- News
- पॉलिटिक्स
- ४ अनुचित घटना, लाठीमार, छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीची मतमोजणी पुढील ५ वर्षे आठवत राहणार...
४ अनुचित घटना, लाठीमार, छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीची मतमोजणी पुढील ५ वर्षे आठवत राहणार...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक जशी मतदानापूर्वी झालेल्या आरोप-प्रत्यारोपांनी लक्षात राहील, तशीच मतमोजणीदरम्यान झालेल्या राड्यांमुळेही पुढील ५ वर्षे स्मरणात राहणार आहे. शहरातील चारही मतमोजणी केंद्रांवर अनुचित प्रकार घडले...
सकाळी ९ वाजता हर्षदा शिरसाट यांचे प्रतिनिधी म्हणून माजी महापौर विकास जैन, अभिजीत जीवनवाल, शिवा राजपूत हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मतमोजणी केंद्रात जात असताना सहायक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांच्यासोबत त्यांचा वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला. यात विकास जैन यांच्यासह चौघे जण गंभीर जखमी झाले. त्यांना घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेनंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मतमोजणी केंद्रावर धाव घेतली. पालकमंत्र्यांनी पोलिसांवर तीव्र शब्दांत टीका केली. पोलिसांना कसली मस्ती आहे? असा संतप्त सवाल केला. प्रतिनिधींकडे आयकार्ड असताना बळाचा वापर करणे शुद्ध मस्तवालपणा असून, रस्त्यावर वाहतूक कोंडी आणि गर्दी असताना पोलीस बेफिकीर आहेत आणि प्रतिनिधींना मारहाण करतात, ही कसली कायदा-सुव्यवस्था? असा सवाल त्यांनी केला.
चिकलठाणा एमआयडीसीतील गरवारे हायटेक फिल्ममधील मतमोजणी केंद्राबाहेर राजकीय पक्षांचे दोन ते तीन गट सतत आमनेसामने येत होते. पोलिसांनी तीनवेळा सौम्य लाठीमार करत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलीस आयुक्त मनोज पगारे, पोलीस निरीक्षक गीता बागवडे, अतुल येरमे यांच्यासह ८० पेक्षा अधिक अधिकारी, अंमलदार, दंगा काबू सदर मतमोजणी केंद्रात बंदोबस्त तैनात होता. बाहेर उभ्या समर्थकांना निकाल ऐकण्यासाठी लावलेले भोंगे दूरवर असल्याने गदारोळ झाला. सकाळी १० वाजताच हजारोंचा जमाव मतमोजणी केंद्राच्या दिशेने चालून गेला. पोलिसांनी लाठीमार करत जमावाला पांगवला. मतमोजणी अंतिम टप्प्यात असताना गरवारे मैदानासमोर उमेदवारांचे समर्थक जमा झाले. जमाव समोरासमोर येऊन घोषणाबाजी करत होते. पोलिसांनी पुन्हा बळाचा वापर करून त्यांना पांगविले. एमआयएमचा विजयी उमेदवार केंद्राबाहेर येताच समर्थकांनी बॅरिकेट ओलांडून आत जाण्याचा प्रवेश केला. पोलिसांनी परत लाठीमार करावा लागला.
घटना ३
गरवारे आयटी पार्क मतमोजणी केंद्रात दुपारी ३:३० नंतर राडा झाला. प्रभाग २४ (अ) मधून भाजपच्या गंगाबाई भवरे ७३७३ मत मिळवून विजयी झाल्या. वंचित बहुजन आघाडीचे सतीश गायकवाड यांना ६६०४ मते मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी घोषित केले. मात्र, कुचे यांच्या सूचनेवरून ईव्हीएम मशीन बदलून गडबड करण्यात आल्याचा आरोप करत गायकवाड यांनी करीत पुनर्मोजणीची मागणी केली. ही मागणी अमान्य झाल्याने त्यांनी सुरक्षा जाळीवर चढून थेट निवडणूक अधिकाऱ्यांच्या कक्षेत उडी मारली आणि केंद्रात गोंधळ उडाला. भवरे यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान करताना गायकवाड यांनी आक्षेप घेतल्याने तणाव वाढत गेला. वंचित बहुजन आघाडीच्या हजारो कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रात घुसून प्रवेशद्वारावरच ठिय्या देत घोषणाबाजी सुरू केली. तासभर मतमोजणी केंद्राचा प्रवेश बंद करावा लागला. या वेळी चांगलीच धक्काबुक्की झाली. प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी जमावाला शांत राहण्यासाठी आवाहन केले. मात्र, जमाव ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनीही घटनास्थळी येत समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गायकवाड यांनी स्वतः केंद्राबाहेर येत जमावाला शांततेने आवाहन केले. यानंतर हजारोंचा जमाव कलाग्राममार्गे पायीच संघर्षनगरच्या दिशेने निघाला. आमदार कुचे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. जवळपास २ ते ३ हजारांच्या जमावामुळे जालना रोडची एक बाजू खोळंबली होती. त्यातच काही तरुणांनी मुकुंदवाडी गावाच्या दिशेने जात कुचे यांच्या घराच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच सौम्य लाठीचार्ज केल्याने ते माघारी फिरले. त्यानंतर संघर्षनगरमध्ये मोर्चा नेण्यात आला. निकालाच्या विरोधात न्यायालयात जाण्याची घोषणा गायकवाड यांनी केली आहे.
घटना ४
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये दुपारी २ च्या सुमारास प्रभाग १६ ‘ड'च्या मतमोजणी प्रसंगी एका 'ईव्हीएम' मध्ये १४ जानेवारी रोजी २२५ मतदान झाल्याचे दिसल्याने खळबळ उडाली. ठाकरे गटाचे उमेदवार राजेंद्र दानवे व त्यांच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतला. त्यानंतर उपस्थित अभय टाकसाळ व अन्य उमेदवारांनी व त्यांच्या प्रतिनिधींनीदेखील आक्षेप घेत उत्तर मागितले. त्यामुळे दोन तास मतमोजणी प्रक्रिया ठप्प झाली. मतमोजणी कर्मचारी व अधिकाऱ्यांना घाम फुटला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कोणी ऐकण्याच्या तयारीत नव्हते. अखेर पोलीस आयुक्त प्रवीण पवार व दंगाकाबू पथकाचे कमांडो मतमोजणी कक्षात दाखल झाले. त्यानंतर राजेंद्र दानवे यांच्यासह अन्य उमेवार त्यांच्या प्रतिनिधींनी आमच्यावर दबाव टाकण्यासाठी पोलीस आयुक्तांना बोलावले का, असे म्हणत गोंधळ घातला. त्यामुळे पोलिसांना मतदान कक्षाच्या बाहेर जावे लागले. निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश अपार यांनी सांगितले की, उमेदवारांचा गैरसमज झाला. हा ‘क्लॉक एरर' होता. ‘ईव्हीएम' बंद करताना उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्याही घेतल्या जातात. तपासणीत या बाबी समोर आल्यानंतरही या घटनेचा निषेध करीत उमेदवार मतमोजणी कक्षाच्या बाहेर निघून गेले.

