- News
- पॉलिटिक्स
- प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छ. संभाजीनगरात मोठी घोषणा; आंब...
प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छ. संभाजीनगरात मोठी घोषणा; आंबेडकरी समाजाकडून मुख्यमंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त
छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : येत्या चार दिवसांनी आपण देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहोत. बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना होती म्हणूनच आपण एक प्रजासत्ताक, सार्वभौम राष्ट्र म्हणून जगभर ओळखले जाऊ लागलो. बाबासाहेबांच्या संविधानाचा आदर वाढावा, त्याद्वारे सामाजिक न्यायाची भावना अधिक दृढ व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ […]
छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : येत्या चार दिवसांनी आपण देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहोत. बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना होती म्हणूनच आपण एक प्रजासत्ताक, सार्वभौम राष्ट्र म्हणून जगभर ओळखले जाऊ लागलो. बाबासाहेबांच्या संविधानाचा आदर वाढावा, त्याद्वारे सामाजिक न्यायाची भावना अधिक दृढ व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज, ११ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरात केली. शहराचा डीपी प्लॅन हा सर्वांच्या हिताचा असेल तोच करू, अशी ग्वाहीही त्यांनी शहरवासियांना दिली.


महाराष्ट्र माझा परिवार…
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, मुंबईत इंदू मिल इथं बाबासाहेबांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्याचं काम वेगानं सुरू आहे. बार्टीच्या ८६१ विद्यार्थ्यांना आम्ही फेलोशिप मंजूर केली. बार्टी, सारथी, महाज्योती,अमृत, टीआरटीआय या संस्थांच्या अधिछात्रवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती या योजनांमध्ये समानता आणली. संजय गांधी, श्रावणबाळ योजनेत निवृत्तीवेतन वाढवलं. राज्यातल्या ७३ अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकांच्या वस्त्यांना नवे रूप देतो आहोत. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून गरीब, मागास, दुर्बलांना मुख्य प्रवाहात आणतोय,असे सांगून शासनामार्फत मागास घटकांच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहितीही उपस्थितांना दिली.
सर्वांच्या हिताचा विकास आराखडा
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देणारा जळगाव- जालना या महामार्गाच्या उभारणीसाठी शासनाच्या वतीने द्यावयाच्या ३५५२ कोटी रुपयांचा हिस्साही भरण्यास मान्यता दिली आहे. छत्रपती संभाजीनगर शहराच्या विकास आराखड्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सर्वांच्या हिताचा विचार करणारा विकास आराखडा आपण तयार करू. हे घर देणारे सरकार आहे लोकांना बेघर करणारे नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम खरात यांनी केले. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आ. प्रदीप जयस्वाल, खासदार संदिपान भुमरे यांनीही मनोगत व्यक्त केले. पंचशिला भालेराव यांनी ‘शिंदे साहेबांनी आणली लाडकी बहीण योजना’ हे गीत सादर केले. सोहळ्यास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रविणा कन्नडकर यांनी सूत्रसंचालन केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमानतळावर स्वागत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज सायंकाळी ६:२५ च्या सुमारास येथील विमानतळावर आगमन झाले. प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. पणन व अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार संदीपान भुमरे, आ. संजय शिरसाठ, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड आदी उपस्थित होते.

