- News
- एक्सक्लुझिव्ह
- छत्रपती संभाजीनगर शहरातून इतक्या मोठ्या संख्येने तरुणी का होताहेत गायब?
छत्रपती संभाजीनगर शहरातून इतक्या मोठ्या संख्येने तरुणी का होताहेत गायब?
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातून तरुणी बेपत्ता होण्याचे प्रमाण धक्कादायक असून, पालकांनी आता अधिक सजग होण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या दीड महिन्यात १ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान शहरातून थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल ६५ तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. १८ ते २८ वयोगटातील मुलींचे बेपत्ता होण्याचे हे प्रमाण धक्कादायक आहे. चालू नोव्हेंबर महिन्यात […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातून तरुणी बेपत्ता होण्याचे प्रमाण धक्कादायक असून, पालकांनी आता अधिक सजग होण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या दीड महिन्यात १ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान शहरातून थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल ६५ तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. १८ ते २८ वयोगटातील मुलींचे बेपत्ता होण्याचे हे प्रमाण धक्कादायक आहे.
पालकांचा अतिविश्वासच अशा घटनांना कारणीभूत ठरतो. आपले पाल्य कुणाच्या संपर्कात आहे. तिचे किंवा त्याचे कोण मित्र आहेत, तो किंवा ती वेळेवर घरी येते का, कॉलेज-शाळेत वेळेवर जाते का, कॉलेज, क्लास व्यतिरिक्त तिचा वेळ कुठे जातो, घरातील तिचे व त्याचे वर्तन, मोबाइलचा वापर, कॉल-सोशल मीडियावरील सक्रियता या गोष्टी बारकाईने हेरून वेळीच उपाययोजना केल्या तर अशा कटू प्रसंगांना आणि बदनामीला सामोरे जावेच लागणार नाही, असे मत सुज्ञ व्यक्ती व्यक्त करत आहेत.
तुमचे पाल्य स्नॅपचॅट वापरतेय ?
व्हॉट्स ॲपवर नंबर हा लगेच समोर येतो. पण पालकांना अंधारात ठेवण्यासाठी सध्या वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तरुणाई वापरत आहे. सध्या शहरात स्नॅपचॅटचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून, त्यावरील लॉगीन हे मोबाइल क्रमांक किंवा ई-मेलद्वारे होत असल्याने समोरच्या व्यक्तीला नंबर- ई-मेल दिसत नाही. फेक आयडी वापरून अनेकदा तरुणींची फसवणूक होण्याची शक्यता असते. स्नॅपचॅटचा वापर करून झालेले काही गुन्हे अलीकडच्या काळात उघडकीस आले आहेत. या ॲपवरील फोटो फिल्टर तरुण-तरुणींना आकर्षित करतात. त्यामुळे वापरही वाढला आहे. मात्र ओळख लपविण्याची सोय असल्याने वाईट प्रवृत्तींकडून तरुण-तरुणीच नव्हे तर गृहिणींनाही लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे आपले पाल्य किंवा सौभाग्यवती स्नॅपचॅट वापरत असेल तर वेळीच अलर्ट व्हा.

