वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर शहरातील घायगाव रोडवरील रहिवाशी अतुल बाळासाहेब पानगावाणे (वय २७) याच्या आत्महत्येप्रकरणी वैजापूर पोलिसांनी त्याची पत्नी, सासू, साला, मामे सासरा व एका महिलेविरुद्ध सोमवारी (२४ नोव्हेंबर) गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून होणाऱ्या त्रासाबद्दल मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग आणि व्हिडीओ आढळल्यानंतर अतुलचे भाऊ रमेश बाळासाहेब पानगावाणे (वय ३२, रा. व्दारका लॉनच्या शेजारी, जुना घायगाव रोड, वैजापूर) यांनी तक्रार दिली आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांत अतुलची पत्नी मोनाली (रा. इंगळे वस्ती वैजापूर), सासू वालुबाई ज्ञानेश्वर गायकवाड, साला जगदिश ज्ञानेश्वर गायकवाड (दोघे रा. रेनखेडा ता. नांदगाव जि. नाशिक), मामे सासरा विजू भाऊसाहेब सोनवणे, शकुंतला भाऊसाहेब सोनवणे (दोघे रा. वाकला ता. वैजापूर) यांचा समावेश आहे. रमेश पानगावाणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते सध्या आई वंदना, वडील बाळासाहेब यांच्यासह राहतात. २०१५ मध्ये त्यांचे लग्न झाले होते. २०१६ मध्ये लहान भाऊ अतुलचे रमेश यांच्या पत्नीची लहान बहीण मोनालीसोबत लग्न झाले होते. सहा वर्षांपूर्वी रमेश यांच्याशी भांडण झाल्याने त्यांची पत्नी माहेरी आई- वडिलांकडे निघून गेली. तेव्हापासून ती तिकडेच राहते. अतुल व त्याच्या पत्नीचेही चार महिन्यांपूर्वी भांडण झाल्याने त्याची पत्नीसुध्दा तिच्या आई- वडिलांकडे राहते.
मागील १८ वर्षांपासून रमेश आणि अतुल हे दोन्ही भाऊ जयसिंग बन्सीलाल राजपूत यांची द्वारका लॉनच्या बाजूला असलेली सहा एकर शेती बटाईने करतात. २३ नोव्हेंबर रोजी दुपारी २ ला अतुल आई वंदना यांना म्हणाला, की मी बटाईने करत असलेल्या खालच्या जमिनीत जाऊन येतो. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास वंदना या अतुलला शेतात पाहण्यासाठी गेल्या. त्यावेळी अतुलने आईला मोबाईल चार्जिंग करण्यासाठी दिला व घरी जाऊन चकुल्या खायला कर. मी थोड्यावेळात घरी येतो, असे म्हणाला. त्यानंतर वंदना घरी आल्या. अतुल यांना खाण्यासाठी चकुल्या तयार केल्या. मात्र अतुल घरी आले नाहीत. त्यामुळे वंदना या पुन्हा अतुलला पाहण्यासाठी शेतात गेल्या. त्यावेळी शेतातील मका पिकात अतुल दिसून आला नाही. बाजूच्या शेतातील गड्ड्याजवळ अतुलचा बूट, पिशवी व पाण्याची बॉटल दिसली. त्यानंतर वंदना या घरी रडत रडत आल्या.
ते पाहून घाबरलेल्या रमेश यांनी आईला काय झाले, असे विचारले असता त्यांनी अतुल मला शेतात दिसला नाही व त्याचा बूट, पिशवी व पाण्याची बॉटल बाजूच्या शेतातील पाण्याच्या गड्ड्याजवळ दिसत आहे. त्यानंतर रमेश, आई वंदना व रमेश यांचा मित्र असे अतुल यांना शोधण्यासाठी शेतात गेले. त्यांनी कॉल करून शेतमालक जयसिंग बन्सीलाल राजपूत, मित्र हेमंत गलांडे, योगेश त्रिभुवन व राहुल जयसिंग राजपूत यांनाही बोलावून घेतले. सर्वांनी अतुलचा शेतातील मका पिकात शोध घेतला. त्यानंतर सर्वांनी सायंकाळी पाचला साबेर खान यांच्या शेतातील पाण्याच्या गड्ड्यात जाऊन पाहिले असता त्या पाण्यात अतुलचा मृतदेह आढळला.
त्याचे दोन्ही हात व दोन्ही पाय दोरीच्या सहाय्याने बांधलेले दिसले. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वैजापूरच्या सरकारी रुग्णालयात नेला. रात्री ९ ला अतुलचा मोबाइल चालू केला असता त्यात अतुलच्या काही रेकॉर्डिंग व व्हिडीओ दिसले. त्यात अतुलने पत्नी मोनाली, सासू वालुबाई, साला जगदिश, मामे सासरा विजू भाऊसाहेब सोनवणे, शकुंतला भाऊसाहेब सोनवणे यांच्याकडून होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितले असून, भाऊ रमेश यांची तक्रार घेतल्याशिवाय मला जाळू नका, असे म्हटले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले करत आहेत.