- Marathi News
- एक्सक्लुझिव्ह
- ना ओटीपी शेअर केला, ना कुठल्या लिंकवर क्लिक केले, तरी वैजापूरच्या युवकाचे सायबर भामट्याने हडपले ८५
ना ओटीपी शेअर केला, ना कुठल्या लिंकवर क्लिक केले, तरी वैजापूरच्या युवकाचे सायबर भामट्याने हडपले ८५ हजार!; तत्काळ तक्रार करूनही पोलिसांनी गांभीर्याने घेतले नाही, बँकेचेही हात वर!, मग दाद कुणाकडे मागायची?, युवकाला पडला प्रश्न

वैजापूर (गणेश निंबाळकर : सीएससीएन वृत्तसेवा) : वैजापूर शहरातील दुर्गानगर येथील सुमित कारभारी पाटील या युवकाच्या बँक खात्यातून ८५ हजार रुपये सायबर भामट्यांनी गायब केले आहेत. त्यांच्या मोबाइलवर लागोपाठ दोन ओटीपी आले, पण त्यांनी ते कुठे शेअर केले नाहीत, की कोणत्या लिंकवरही क्लिक केले नाही, तरीही भामटे त्यांचे खाते रिकामे करण्यात यशस्वी झाले. याचप्रकारे वैजापूर […]
वैजापूर (गणेश निंबाळकर : सीएससीएन वृत्तसेवा) : वैजापूर शहरातील दुर्गानगर येथील सुमित कारभारी पाटील या युवकाच्या बँक खात्यातून ८५ हजार रुपये सायबर भामट्यांनी गायब केले आहेत. त्यांच्या मोबाइलवर लागोपाठ दोन ओटीपी आले, पण त्यांनी ते कुठे शेअर केले नाहीत, की कोणत्या लिंकवरही क्लिक केले नाही, तरीही भामटे त्यांचे खाते रिकामे करण्यात यशस्वी झाले. याचप्रकारे वैजापूर तालुक्यात अनेकांना सायबर भामट्यांनी गंडवले आहे, पण पोलीसच गांभीर्याने घेत नसल्याने गेलेल्या पैशांकडे चिंताग्रस्त नजरेने पाहण्यापलिकडे कुणी काहीच करू शकत नाही. असे चित्र आहे. पाटील यांच्या खात्यातून इंटरनेट बँकिंगद्वारे पैसे हडपण्यात आले आहेत. त्यामुळे अशा प्रकरणांत बँकांचे अधिकारीही सामील असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तूर्त पाटील यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे तक्रार केली असून, आता कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड हे या प्रकरणाची दखल घेतात का, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.
सुमित पाटील यांचे एचडीएफसी बँक शाखेत खाते आहे. मोबाइल चार्जिंगला असताना त्यांना ओटीपी आले. नंतर लागोपाठ बँक खात्यातून आयएमपीएसद्वारे आधी ७३ हजार ९० रुपये आणि नंतर १२ हजार रुपये कपात झाले. मोबाइल हॅक करून ओटीपी मिळवत ट्रान्झेक्शन झाल्याची शक्यता आहे. कारण पाटील यांनी ना कोणत्या लिंकवर क्लिक केले होते, ना आलेले ओटीपी शेअर केले होते. या प्रकारानंतर पाटील यांनी लगेचच सायबर विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर वैजापूर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले असता पोलिसांनी बंदोबस्ताचे कारण सांगून दोन-चार दिवसांनी यायला सांगितले. त्यानंतर परत गेले असता तक्रार करण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात जायला सांगितले. पाटील हे बँकेत गेले असता व्यवस्थापक गैरहजर होते. अधिकारी महिलेने समाधानकारक उत्तर दिले नाही.
पाटील हैराण झाले आहेत. आता दाद कुणाकडे मागायची, सायबर भामट्यांना अटक होऊन पैसे परत मिळतील का, असा प्रश्न त्यांना पडला आहे. ही केवळ पाटील यांचीच कथा नाही तर वैजापूर तालुक्यातील अनेक शेतकरी, नोकरदारांना अशाप्रकारे लुबाडण्यात आले आहे. मात्र पोलीस आणि बँक अधिकारी कर्तव्याला न जागल्याने राजरोस सायबर भामटे नागरिकांच्या खात्यावर डल्ला मारत आहेत. दरम्यान, यासंदर्भात छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूजने बँकेचे उपव्यवस्थापक विक्रम बोर्डे यांना विचारणा केली असता पाटील यांच्या प्रकरणात वरिष्ठांकडे ई-मेल केला असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक पोलीस दाद देत नसल्याने आणि सायबर क्राइमलाही तक्रार करून उपयोग न झाल्याने आता पोलीस अधीक्षकांनीच या प्रकरणांत लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.