Political Exclusive : सावे, कराडांच्या मनमानीने पक्ष अडचणीत, निष्ठावंतांचा उद्वेग, आयात केलेल्या अन्‌ घरातल्या उमेदवारांचे होणार काय?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (विशेष प्रतिनिधी : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भारतीय जनता पक्ष म्हणजे शिस्तीचा पक्ष. केवळ सत्तेसाठी तत्व, नियम आणि शिस्त कधीही मोडायची नाही, हा या पक्षाचा प्रघात. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मात्र स्थानिक नेत्यांनी पक्षाची शिस्त आणि तत्वे पुरती पायदळी तुडवली. सर्वेक्षणाचे नाव पुढे करून मंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड यांनी राज्यस्तरीय नेत्यांना अंधारात ठेवून मनमानी करत आपल्याच घरातले आणि ताटाखालचे मांजर बनलेले उमेदवार दिले. आता प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू असताना पक्षाला जो फटका बसत आहे, त्याची प्रचिती येत आहे.

नगर परिषद आणि नगर पालिकांच्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी नेत्यांच्या आप्तस्वकियांना उमेदवाऱ्या दिल्याने मोठ्या नाराजीचा सामना करावा लागला होता. यानंतर महापालिकेच्या निवडणुकीत नेत्यांच्या मुला-मुलींना तिकिटे न देण्याची घोषणा भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांनी केली होती. छत्रपती संभाजीनगर शहरात मात्र पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी हा नियम बासनात गुंडाळून ठेवला. अनेक वर्षे कुठेही नसलेले मात्र नंतर पंकजा मुंडे यांना पर्याय म्हणून समोर आलेले डॉ. भागवत कराड आणि कधीकाळी शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्या आणि आता मंत्री असलेल्या उद्योगपती अतुल सावे हे पक्षाचे सर्वेसर्वा बनले आहेत.

या दोन्ही नेत्यांनी स्थानिक भाजपवर पूर्णत: ‘कब्जा’ मिळवला आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांनी पक्षाची शिस्त, तत्वे आणि नियम गुंडाळून ठेवत मनमानी सुरू केल्याची खुलेआम चर्चा सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात तब्बल दहा वर्षांनंतर महापालिकेची निवडणूक होत आहे. हिंदुत्ववादी विचारसरणीच्या राजकीय पक्षांना साथ देणारे शहर अशी छत्रपती संभाजीनगरची ओळख आहे. याच जोरावर आजवर शिवसेना (एकत्रित) आणि भाजपने एकमेकांच्या साथीने महापालिकेच्या माध्यमातून या शहरावर राज्य केले. यंदा मात्र या निवडणुकीत भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या हेकेखोरीमुळे भाजपची शिवसेनेशी (एकनाथ शिंदे गट) युती होऊ शकली नाही.

निष्ठावंतांवर भरोसा नाय
शिंदेसेनेशी युती तुटल्यानंतर महापालिकेवर एकहाती सत्ता मिळविण्याच्या दृष्टीने शहरभर तगडे उमेदवार उभे करण्याची संधी भाजपकडे होती. असे अनेक तगडे आणि निष्ठावंत उमेदवार भाजपकडे होतेही. पण डॉ. कराड आणि सावेंनी ही संधी पुरती गमावली. आपल्याच पक्षाच्या निष्ठावंतांना दूर ठेवत डॉ. कराड आणि सावे यांनी आपल्याच जवळच्या (मागेपुढे करणाऱ्या) आणि इतर पक्षांतून आयात केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या झोळीत उमेदवारीचे दान टाकले. डॉ. कराड यांनी मेहुणीला तर सावे यांनी आपल्याच पीएला उमेदवारी दिली आहे. शिवाय इतर पक्षातून आलेले राजू वैद्य, मिथून व्यास, जयश्री व्यास, लता दलाल अशांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

या आयातांना भाजपची ध्येयधोरणे माहिती नाहीत. केवळ राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपच्या तिकिटावर निवडून येता येऊ शकेल या उद्देशाने ते भाजपमध्ये आले आहेत. आता प्रचार सुरू असताना निष्ठावंत एकीकडे आणि आयात उमेदवार दुसरीकडे असे चित्र शहर भाजपमध्ये दिसून येत आहे. कारण आधीपासूनचा आपला (निष्ठावंत) आणि सावे व कराड यांनी बोकांडी बसवलेला उमेदवार अशी उभी फळी सध्या पक्षात निर्माण झाली आहे. नंतर नेत्यांच्या विनंतीवर निष्ठावंत बंडखोरांनी उमेदवारी मागे घेतले असली तरी आयात उमेदवारांच्या प्रचारात ते सध्या कुठेही सक्रिय दिसत नाहीत, असे चित्र आहे. उमेदवारी देताना सावे, कराड यांनी मनमानी केल्याने पक्षाचे निष्ठावंत नाराज झाले होते. ही नाराजी कोणत्या पातळीवर पोहोचली होती, हे या निष्ठावंतांनी सावे यांना घातलेला घेराव आणि डॉ. कराडांची फोडलेली गाडी यातून दिसून आली होती.

जातीय समीकरणही बिघडले...
भाजपवरील जातीचे लेबल काढून टाकण्याची संधी या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला होती. मात्र, ओबीसींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सावे व कराड यांनी ती संधी देखील गमावली. ‘हम करेसो कायदा' हेच धोरण राबवताना या दोन्ही नेत्यांनी बांधाच्या पलीकडे बघून मराठा समाजातील चांगल्या व तगड्या प्रतिनिधींना उमेदवारी मिळणार नाही याची काळजी घेतली. उदाहरणादाखल कुणाल मराठे नावाच्या निष्ठावंत, कट्टर कार्यकर्त्याने शेवटी शिंदे गटाचा धनुष्य हाती घेतल्याचे पहायला मिळाले. सध्या भाजपचे बहुतांश उमेदवार ओबीसी समाजातील आहेत. यामुळे साहजिकच आता नाराज असलेला मराठा समाज काय प्रतिक्रिया व्यक्त करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मुख्यमंत्र्यांचा फक्त 'टॉक शो'
गेल्या दहा वर्षांत विविध निवडणुकांच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगरात येऊन आपल्या दणकेबाज भाषणांनी चित्र पालटल्याचे सर्वांनी पाहिले होते. यावेळी तसेच होईल, अशी अपेक्षा होती. मात्र भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची सभा घेण्याऐवजी केवळ त्यांचा टॉक शो ठेवून वेळ मारून नेली. सभेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना, मतदारांना आपलेसे करून घेता आले असते. मात्र मुख्यमंत्र्यांचा केवळ मोजक्या लोकांनी स्क्रीनवर पाहिला. एकंदरीतच आता शहरातील मतदार, भाजपचे डावललेले निष्ठावंत सावे व कराड यांची मनमानी सहन करतात की हे दोघे आपली भूमिकाच योग्य होती हे दाखवून देतात हे येत्या सोळा तारखेला कळेलच.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!

Latest News

मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार! मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुचाकीचा चुकून धक्का लागल्याने एकाने दुचाकीस्वारावर चाकूचे वार करून जखमी केले. ही घटना मुकुंदवाडीतील...
छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना
गव्हाबरोबर गांजा वाढवला... पोलिसांचा शेतात छापा, ५ लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक, करमाडजवळील कारवाई
वाळूज MIDC तील कमळापुरात दोन गटांत सशस्त्र हाणामारी; ४ गंभीर जखमी, वरिष्ठ पोलिसांचा फौजफाटा घटनास्‍थळी, परिस्थितीवर नियंत्रण (व्हिडीओसह)
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software