मतासाठी साड्या, पैशांची उधळण... छत्रपती संभाजीनगरकरांनो, लक्षात घ्या, आज थोड्याशा पैशांसाठी तुम्ही विकले जाल, पण ५ वर्षे पश्चाताप कराल!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. अनेक उमेदवारांनी मतदारांना भुलवण्यासाठी साड्या, संसारउपयोगी वस्तू, किराणा, अगदी रोख रक्कम देण्याचा सपाटा लावला आहे. रातोरात ‘सेवा’ पोहोचवली जात आहे. मात्र हे सर्व ‘दान’ नसून उद्याच्या भ्रष्टाचाराची गुंतवणूक आहे, हे नागरिकांनी समजून घेण्याची वेळ आली आहे. आज मिळणारी वस्तू किंवा रक्कम तुम्हाला महिनाभरही पुरणार नाही. पण पुढील ५ वर्षे तुम्ही पश्चाताप केल्याशिवाय राहणार नाहीत.

निवडणुकीच्या काळात वाटले जाणारे पैसे, साड्या, भांडी किंवा संसारोपयोगी वस्तू उमेदवार स्वतःच्या खिशातून देत नाहीत. हा खर्च निवडणुकीनंतर विकासकामांच्या नावाखाली कमिशनखोरीतून, निकृष्ट कामांतून आणि बिले फुगवून वसूल केला जातो. आज जे मत विकत घेतले जाते, त्याची किंमत पुढील पाच वर्षे संपूर्ण शहराला मोजावी लागते. रस्ते खोदून पुन्हा तसेच राहतात, ड्रेनेजची कामे पहिल्या पावसात वाहून जातात, पाणीपुरवठा योजना कागदावरच राहतात. यामागे एकच कारण असते, निवडणुकीत उधळलेला काळा पैसा परत काढण्याची घाई. परिणामी ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी संगनमताने कामांचा दर्जा पायदळी तुडवतात.

मतदारांना वाटलेली साडी एक-दोन दिवस टिकेल, पण निकृष्ट रस्ता पाच वर्षे अपघात घडवेल. दिलेले तीन-पाच हजार रुपये क्षणिक दिलासा देतील, पण खराब ड्रेनेजमुळे होणारे आजार, पाणीटंचाई आणि शहराची विद्रूप अवस्था वर्षानुवर्षे सहन करावी लागेल. हा व्यवहार म्हणजे मतदारांच्या भवितव्याची सरळसरळ लूट आहे. लोकशाहीत मतदान हा अधिकार आहे, विक्रीची वस्तू नाही. पैसा, साड्या, वस्तू स्वीकारून मत देणे म्हणजे स्वतःच्या हक्कांवर पाणी फेरणे आहे. शहराचा विकास, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधा या सगळ्यांवर याचा थेट परिणाम होतो. छत्रपती संभाजीनगरच्या मतदारांनी यावेळी सजग राहणे गरजेचे आहे. क्षणिक लाभाच्या आमिषाला बळी न पडता उमेदवारांचा भूतकाळ, त्यांची कामगिरी, त्यांचे विचार आणि विकासाची दृष्टी तपासली पाहिजे. नाहीतर आज मिळालेली साडी उद्या फाटलेला रस्ता, तुंबलेली गटारे आणि उद्ध्वस्त शहर म्हणून परत येईल.

पक्षाशी एकनिष्ठ नाहीत, तिथे शहराशी काय असणार?
आज जे उमेदवार एका पक्षाच्या तिकीटावर मत मागत आहेत, तेच कालपर्यंत दुसऱ्या पक्षावर टीका करत होते, आणि उद्या सत्तेचा वारा फिरला तर पुन्हा पक्ष बदलेल याची खात्री कोणी देऊ शकते का? सत्ता, पैसा आणि पद यासाठी पक्षांतर करणाऱ्या व्यक्तीकडून शहराच्या विकासाबाबत निष्ठा अपेक्षित ठेवणे ही मतदारांची मोठी फसवणूक आहे. ज्यांची निष्ठा पक्षाशी नाही, ती शहराशी असेल, यावर विश्वास कसा ठेवायचा? आज जे उमेदवार मत विकत घेत आहेत, ते उद्या विकासकामांची कंत्राटे, भूखंड, आरक्षणांची तडजोड आणि सार्वजनिक मालमत्ता विकायला मागेपुढे पाहणार नाहीत. ज्या उमेदवारांकडे विकासाचा आराखडा नाही, शहरासाठी स्पष्ट दृष्टी नाही, ते मतदारांशी थेट व्यवहार करतात. प्रश्न, योजना, आरोग्य, शिक्षण, पाणी, वाहतूक यावर चर्चा करण्याऐवजी साड्या आणि पैशांवर बोलणे हीच त्यांची राजकीय पात्रता उघड करते. विचारांऐवजी व्यवहार करणारे लोकप्रतिनिधी शहराला कधीच पुढे नेऊ शकत नाहीत.
धर्मावर निवडणूक केंद्रीत करण्याचा प्रयत्न
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत सध्या एकच गोष्ट ठळकपणे दिसते आहे, ज्या उमेदवारांकडे शहराच्या विकासाचा ठोस आराखडा नाही, ते आता धर्माचा मुद्दा पुढे करत आहेत. भावनांचे राजकारण सुरू झाले आहे. निवडणुकीपुरते जात- धर्म आठवणारे लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर मात्र नागरिकांना विसरतात. मग न जात राहते, न धर्म-फक्त सत्ता आणि स्वार्थ उरतो. विकासकामे ठप्प पडतात आणि शहर मागे पडते.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!

Latest News

मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार! मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुचाकीचा चुकून धक्का लागल्याने एकाने दुचाकीस्वारावर चाकूचे वार करून जखमी केले. ही घटना मुकुंदवाडीतील...
छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना
गव्हाबरोबर गांजा वाढवला... पोलिसांचा शेतात छापा, ५ लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक, करमाडजवळील कारवाई
वाळूज MIDC तील कमळापुरात दोन गटांत सशस्त्र हाणामारी; ४ गंभीर जखमी, वरिष्ठ पोलिसांचा फौजफाटा घटनास्‍थळी, परिस्थितीवर नियंत्रण (व्हिडीओसह)
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software