Political Exclusive : सावे-कराडांनी मराठा समाजाला दूर लोटल्याचा आरोप, शिंदे गटाची मुत्सद्दी 'खेळी' यशस्वी होणार का?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (विशेष प्रतिनिधी : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महापालिका निवडणुकीत भाजप मंत्री अतुल सावे आणि खा. भागवत कराड यांनी आपल्या जवळच्यांना आणि आयातांना उमेदवारी देताना आपल्याच पक्षातील मराठा समाजाच्या इच्छुकांना दूर ठेवल्याचा आरोप झाला. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मात्र मराठा समाजाच्या उमेदवारांच्या पदरात उमेदवारीचे भरभरून दान टाकले. आता यातून कोणत्या पक्षाची खेळी यशस्वी ठरते, हे येत्या सोळा तारखेला कळेलच...

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत नगरसेवकांच्या ११५ जागा आहेत. यातील ६० ते ७० वॉर्डांमध्ये मराठा समाजाचे प्राबल्य असल्याचे आकडेवारी सांगते. जो पक्ष उमेदवारी देताना मराठा समाजाला प्राधान्य देईल, त्यालाच महापालिकेतील सत्तेची चावी मिळेल, अशी चर्चा असते. भाजप अनेक वर्षांपासून शिवसेनेसोबत (एकत्रित) राहून महापालिकेची सत्ता उपभोगत आहे. ही सत्ता पूर्णतः आपल्या ताब्यात राहावी, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अर्थात कोणत्याही पक्षाला तसेच वाटते. या वेळी तब्बल दहा वर्षांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेसोबतची (एकनाथ शिंदे गट) युती तोडून सर्व जागी आपले उमेदवार दिले. शहरातील भाजपचे उमेदवारी वाटप मंत्री अतुल सावे आणि खा. भागवत कराड यांच्या हातात होते.

हे दोघेही ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे असल्याने अर्थातच भाजपच्या उमेदवारी वाटपातही याच समाजाला झुकते माप मिळाले. या दोन्ही नेत्यांच्या सभोवतालचा कोंढाळा ओबीसी कार्यकर्त्यांचाच असल्याचे चित्र छत्रपती संभाजीनगरकरांना नेहमीच दिसते. भाजपमध्ये मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. वर्षानुवर्षे ते पक्षासाठी राबत आले आहेत. अत्यंत कडवे आणि निष्ठावंत म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले. असे असूनही यंदा महापालिका निवडणुकीच्या रिंगणात भाजपकडून अगदी बोटावर मोजण्या इतक्या मराठा समाजाच्या निष्ठावंतांना संधी मिळू शकली. पक्षाच्या उमेदवारी वाटपाची धुरा असलेल्या सावे व कराड यांनी आप्तस्वकीय आणि जवळच्यांना उमेदवारी देण्याच्या नादात जास्तीत जास्त उमेदवार ओबीसी समाजाचे असतील याची काळजी घेतली.

यामुळे भाजपच्या उमेदवारांच्या यादीवर नजर टाकल्यावर सुमारे ८० टक्के उमेदवार ओबीसी असल्याचे दिसून येते. आयुष्यभर पक्षासाठी सतरंज्या उचलूनही महापालिकेसाठी उमेदवारी न मिळाल्याने साहजिकच पक्षातील मराठा कार्यकर्ते नाराज झाले. भाजपच्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर मराठा समाजाकडून उमटलेल्या नकारात्मक प्रतिक्रिया आणि झालेला उद्रेक हे त्याचेच प्रतीक होते. त्यांनी सावे आणि कराडांना ज्या शब्दांत सुनावले तेही सर्वांनी व्हायरल झालेल्या व्हिडीओंद्वारे ऐकले.

आता दोघांकडूनही धावाधाव...
उमेदवारी वाटप करताना केलेल्या मनमानीमुळे आता सावे आणि कराड यांनी आप्तस्वकीय आणि समर्थक निवडून आणण्यासाठी धावाधाव सुरू केली आहे. यातूनच ओबीसी समाजाचे असलेले मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना वारंवार शहरात आमंत्रित केले जात आहे. मात्र बावनकुळे यांचे नेतृत्व सर्वसमावेशक नसल्याने त्याचा खूप फायदा पक्षाला होण्याची शक्यता कमी दिसत आहे.

शिंदे गटाची जबरदस्त खेळी
राज्याच्या सत्तेत त्यांचाच सहकारी असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाने मात्र छत्रपती संभाजीनगरात मराठा समाजाला जवळ करण्याची खेळी खेळली आहे. महापालिका निवडणुकीच्या आधी शिंदे गटातील नेते पालकमंत्री संजय शिरसाट आणि पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांच्यात मोठा वाद झाला होता. अगदी शिरसाट यांनी जंजाळ यांना उद्देशून ‘जायचे तिकडे जा' अशी भाषा देखील वापरली होती. खरे तर कोणत्याही सत्ताधारी पक्षात असे वाद होतात, त्यावेळी पक्षश्रेष्ठी मंत्र्यांची बाजू उचलून धरतात. छत्रपती संभाजीनगरात मात्र एकनाथ शिंदे यांनी मात्र या वादावर तोडगा काढताना जंजाळ यांचे महत्त्व कुठेही कमी होऊ दिले नाही. त्यामुळे पक्षातील जंजाळ यांचे महत्त्व वाढले. महापालिका निवडणुकीचे उमेदवारी वाटप करतानाही त्यांच्या शब्दाला महत्त्व दिले गेले. त्यामुळे शिंदे गटात मराठा नेतृत्वाची काळजी घेतली जाते, असा संदेश मतदारांपर्यंत गेला. एकीकडे उमेदवारी वाटपात सावे व कराड हे भाजप नेते मराठा समाजाला डावलत असताना त्या पक्षात नाराज झालेल्या मराठा निष्ठावंतांना शिरसाट व जंजाळ यांनी शिंदे गटात आणून उमेदवारीही दिली. एका अर्थाने शिंदे गटात आपल्या समाजाला आणि समाजाच्या नेत्यांना महत्त्व असल्याचा महत्त्वाचा संदेश मराठा समाजामध्ये गेला.

मराठा समाजाला आधार
निष्ठावंतांना न रूचलेली सावे, कराडांची भूमिका, दुसरीकडे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची मुस्लिम मतांसाठी सुरू असलेली धडपड, एमआयएमचे मुस्लिम मतांवरील पूर्णत: अवलंबित्व, काँग्रेसचे जवळपास संपलेले अस्तित्व या साऱ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा शिंदे गट एवढा एकच पक्ष मराठा समाजाला जवळचा वाटू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दर मिनिटाला वाढताहेत फ्‍लॅटच्या किंमती

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software