- News
- सिटी डायरी
- अपघातप्रसंगी मदत करणाऱ्यांना चौकशीचा ससेमिरा नाही, उलट बक्षीस देणार!; छत्रपती संभाजीनगरमध्ये राबविणा...
अपघातप्रसंगी मदत करणाऱ्यांना चौकशीचा ससेमिरा नाही, उलट बक्षीस देणार!; छत्रपती संभाजीनगरमध्ये राबविणार ‘राह-वीर’ योजना, जिल्हाधिकारी काय म्हणाले...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : रस्ते अपघात प्रसंगी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून सेवाभावी कार्य करणाऱ्या मृत्युंजय दुतांना प्रोत्साहन दिले पाहिजे. जिल्ह्यातील रस्ते अपघातातील मृत्यू रोखण्यासाठी लोकांपर्यंत ‘राह-वीर’ योजनेची माहिती पोहोचवा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज, ५ मार्चला दिले.
सेव्ह लाईफ फाऊडेशन या संस्थेने सन २०२३-२४ मध्ये केलेल्या सर्व्हेक्षणाच्या अहवालानुसार, जिल्ह्यात २०९ अपघातप्रवण स्थळे आहेत. जिल्ह्यात शून्य अपघात अभियान राबविण्याच्या दृष्टीने उपाययोजना राबविणे अपेक्षित असून त्यासाठी अपघातप्रवण स्थळांवरील अपघात प्रवणता निर्मूलन करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महानगरपालिका, आरोग्य विभाग, परिवहन विभाग, गृह विभाग, शिक्षण विभाग अशा सर्व विभागांनी संयुक्तपणे उपाययोजना राबवावयाच्या आहेत.
जिल्ह्यात नक्की करण्यात आलेल्या अपघातप्रवण स्थळांचे भौगोलिक अंकन करण्यात आले आहे. त्या अंकनाची माहिती भौगोलिक स्थान माहिती सेवा पुरविणाऱ्या संस्थांना द्यावी. त्यानुसार वाहन चालक वाहन चालविताना या सेवांचा वापर करेल व रस्त्यात पुढे येणाऱ्या अपघातप्रवण स्थळाबाबत त्यास आगाऊ सूचना मोबाईलद्वारे दिली जाईल. तसेच रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना अपघात झाल्यापासून ते प्रत्यक्ष उपचार मिळण्याचा कालावधी हा कमीत कमी करण्याबाबतही उपाययोजना कराव्या. त्यासाठी १०८ क्रमांक रुग्णवाहिकांची व्यवस्था सुसज्ज असावी.
मृत्युंजय दुतांना २५ हजार रुपयांचे बक्षीस
अपघात प्रसंगी मदत करण्यासाठी अनेक लोक उगाच चौकशीचा ससेमिरा मागे लागेल म्हणून मदत करण्याचे टाळतात. मात्र अशा मदत करणाऱ्या मृत्युंजय दुतांना ‘राह-वीर’ या योजनेत २५ हजार रुपये इतके बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येते, अशी माहितीही या वेळी देण्यात आली. या योजनेची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून रस्ते अपघातप्रसंगी मदत करण्यासाठी लोक पुढे येतील, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. तसेच त्यासाठीची जिल्हास्तरीय समितीही गठीत करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

