- News
- राज्य-राष्ट्र स्पेशल
- बिगुल वाजला : नगरपरिषद, नगरपंचायतींची निवडणूक जाहीर, २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला मतमोजणी
बिगुल वाजला : नगरपरिषद, नगरपंचायतींची निवडणूक जाहीर, २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला मतमोजणी
मुंबई (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम अखेर आज, ४ नोव्हेंबरला राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, २४६ नगर परिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीत २ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला मतमोजणी होईल.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक आयोगाने संकेतस्थळ सुरू केले असून, तिथे अर्ज स्वीकारले जातील. एका प्रभागात एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. सोबत जात वैधता प्रमाणपत्रदेखील आवश्यक असेल. ज्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे त्यांना अर्ज केल्याची पावती जमा करावी. मात्र असा उमेदवार निवडून आला तरी त्याला निवडून आल्यानंतर सहा महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र देणे आवश्यक असणार आहे.
खर्चाचं काय?
उमेदवारांसाठी खर्च मर्यादा वाढवली असून, अ वर्ग नगर परिषदेसाठी सदस्य पदासाठी ५ लाख, तर अध्यक्ष पदासाठी १५ लाख, ब वर्गासाठी अध्यक्षपदासाठी ११ लाख २५ हजार तर सदस्य पदासाठी ३ लाख ५० हजार, क वर्गासाठी अध्यक्ष पदासाठी ७ लाख ५० हजार आणि सदस्य पदासाठी २ लाख ५० हजार. नगरपंचायतीसाठी अध्यक्ष पदासाठी ६ लाख आणि सदस्य पदासाठी २ लाख २५ हजार अशी खर्चाची मर्यादा राहणार आहे.
असे होईल मतदान...
नगरपरिषदेची सदस्य संख्या सामान्यतः २० ते ७५ अशी आहे. नगरपंचायतीची सदस्यसंख्या १७ आहे. नगरपरिषदेची निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीनुसार आहे. एका प्रभागात सर्वसाधारणपणे २ जागा असतात. पण नगरपरिषदेचा सदस्यसंख्येचा आकडा विषम असेल तर तिथे ३ जागा असतात. म्हणजे साधारणतः मतदारांना २-३ सदस्यांसाठी मतदान करावे लागेल. नगर पंचायतीमध्ये एक सदस्य आणि एक अध्यक्ष असतो. त्यामुळे तिथे मतदारांना २ मते द्यावी लागतील. निवडणुका इलेक्ट्रॉनिक मशीन आणि बॅलेट युनिट वापरण्यात येतील.

