- News
- सिटी क्राईम
- शहरात शांतता भंग करू पाहणाऱ्यांविरुद्ध पोलीस सक्त!
शहरात शांतता भंग करू पाहणाऱ्यांविरुद्ध पोलीस सक्त!
-जलील हल्लाप्रकरणात काँग्रेस उमेदवाराविरुद्ध गुन्हा दाखल -वंचित महिला उमेदवाराच्या भावावर हल्ला, तिघांना अटक -राष्ट्रवादी उमेदवाराचे प्रचार कार्यालय जाळणारा अटकेत
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिका निवडणुकीत शहराची शांतता भंग करून पाहणाऱ्यांविरुद्ध पोलीस सक्त झाले आहेत. एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला केल्या प्रकरणात जिन्सी पोलिसांनी काँग्रेस उमेदवार हबीब कुरेशी, त्यांचे भाऊ कलीम कुरेशी यांच्यासह ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार वर्षा जाधव यांचे भाऊ मिथून यांच्यावर हल्ला करणाऱ्या कुख्यात गुन्हेगारासह तिघांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मयूर सोनवणे यांचे प्रचार कार्यालय जाळणाऱ्या बाळू उर्फ योगेश मुळेला अटक करण्यात आली आहे.
खासगेट परिसरात इम्तियाज जलील यांच्या पदयात्रेत बुधवारी (७ जानेवारी) दुपारी काँग्रेस उमेदवार हबीब कुरेशी, त्यांचे बंधू कलीम कुरेशी आणि त्यांच्या समर्थकांनी राडा केला. पोलिसांनी लाठीमार करून पांगवल्यावरही जलील यांच्यावर वाहनावर हल्ला करण्यात आला होता. जिन्सी पोलीस ठाण्यात अंमलदार शेख शफीक मसलोद्दीन यांच्या तक्रारीवरून हबीब, कलीमसह ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, एमआयएम उमेदवार फेरोज खान मोईनोद्दीन (रा. बक्कलगुडा, शहागंज) हे ७ जानेवारीला प्रभाग १४ मध्ये परवानगी घेऊन बायजीपुरा ते नवाबपुरा चौकादरम्यान पदयात्रा काढत होते. सकाळी १० ला पदयात्रेला सुरुवात झाली. त्यात माजी खासदार इम्तियाज जलील सहभागी झाले होते. दुपारी दीडला अचानक जिन्सी चौकातून हबीब व कलीम हे साथीदारांसह रस्त्यावर आले. दोन्ही गट समोरासमोर येताच त्यातील तरुण घोषणाबाजी, हातवारे करू लागले. एकमेकांना मारहाण करू लागले. एकमेकांवर अंडे फेकले. जलील यांच्या वाहनाचा पाठलाग केला. पोलिसांनाही मारहाण केली. अखेर पोलिसांनी लाठीमार केला. त्यानंतर जमाव पांगला.
मंगळवारी (६ जानेवारी) दुपारी साडेचारला प्रभाग क्र. ५ मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार वर्षा जाधव यांच्या प्रचाराच्या रिक्षावर तिघांनी हल्ला करत तोडफोड केली. बॅनर फाडून टाकले. वर्षा यांचे भाऊ मिथून (वय ३५) यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून जखमी करण्यासह जातिवाचक शिवीगाळ करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार अरबाज करीम खान, अन्सार अन्सारी व अब्दुल समीर उर्फ गुड्डू (सर्व रा. गरमपाणी परिसर) यांच्याविरुद्ध क्रांती चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. ही घटना गांभीर्याने घेऊन तिघांनाही पोलिसांनी तातडीने अटक केली. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अरबाज कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध १४ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
कैलासनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार डॉ. मयूर सोनवणे यांच्या प्रचार कार्यालयाला बुधवारी पहाटे साडेचारला आग लावणाऱ्या बाळू उर्फ योगेश मुळे याच्याविरुद्ध जिन्सी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याला ताब्यात घेण्यात आले. तो सीसीटीव्हीत आग लावताना दिसला होता. शिवाय आग लावत असताना शेजारील नागरिक किशोर भुजबळ यांनी पाहिले होते.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
By City News Desk
Latest News
18 Jan 2026 12:47:22
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार पुन्हा गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या जाहीर...

