- News
- एक्सक्लुझिव्ह
- विशेष वार्तापत्र : सर्वांची पाठीला पाठ, छत्रपती संभाजीनगर महापालिकेत हिंदुत्ववादी मतांचे विभाजन कुणा...
विशेष वार्तापत्र : सर्वांची पाठीला पाठ, छत्रपती संभाजीनगर महापालिकेत हिंदुत्ववादी मतांचे विभाजन कुणाच्या पथ्यावर?
मनोज सांगळे, संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट, मो. ८७९९८३१४१०
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक सारेच पक्ष स्वतंत्ररित्या लढत आहेत. भाजप आणि शिंदे गटाची युती ऐनवेळी जागा वाटपावरून तुटली. एमआयएम, अजित पवार गट, ठाकरे गट, काँग्रेस, शरद पवार गट, वंचित बहुजन आघाडी सारेच स्वतंत्र रिंगणात आहेत. छत्रपती संभाजीनगर शहर संवेदनशील आहे. भाजप-शिवसेनेच्या युतीला एकगठ्ठा हिंदुत्ववादी मते मिळत होती. यावेळी दोन्ही पक्ष वेगळे लढत असल्याने आणि त्यातही शिवसेनेची दोन शकले झालेली असल्याने हिंदुत्ववादी मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणावर होऊन ते कुणाच्या पथ्यावर पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एमआयएम गेल्या निवडणुकीप्रमाणे जोरकसपणे लढाई लढत आहे. मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांची आशा एमआयएमला असली तरी, नजीकच्या काळात ठाकरे गटाकडेही मुस्लिम समाज आकर्षित झाला आहे. त्यामुळे एमआयएमसाठी धोक्याची घंटा ठरली आहे.
सध्या भाजप आणि शिंदे गटात अटीतटीची स्पर्धा सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपला शिंदे गटाच्या उमेदवारांपेक्षा जास्त उमेदवार निवडून आणायचे आहेत. तसेच शिंदे गटाचेही आहे. निकालानंतर युती पुन्हा होऊन ज्याचे जास्त उमेदवार तो पक्ष महापौर पदावर दावा करणार असल्याने या दोन्ही पक्षांत मोठी लढाई सुरू आहे. या स्पर्धेत कोण पुढे राहते, की दोन्ही पक्ष मागे पडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दोन पक्षांच्या भांडणात हिंदुत्ववादी मतदार मात्र पेचात सापडला आहे. ही निवडणूक भाजप मंत्री अतुल सावे आणि खा. डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्त्वात लढत असून, शिंदे गटाचे नेतृत्व मंत्री संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ करत आहेत. भाजपचे ११ जण उमेदवारी न मिळाल्याने ऐनवेळी शिंदे गटाचे तिकीट मिळवून रिंगणात आहेत.
ठाकरे गट झाला धर्मनिरपेक्ष...
या निवडणुकीत यापूर्वीचा हिंदुत्ववाद ठाकरे गटाने बाजूला ठेवला आहे. एक धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून ठाकरे गट सामोरा जात आहे. ठाकरे गटाने काँग्रेसच्या माजी महापौर रशीद मामू यांच्यासह अनेक मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तितकेच अनुसूचित जातीच्या उमेदवारांनाही तिकीट दिले आहे. याचा फायदा या पक्षाला कितपत होईल हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.
वंचित, एमआयएमचे काय होणार?
गेल्या निवडणुकीत एमआयएमचे तब्बल २५ नगरसेवक निवडून आले होते. मुस्लिमांची एकगठ्ठा मते एमआयएमला मिळाली होती. नंतरच्या काळातही एमआयएमने या मतांवरची पकड कायम ठेवली. विधानसभा, लोकसभा निवडणुकांतही हेच चित्र दिसले. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुस्लिमांची मते सुमारे ३१ टक्के असल्याचे अहवाल सांगतो. १५ टक्के अनुसूचित जातीची मते आहेत. हिंदू मते ५१ टक्के आहेत. हिंदू मतांचे विभाजन प्रत्येक पक्षात होते. तसे मुस्लिम मतांचे विभाजन होईलच असे नाही. एमआयएमचा शिरकाव छत्रपती संभाजीनगरमध्ये झाल्यापासून या पक्षाची कमान चढती राहिली आहे. त्यामुळे एमआयएम या निवडणुकीत मोठीच बाजी मारू शकतो, असा राजकीय अंदाज आहे. वंचित बहुजन आघाडीही शहरात भक्कम आहे. अनुसूचित जातींच्या मतांसह अठरापगड जातीच्या मतांवर ‘वंचित’ हक्क सांगतो. त्यामुळे चित्र बऱ्यापैकी रोमांचक असणार आहे.
काँग्रेसचं काय?
लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिकांच्या निवडणुकीत काँग्रेसने लक्षणीय कामगिरी केली आहे. कधीकाळी छत्रपती संभाजीनगर महापालिका ताब्यात ठेवणारी, शहरात आमदार असणारी काँग्रेस हळूहळू शहरात क्षीण होत गेली. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे अवघे १० नगरसेवक निवडून आले होते. बदलत्या राजकीय वातावरणात काँग्रेस काय कामगिरी करेल, याकडेही सर्वांचे लक्ष आहे.

