कनिष्ठ लिपिक उज्ज्वला नरवडे हिला अटक, वेदांतनगर पोलिसांची कामगिरी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगरच्या सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात कार्यरत दोन लिपिकांनी चक्‍क बनावट नियुक्‍ती आदेश देऊन ३१ जणांना शासकीय सेवेत घेतले होते. १० वर्षे बिनदिक्कम सुरू असलेला हा प्रकार २२ जुलैला समोर आला होता. त्यानंतर वेदांतनगर पोलिसांनी वरिष्ठ लिपिक अंकुश श्रीरंग हिवाळे (रा. सौजन्य नगर, काल्डा कॉर्नर) व कनिष्ठ लिपिक उज्ज्वला अनिल नरवडे (वय ४५, उज्वला नारायण गायकवाड, रा. सार्वजनिक बांधकाम विभाग क्वार्टर, गोपाल टी)  यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर उज्ज्वला फरारी झाली होती. शनिवारी (२० सप्‍टेंबर) तिला अटक करण्यात यश आले. न्यायालयाने तिला २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

उज्ज्वला छत्रपती संभाजीनगर शहर सोडून पसार झाली होती. अक्कलकोट, तुळजापूर, सोलापूरसह शेंद्रा परिसरात तिने काही काळ मुक्काम केला. रात्री घरी येऊन पुन्हा जात होती. ही बाब कळताच शुक्रवारी (२९ सप्टेंबर) पोलीस निरीक्षक प्रविणा यादव, उपनिरीक्षक संतोषकुमार जोशी यांनी सापळा रचून ती शहरात येताच मुसक्या आवळल्‍या.

काय आहे प्रकरण...
या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शेषराव काशीनाथ चव्हाण यांनी तक्रार दिलेली आहे. अंकुश हिवाळे व उज्ज्वला नरवडे यांनी कोणतीही भरती प्रक्रीया आदेश किंवा जाहिरात नसताना सन २०१४ ते २०१५ या कालावधीत सार्वजनिक बांधकाम विभाग/राष्ट्रीय महामार्ग विभाग, छत्रपती संभाजीनगर /नांदेड / जालना/लातूर या विभागांमध्ये रिक्त असलेल्या अनुकंपा व लाडपांगे समितीच्या जागांमध्ये बनावट नियुक्ती आदेश तयार करून त्यावर कार्यकारी अभियंता यांची बनावट स्वाक्षरी करून सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये अनुकंपा तत्वावर १२, लाडपांगे समितीच्या शिफारशीनुसार १६ व सरळ सेवेने ३ असे एकूण ३१ महिला व पुरुषांना शिपाई, चौकीदार, सफाई कामगार या पदांवर नियुक्ती पत्रे दिली आणि विविध जिल्ह्यांत नियुक्त केले. त्‍यांचे नियुक्ती पत्र बनावट असल्याचे निदर्शनास आल्याने कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांनी उपकार्यकारी अभियंता एस. बी. बिहारे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची चौकशी समिती नेमली. समितीने दोन्ही लिपिकांनी नियुक्त केलेल्या ३१ व्यक्‍तींना हजर होण्यास सांगितले असता ते हजर झाले नाहीत. दोन्ही लिपिकांनी भरती प्रक्रियेचे व इतर कागदपत्रांची फाईलही कार्यालयातून गायब केली.

मोठ्या आर्थिक व्यवहाराची शक्‍यता
दोन लिपिक एवढा सर्व प्रकार करतील, याबद्दल साशंकता असून, त्‍यांच्यावर कुणाचा वरदहस्त होता, हेही आता पोलीस तपासात समोर येण्याची शक्‍यता आहे. बनावट नियुक्ती पत्र देऊन दोन्ही लिपिकांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केल्याची शक्‍यता आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोषकुमार जोशी करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दर मिनिटाला वाढताहेत फ्‍लॅटच्या किंमती

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software