- News
- पॉलिटिक्स
- CM अन् DCM छत्रपती संभाजीनगरात, एकाच छताखाली पण बोलणं-भेटणं नाही, दोघेही म्हणाले, आम्ही फोनवर बोलतो...
CM अन् DCM छत्रपती संभाजीनगरात, एकाच छताखाली पण बोलणं-भेटणं नाही, दोघेही म्हणाले, आम्ही फोनवर बोलतो!
छत्रपती संभाजीनगर (मनोज सांगळे : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : राज्यातील नगरपालिका निवडणुकांत बहुतांश ठिकाणी आमनेसामने ठाकलेले भाजप- शिंदे गट या दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर सोडले जाणारे टीकास्त्र, त्यांना आवर घालण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अपयश येत असल्याने, त्याचे पडसाद छत्रपती संभाजीनगरमध्येही उमटले आहेत. आज, १ डिसेंबरला हे दोन्ही नेते छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. रविवारी रात्री शहरातील एकाच हॉटेलमध्ये ते मुक्कामी होते. मात्र, तरीही त्यांनी भेट आणि बोलणे टाळले. आम्ही फोनवर बोलतो, असे उत्तर दोघांकडूनही आले, तरी यामुळे सर्व काही अलबेल नाही, हेच दिसून येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
-शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे यांनी मालवणमधील भाजप पदाधिऱ्याच्या घरी जाऊन स्टिंग ऑपरेशन करत पैशांनी भरलेली बॅग समोर आली. या प्रकरणात घरात अनधिकृत घुसल्याबद्दल आमदार नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
- शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या घराची १०० हून अधिक पोलिसांनी झाडाझडती घेतली. दोन दिवसांपूर्वी भाजप आमदार भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी बांगर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली.
-शिंदे गटाचे सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने छापा मारून झडती घेतली.
या कारवायांमुळे शिंदे गटाच्या आमदारांत खळबळ उडाली असून, सत्तेत असूनही ज्या प्रकारे कारवाईला सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे त्यांच्यात चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर टीका केली. निर्णय अत्यंत चुकीचा असल्याचे ते म्हणाले. या संदर्भात लवकरच आम्ही निवडणूक आयोगाला निवेदन देणार आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया आणि वैजापूर, गंगापूर आणि पैठण तालुक्यातील ८ नगरसेवकपदाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. निवडणूक आयोग कुणाचा सल्ला घेतंय याची कल्पना नाही. पण अशा पद्धतीने एखादा व्यक्ती कोर्टात गेला म्हणून निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत. हा उमेदवारांवर अन्याय आहे. उद्या निवडणूक आहे आणि आज तुम्ही ती लांबणीवर टाकता, यामुळे त्यांचे श्रम व मेहनत वाया गेली, असे मुख्यमंत्री म्हणाले. शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावरील छाप्याबद्दल मुख्यमंत्री म्हणाले, की कुणी सत्तेत आहे किंवा कुणी बाहेर आहे यावरून छापा ठरत नाही. माझीही गाडी तपासली जाते. यात सत्ताधारी किंवा विरोधक अशा गोष्टी नसतात, असे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?
मुख्यमंत्र्यांसोबत आपले कोणतेही मतभेद नाहीत, असे स्पष्ट करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले, की व्यस्त वेळापत्रकामुळे आमची भेट होऊ शकली नाही. पण आम्ही फोनवर संपर्कात असतो. शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावरील छाप्याबद्दल ते म्हणाले, की त्यात सिरियस घेण्यासारखे काही नाही. नियमानुसार चौकशी होईल. संजय राऊत यांनी शिंदे गटाचे ३५ आमदार फुटणार असल्याचे वक्तव्य केले आहे, त्यावर एकनाथ शिंदे यांनी हसत उत्तर देणे टाळले. त्यांना प्रकृती स्वास्थाच्या शुभेच्छा दिल्या.

