्ये दिसत आहे. या फसव्या आणि खोट्या जाहिरातीमुळे रिलस्टार सुशीलही कायद्याच्या कचाट्यात अडकला असून त्‍याच्याहीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

Tech News : UPI मधून कापले गेले, पण समोर पैसे मिळालेच नाहीत?

Latest News

Tech News : UPI मधून कापले गेले, पण समोर पैसे मिळालेच नाहीत? Tech News : UPI मधून कापले गेले, पण समोर पैसे मिळालेच नाहीत?
तुमच्यासोबत कधीतरी असे घडले असेल की UPI द्वारे एखाद्याला पेमेंट करूनही, दुसऱ्या व्यक्तीला पेमेंट मिळाले नाही. जर हो, आणि तुम्हाला...
दातांवरून कळते भविष्य अन्‌ स्वभाव, तुम्हाला जाणून घ्यायचे कसे?
५ सरकारी नोकऱ्या... अर्ज भरण्याची तारिख जाईल उलटून, लगेच करा अर्ज...
मोठी बातमी : नारळीबागेत आशीर्वाद गोल्‍ड फर्मवर पोलिसांचा छापा!; २२ कॅरेटचे सोने २४ कॅरेटचे सांगून विकायचे, जाहिरात करणारा रिलस्टारही गोत्‍यात!!, सराफा व्यावसायिकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
रात्री कुटुंब झोपताच शेतकरी उठला, गळ्याला फास अडकवला!; सिल्लोडचे रहिमाबाद हादरले!!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software