अभिनेत्री शिल्पा शिंदेची विशेष मुलाखत : 'ग्लॅमर, पैसा, इतर गोष्टींची इच्छा... यांचा अंत नाही... पण थोडा विराम घेणे आवश्यक!'

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

दशकापूर्वी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शो "भाभी जी घर पर हैं’ने ज्या भूमिकेला सर्वाधिक लोकप्रिय बनवले, ती होती अंगूरी भाभी. "सही पकडे हैं’सारख्या वाक्याने अभिनेत्री शिल्पा शिंदेने या पात्रात अक्षरशः जीव ओतला. प्रेक्षक तिचे चाहते बनले. परंतु २०१६ मध्ये झालेल्या वादामुळे शिल्पाने शो सोडण्याचा निर्णय घेतला अन्‌ चाहत्यांना धक्का बसला होता. शिल्पा आणि शोच्या निर्मात्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा दीर्घकाळ सुरू राहिला. त्यामुळे कुणी विचारही केला नव्हता, की शिल्पा पुन्हा अंगूरी भाभीच्या भूमिकेत परत येईल. परंतु काळ बदलला, कटुता कमी झाली आणि आता ती "भाभी जी घर पर हैं २.०’मध्ये शिल्पा परतली आहे. विशेष मुलाखतीत शिल्पाने सांगितले, की मी कधीच कल्पना केली नव्हती की मी शोमध्ये परत येईन. शोचे लेखक मनोज संतोषी हे या पात्राचे मूळ होते. त्यांनीच अंगूरी भाभी या पात्राला जन्म दिला. ते अनेकदा शिल्पाला फोन करून विचारायचे, की परत येशील का... पण शिल्पा नेहमी टाळायची. शिल्पाने स्पष्ट केले, की ती मनोजमुळे शोमध्ये परतली...

मी मनोजजीसाठी परतले...
शिल्पाने सांगितले, की गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मनोज संतोषीजी आजारी पडले. मी त्यांच्या संपर्कात होते. मी रुग्णालयात त्यांच्यासोबतही राहिले. मी मनोजजींना वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांना यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता होती, पण ते वाचले नाहीत. त्या काळात जेव्हा शोशी संबंधित सर्वजण भेटले, तेव्हा एक खास बंध निर्माण झाला. जेव्हा निर्मात्यांनी मला विचारले, तेव्हा मी सुरुवातीला नकार दिला. मग आसिफ शेख म्हणाले, की मनोजजी खूप आनंदी होतील. त्यामुळे मी त्यांच्यासाठी आणि माझ्यावर नेहमीच प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांसाठी या शोमध्ये परतले.

482220409_1103349781837410_82958 (1)

शिल्पा शिंदे म्हणते, त्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही!
२०१६ मध्ये शिल्पाने शो सोडला तेव्हा निर्मात्यांनी तिला कायदेशीर नोटीस पाठवली आणि तिने निर्मात्यांवर लैंगिक छळाचा आरोप करत एफआयआरदेखील दाखल केला. इतक्या कटू परिस्थितीनंतर शोमध्ये परत येण्याची काही भीती होती का? याबद्दल ती म्हणते, त्या वेळी आमच्यामध्ये एक तिसरी व्यक्ती होती आणि जेव्हा जेव्हा तिसरी व्यक्ती येते तेव्हा बरेच गैरसमज निर्माण होतात आणि नाते तुटते. आमच्यासोबतही असेच घडले. आरोप लावण्याची गोष्ट म्हणाल तर मी महाभारतातून धडा शिकत जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली होती. कारण माझ्यावर अव्यावसायिक असल्याचा आणि शो खराब करण्याचा आरोप केला जात होता. मला काम करण्यापासून रोखले जात होते. अशा परिस्थितीत माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता, परंतु सर्वांना सत्य माहीत आहे. म्हणूनच निर्मात्यांनीही मला परत घेतले आणि शोमध्ये माझे खूप प्रेम आणि आदराने स्वागत करण्यात आले.

माझा टीव्हीतील रस कमी झाला होता...
शिल्पा शिंदेला "भाभी जी घर पर है’मुळे प्रसिद्धी मिळाली. तिने नंतर "बिग बॉस १३’ जिंकला. तरीही तिने "झलक दिखला जा’ व्यतिरिक्त इतर कोणताही कार्यक्रम केला नाही. याबद्दल ती म्हणते, की मला टीव्हीत स्वारस्य उरले नव्हते. ज्याप्रकारे माझ्यावर आरोप केले गेले आणि काम करू देत नव्हते, त्यामुळे मीही खड्ड्यात जा, अशी भूमिका घेतली होती. मी तुमच्यामुळे उदरनिर्वाह करत नाही. मी ईएमआय भरण्यासाठी काम करत नाही. बिग बॉसच्या यशानंतर माझ्याकडे हे लोक काम घेऊन आले तरी काम करायचे नाही, अशी माझी मानसिकता होती. त्याशिवाय ज्या ऑफर येत होत्या, मला चांगल्या वाटत नव्हत्या.

482220409_1103349781837410_82958 (1)

मनात कोणताही लोभ, लालसा उरली नाही...
"भाभी जी घर पर हैं’ आता चित्रपटाच्या रूपात येत आहे, तुम्हाला त्याचा भाग न होता आल्याबद्दल दुःख आहे का? यावर शिल्पा म्हणाली, "नाही, मी चित्रपट किंवा तत्सम काहीही करण्याच्या कल्पनेपलीकडे गेली आहे. मी त्या बाबतीत खूप समाधानी आहे. मला कोणताही लोभ किंवा लालसा उरलेली नाही.’
कर्जतमध्ये शेती करून खुश...
शिल्पा म्हणाली, मी टीव्ही इंडस्ट्रीला निरोप दिल्यानंतर वेगळ्या जगात प्रवेश केला होता. मी कर्जतमध्ये एका गावकऱ्यासारखी राहते. शेती करते. मी जवळजवळ मुंबई सोडली आहे. पहिल्या लॉकडाऊन दरम्यान मी कर्जतमध्ये काही जमीन खरेदी केली होती. मी तिथे माझा बंगला बांधला. नंतर मी नदीकाठी आणखी जमीन खरेदी केली, जिथे मी एक सुंदर विंटेज रिसॉर्ट बांधत आहे. मी स्वतः अभियंता आणि आर्किटेक्ट आहे. त्यामुळे मी त्यात व्यस्त आहे. मी तिथे सेंद्रिय शेती करत आहे, म्हणून मी माझ्या आयुष्यात समाधानी आहे. ग्लॅमर, पैसा आणि इतर गोष्टींची इच्छा अंतहीन आहे. तुम्ही कितीही पैसे कमवले तरी ते पुरेसे नाही, पण थोडा विराम घेणे आवश्यक आहे, असे शिल्पा म्हणाली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!

Latest News

मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार! मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुचाकीचा चुकून धक्का लागल्याने एकाने दुचाकीस्वारावर चाकूचे वार करून जखमी केले. ही घटना मुकुंदवाडीतील...
छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना
गव्हाबरोबर गांजा वाढवला... पोलिसांचा शेतात छापा, ५ लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक, करमाडजवळील कारवाई
वाळूज MIDC तील कमळापुरात दोन गटांत सशस्त्र हाणामारी; ४ गंभीर जखमी, वरिष्ठ पोलिसांचा फौजफाटा घटनास्‍थळी, परिस्थितीवर नियंत्रण (व्हिडीओसह)
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software